vv07सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

मिक्स अ‍ॅण्ड मॅच
लोकप्रिय समाजमाध्यमांपैकी एक गणल्या जाणाऱ्या ट्विटरवर ‘ट्विटर पोल्स’ हे नवीन फीचर लाँच करण्यात आलंय. मनाला वाटेल तो प्रश्न ट्विटरवर मांडून त्यावर उत्तरं मिळवण्यासाठी ट्विटरचा वापर सर्रास होतो. ट्विटरवर युजर्सची ही मानसिकता लक्षात घेऊन ट्विटरनं ‘ट्विटर पोल्स’चा ऑप्शन आणलाय. यात कंपोज बॉक्समध्ये प्रश्न मांडून झाल्यावर उत्तरासाठी दोन पर्याय द्यायचे आहेत. या फीचरचा वापर अमिताभ बच्चन आणि ‘एआयबी’ यांनी लगेचच सुरू केलाय. त्याखेरीज या फीचरचा वापर विविध न्यूज चॅनल्स, स्पोर्ट्स वेबसाइट्स, कॉमेडियन्सनीही सुरू केलाय. हे फीचर लवकरच आयओएस, अ‍ॅण्ड्रॉइड आणि डेस्कटॉप्सवर उपलब्ध होईल.

गीताची घरवापसी
लहानपणी चुकून भारतीय हद्द ओलांडून पाकिस्तानात गेलेली मूकबधिर गीता १३ वर्षांनी मायदेशी परतलेय. त्यामुळं #geetacomeshome हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता. ‘आनंदाची बातमी’, ‘आता यावर चित्रपट कधी येणार’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुषमा स्वराज नि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन’, ‘पाकिस्तानचं सकारात्मक पाऊल’, ‘ही खरी घरवापसी’ असे अनेक ट्वीट्स केले गेले. या विषयाच्या अनुषंगानं ‘बजरंगी भाईजान पार्ट- २’ येतोय.. त्यात सलमान खान नरेंद्र मोदींना भारतात घेऊन येतो..’ हा जोक व्हायरल होत होता.

‘बाहुबली’ छा गया..
सेट मॅक्सवरचा बहुचर्चित ‘बाहुबली’ हा चित्रपट ट्रेण्डिंगमध्येही टॉप ठरला. राजामौली यांचं लई भारी दिग्दर्शन, प्रभासची ग्रेट अ‍ॅक्टिंग, राणा डुग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना शहा यांची अजोड साथ, विलोभनीय भव्य सेट, ऑसम कॅमेरावर्क, ब्लॉक बस्टर मूव्ही अशा कौतुकभरल्या शब्दांत ‘बाहुबली’ पुन्हा एकदा चर्चेत आला. तसा तो त्यातील विनोदांमुळे सोशल मीडियावर अधूनमधून हजेरी लावतो. त्यात गेल्या आठवडय़ात प्रभासचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं प्रभासवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षांव झाला. ट्विटरवर #HappyBirthdayPrabhas हा टॅग टॉप ट्रेंडमध्ये होता.

ट्रेलर-टिझर-लॉन्चिंग
प्रतिभा, अहंकार आणि अभिमानाच्या संघर्षांचं रोमहर्षक नाटय़ आणि सहजसुंदर अभिनयाला अभिजात संगीताचा साज! ‘कटय़ार काळजात घुसली’चा ट्रेलरला रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची भरभरून दाद मिळतेय.
‘शांताबाई..’ या गाण्याची चर्चा चांगलीच रंगलेली दिसतेय. या गाण्यावरचे अनेक मजेशीर व्हिडीओही गेले अनेक दिवस सोशल मीडियातून व्हायरल होताहेत. आता या गाण्याचा ऑफिशियल व्हिडीओही लॉन्च करण्यात आलाय. यू टय़ूबवरील या गाण्याच्या व्हिडीओला ५० हजारांहून अधिक हिट्स मिळाल्यात.
दीपिका पदुकोण नि रणबीर कपूरच्या ‘तमाशा’बद्दल फॅन्सची उत्सुकता वाढतेच आहे. त्यामुळे ए. आर. रहमान हा ट्विटरवर टॉप ट्रेण्डचा विषय ठरला. त्याचं निमित्त ठरलं ‘तमाशा’तलं ‘अगर तुम साथ हो’ या गाण्याचं लॉन्चिंग.
‘बाजीराव-मस्तानी’तल्या आपल्या लुकचा फोटो दीपिका पदुकोणनं ‘इस्टाग्राम’वर अपलोड केला होता. त्याला दीपिका फॅन्सनी पटापट लाइक केलं.
वि. वा. शिरवाडकरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारित ‘नटसम्राट’ आता चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांसमोर येतोय. नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरचं अनेकांनी कौतुक केलं.
कहानी घर घर की..
तमाम विराट फॅन्स नि अनुष्का फॅन्सच्या चर्चेचा कायमचा विषय ठरलेली जोडी अर्थात विराट कोहली नि अनुष्का शर्मा आणि अनुष्काचे वडील हे घराच्या शोधात फिरतानाचा फोटो व्हायरल झाला.
दसरा सेलिब्रेशन

नऊ रंगांच्या सेल्फी, देवीच्या मूर्ती नि तिच्या आराधनेपाठोपाठ दसऱ्याच्या शुभेच्छांनी सोशल मीडियात टॉप ट्रेण्ड गाजवला. पारंपरिक पद्धतीच्या शुभेच्छांपेक्षा यंदाच्या काही शुभेच्छा थोडय़ा हटके ठरल्या. त्या अशा- ‘वर्षभर चॅटिंग करताय! काल मोबाइल तरी पुजला का?’ किंवा ‘सोन्याच्या बिस्किटांचा फोटो अ‍ॅडव्हान्स पाठवून दिलेल्या शुभेच्छा’ किंवा ‘आपटय़ाची पानं लुटण्याऐवजी रोपं लावून पर्यापरणस्नेहाचा आग्रह धरण्याऱ्या शुभेच्छा’ किंवा मग रावणदहनाचा संदर्भ देऊन ‘श्रीमंत रावणशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल- श्रीलंका तरुण मंडळ.’

डाळ डाळ हां..
डाळींचे भाव कितीही चढले तरी ग्राहक राजानं टेन्शन न घेता आपल्या भावना टीका-टिप्पणीतून व्यक्त केल्या. त्यातले हे काही नमुने.. डाळींचे नव्हे तर व्हायरल मेसेजेसचे..
‘गंमत बघा, तूरडाळ २००/ किलो विरुद्ध
चणाडाळ ८८/ किलो + साखर ४०/ किलो = १२८ रुपये. अर्थातच वरण खाण्यापेक्षा पुरण खाणं स्वस्त आहे. आले ‘अच्छे दिन’. किंवा ‘यंदा दसऱ्याला सोन्याऐवजी तूरडाळ लुटावी म्हणतोय, तुमचं काय म्हणणं आहे..’ तर कुणी दु:खाच्या भरात काव्यच केलं.. ‘त्या दिवशी ‘ती’ पुन्हा ओझरती दिसली, अजूनही तशीच दिसते, फुललेल्या सोनचाफ्यासारखी, क्षणभर मन मागे गेलो, तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण आठवला, कशी कठोर असायची, पण ‘शिट्टी’ वाजली की नरम होऊन जायची, आज सगळं संपलंय, कुठे तरी असते सक्त पहाऱ्यात, मिरवते आता फक्त चांगल्या घरात. अहो! तसं काही नाहीये हो.. तूरडाळ हो.. २०० रुपये किलो झालीये, बाकी काही नाही..’ कुणी दिवाळी गिफ्ट पॅकचे फोटो फॉरवर्ड करतेय, तेही सुक्यामेव्याऐवजी डाळींचेच..

फॉरवर्डेड
vv08फर्स्ट सेल्फी..
मराठी सिनेमा जगाच्या पुढं असल्याचा हा पुरावा. अशोक सराफ सेल्फी घेताना दिसताहेत..

दिवाळी स्पेशल अ‍ॅडव्हान्स
दिवाळीपूर्व सूचना- कृपया आपल्या गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडद्वारे मिळालेले आणि तुम्ही लपवलेले फोटो/ प्रेमपत्र/ भेटवस्तू अथवा इतर कोणत्याही वस्तू आठवणीनं काढून घ्या!! अन्यथा, घराची साफसफाई करताना त्या आपल्या आई-वडील किंवा पत्नीच्या हाती लागून तुमच्या घरात दिवाळीच्या आधीच ‘फटाके’ फुटू शकतात..

पोलीस : आज मेरे पास गाडी है.. बंगला है.. नौकर-चाकर है.. कार है.. तुम्हारे पास क्या है?
शिक्षक : मेरे पास दिवाळीच्या सुट्टय़ा है..

पुणे स्पेशल
एक आजोबा रस्त्यातून चालत जाताना आकाशात पाहत चाललेले असतात..
नेमके ते एका पुणेकराच्या बाइकच्या समोर येतात..
पुणेकर बाइक थांबवून शांतपणे म्हणतो, आजोबा, जिथे ‘जाताय’ तिथे बघा,
नाहीतर जिथे ‘बघताय’ तिथे जाल..
पुणेरी लग्नपत्रिकेतली लेटेस्ट टीप- आहेर, नाही तर बाहेर. चुकीला माफी नाही.

अनबिलिव्हेबल पेंटिंग्ज.. म्हणून दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आदी हिरॉइन्सची चित्रं व्हायरल होत होती.

राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com