समुद्रकिनारी एकमेकांच्या हातात हात घालून बसलेली ती दोघं अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे एकटक पाहत आणाभाका घेत असतात, तुझ्यासाठी अमुक करीन, तमुक करीन असं वचन देत असतात. काही गोष्टी विश्वास बसण्यासारख्या असतात तर काही स्वप्नवत. मग हे कसं शक्य होणार?, असं प्रश्नचिन्ह आलं की वाक्य येतं, ‘तुझा माझ्यावर भरोसा नाही का?’ प्रेमात आकंठ बुडालेलं ते युगुल डोळ्यात हलकेच तरळणाऱ्या अश्रूंकडे पाहत चकार शब्दही न काढता आजूबाजूचं जग विसरून एक मेकांच्या घट्ट मिठीत विसावतं. एकमेकांवर पूर्ण भरवसा असल्याची ती पावती असते. हे प्रेमाच्या बाबतीत झालं, पण भरवशाचा म्हणजेच विश्वासाचा हा खेळ सर्वच ठिकाणी पाहायला मिळतो. या भरवशाला अनेक समानअर्थी शब्द आहेत. खात्री, हवाला, भिस्त, जबाबदारीचे भान, कधी व्यक्त तर कधी अव्यक्त नातं. हा भरवसा कधीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही पण तो सर्वत्र भरून राहिलेला असतो आणि त्याच्याशिवाय कुणाचंच पान हलत नाही. घराबाहेर पडताना बाबा चॉकलेट आणण्याचा भरवसा देतात, कार्यालयात बॉस प्रमोशनचा भरवसा देतो, राजकारणी विकासकामांचा भरवसा देतात आणि मंदिरात पुजारी सुख-समृद्धीचा भरवसा देतात. या भरवशाची कुठेच लिखापढी होत नसते. कारण तसं झालं तर त्याचं नामकरण होतं नियम किंवा कायदा. त्यामुळे लाडीगोडीने भरवशाची टेप प्रत्येक जण आपापल्या परीने वाजवत असतो.

गेले काही दिवस ही भरवशाची टेप जरा भलतीच मोठय़ाने वाजतेय. पाहावं किंवा ऐकावं तिथे ‘सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का.?’ हे वाक्य ऐकू येतंय. या मराठी लोकगीताने सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. अजय क्षिरसागर यांनी लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या आणि भाग्यशाली क्षिरसागर यांच्या साथीने गायलेल्या या गाण्याने गहजब केलाय. यूटय़ूबर तुम्ही या गाण्याच्या नावाने सर्च केलात तर प्रत्येक व्हिडीओला लाखांच्या घरात दर्शक आहेत. एका प्रेमी युगलामध्ये नेहमीचे होणारे रुसवे-फुगवे आणि त्यांचा एकमेकांचा पटवण्याचा चाललेला प्रयत्न अशा अर्थाच्या या गाण्याचा खरं तर ऑडिओच सर्वात आधी फिरायला लागला. परंतु, काही चतुर तरुणांनी शाळेतल्या वयातील मुलींना घेऊ न त्याचा अतिशय साधा व्हिडीओ तयार केला आणि तो इतका व्हायरल झाला की अनेकांना तो तशाच पद्धतीने रेकॉर्ड करण्याचा मोह आवरेनासा झालेला आहे.

समोर मध्यभागी बसलेला मुख्य गायक आणि त्याच्या मागे बसलेले किंवा उभे इतर सहगायक. कॅमेराही सेल्फी अँगलने लावलेला. मुख्य गायक महत्त्वाची वाक्यं गाणार आणि सहगायक केवळ माना डोलावून यमक जुळणारे शब्द बोलणार. सगळं कसं, आजच्या तरुणाईला हवंहवंसं वाटणारं. त्यामुळे अल्पावधीतच हे गाणं इतकं का प्रसिद्ध झालं हे वेगळं सांगायला नको. घरात, कार्यालयात, लहान मुलांनी शाळेत केलेले, महिला मंडळाचे, लग्न सोहळ्यात नवरा-बायकोसोबत संपूर्ण वऱ्हाडाने गायलेले, ट्रेनमध्ये, ट्रेकिंगला जाताना गायलेले, ऑर्केस्ट्रामध्ये, तृतीयपंथीयांनी या गाण्यावर केलेले वेगवेगळे व्हिडीओ इंटरनेटवर दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे फक्त मराठीच नाही तर हिंदी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाण्याचं भाषांतर झालंय. पण इथवरच न थांबता या गाण्याने लोकांच्या प्रतिभेलाही आव्हान दिलंय. त्यामुळे केवळ मूळ गाणंच न गात बसता अनेक जणांनी गाण्याच्या चालीवरच स्वत:चे बोल लिहायला सुरुवात केली. केवळ विनोदी बोलच नाही तर विशिष्ट विषयाला धरून कधी विडंबनात्मक, तर कधी व्यवस्थेवर ताशेरे ओढत गाणी तयार केली जातायेत. त्यांपैकीच गाजलेलं गाणं म्हणजे ‘रेड एफएम’वरील आर. जे. आणि ‘मुंबईची राणी’ मलिष्काने गायलेलं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का.’ हे गाणं. मलिष्काने मुंबईकरांच्या समस्या योग्य शब्दांत मांडल्याची पावती प्रेक्षकांनी गाण्याला डोक्यावर घेत देऊ न टाकली आणि त्याची मिरची मुंबई महापालिकेला चांगलीच झोंबली. त्यावर महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही याच गाण्याचा आसरा घेत मलिष्काला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. एवढंच कशाला, या गाण्याने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. ‘सच्चा भारतीय’च्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या गाण्याने ‘मोदी, तू आता तरी देशासंग खरं बोल’, असा सूर लावलाय आणि गाण्याच्या माध्यमातून नोकऱ्या, स्मार्ट सिटी, दलितांवरील अत्याचार, परदेश दौरे आणि अच्छे दिन या विषयांवरून चांगलंच झोडपून काढलेलं आहे. हे गाणं विरोधकांपैकीच कुणी तरी तयार केलं असणार हे वेगळं सांगायला नको पण आता या गाण्याला भक्तगण कसं उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंटरनेटवर कधी कुणाला व्हायरलची लागण होईल याचा काही नेम नाही. मग ते कोलावरी डी असो, शांताबाई असो वा ढिंच्याक पूजा. वेगळेपणामुळे त्यांचे सर्व गुण अवगुण पोटात घालून इंटरनेटने त्यांना प्रसिद्धी, पैसा, मान-सन्मान(?) सर्वकाही दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या जीवावर नंतर अनेकांनी आपली पोटंही भरली. पण, ‘सोनू..’सारख्या गाण्यामुळे जे घडतंय ते नक्कीच वेगळं आहे. मनोरंजन एकीकडे आणि त्याच मनोरंजनाचा आसरा घेत काही गंभीर विषय मांडणं कौतुकास्पद आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा उपयोग करून घेतोय. पण हरकत नाही, ‘सोनू..’च्या निमित्ताने काही प्रश्न समोर येतायत आणि समाजप्रबोधनही होतंय. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींना दर्जाचं कारण देऊ न न नाकारता त्याला वेळ द्यायला हवा. कुणास ठाऊक ती गोष्ट कधी कोणतं वळण घेईल?. ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’ हे म्हणायची वेळ त्यांच्यावर आणता कामा नये.

viva@expressindia.com