स्ट्राइप, चेक्स यांच्याविषयी नवीन बोलण्यासारखं खरं तर काहीच नाही. मुलींच्या कपडय़ांमध्ये फ्लोरल प्रिंट्सना जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व मुलांच्या कपडय़ांमध्ये स्ट्राइप्स, चेक्सचं असतं. पण जेव्हा हे दोन्ही प्रकार मुलींच्या पेहरावातील महत्त्वाचा भाग बनतात, तेव्हा यांची चर्चा तर होणारच.

फॉर्मल्स म्हटल्यावर डोळ्यासमोर येणाऱ्या पहिल्या तीन गोष्टींमध्ये स्ट्राइप म्हणजेच रेषा आणि चेक्स म्हणजेच चौकडीच्या प्रिंट्सचा समावेश होणं साहजिकच आहे. गेल्या काही वर्षांत कॉलेजवयीन तरुणांमध्ये टी-शर्ट आणि चेक्स शर्ट घालायची पद्धत रुजू झाली आहे. आणि मुलांनी एक स्टाईल पकडली की कंटाळून त्याचा चोथा होईपर्यंत ते त्या ट्रेंडला चिकटून राहतात. या नियमाने किती तरी र्वष ही स्टाइल कायम चालूच आहे. असो पण आज या चौकडीच्या विषयात अडकण्याचं कारण म्हणजे सध्या मुलीही हौसेने चेक्स, स्ट्राइप्सचे कपडे वापरत आहेत. अर्थात मुलींच्या  फॉर्मल शर्ट्स, स्कर्ट्स, सुट्स, ट्राऊझर यामध्ये यांचा वापर होत होताच. पण आता दैनंदिन वापरातील सेमी फॉर्मल ड्रेसेस, पार्टी ड्रेसेस, फ्लेअर स्कर्ट्स, घागरा, ब्लाऊज, जॅकेट अशा किती तरी वेगवेगळ्या स्वरूपांत या चेक्स, स्ट्राइप्सचा वापर होऊ  लागला आहे. अगदी फेस्टिव्हल कलेक्शन्समध्येही यंदा चेक्स आवर्जून पाहायला मिळताहेत. त्यामुळे त्यांची दखल घेणं ओघाने आलंच.

रेषा, चौकडी प्रिंट्सच्या वापराचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या लुकमधील सहजता. वेगवेगळ्या लुक्ससोबत आणि रंगांसोबत सहज वापरता येतात. सहसा या प्रिंट्समध्ये दोन किंवा तीन रंगांचा वापर होतो. त्यामुळे त्यानुसार मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट जोडी बनवता येते. चौकडीच्या प्रिंट्सची परंपरा जुनी आहे. त्यामुळे देशानुसार त्याच्यात विविधतासुद्धा तितकीच आहे. स्कॉटलंडच्या पुरुषांच्या पारंपरिक स्कर्टचं हिरवं-लाल चौकडय़ांचं कापड माहिती असेलच. त्याला ‘टार्टन’ म्हणतात. युरोपातील फॉर्मल्समधील चेक्स आकाराने मोठे पण बारीक रेषांचे असतात. त्यांना ‘विंडोपॅने चेक्स’ म्हणतात. मध्यम आकाराच्या रेषा आणि छोटय़ा चेक्सच्या कापडाला ‘टार्टलसल चेक्स’ म्हणतात. यामध्ये शक्यतो काळा आणि लाल या दोन रंगांचा वापर केला जातो. थोडय़ा जाडय़ा आकाराच्या एकाच रंगातील चेक्सच्या ‘जिंजम’ चेक्स अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. अगदी भारतात दक्षिण भारतीय साडय़ांमध्ये मल्टिकलर चेक्सचा वापर झाला आहेच. त्यावरून उदयाला आलेला ‘मद्रास चेक्स’ हा प्रिंट्सचा प्रकार सध्या जगभर प्रसिद्ध आहे. यामध्ये जाडय़ा आणि बारीक रेषांचा आणि तीन-चार रंगांचा वापर होतो. दोन गडद आणि दोन फिकट रंगांच्या रेषा आळीपाळीने एकत्र येऊन तयार झालेल्या लहान मोठय़ा चौकोनी चेक्सना ‘ग्लेन प्लेड’ म्हणतात. सहसा यांच्यात डल रंगांचा वापर होतो. कॉर्पोरेट क्षेत्रात चाळिशीतल पुरुषांच्या पेहरावात यांचा आवर्जून वापर होतो. हे तर झाले चौक डय़ांचे मूळ प्रकार, पण ट्रेंडमध्ये आल्यानंतर त्यांच्यात विविधता येते. विशेषत: मद्रास चेक्स, टार्टन, टार्टलसल चेक्सचा यंदा बराच वापर करण्यात आला आहे.

मगाशी म्हटल्याप्रमाणे चौकडीच्या प्रिंट्समधील सहजता हे त्यांच्या लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण आहे. उभ्या पट्टय़ाच्या प्रिंट्समुळे उंच असल्याचा भास होतो. आडव्या पट्टय़ांमुळे शरीराला भरीवपणा मिळतो, हे तर आपल्याला ठाऊ कच आहे. त्यामुळे स्ट्राइप्सचा वापर एरवीही आवर्जून केला जातो. चेक्समुळे शरीराचा जाडेपणा लपला जाऊन कमनीयता मिळते. तसंच फॉर्मल लुकशी थेट संबंध जोडला गेल्याने लुक फ्रेश दिसतो. त्यासोबत फारशा ज्वेलरी किंवा अ‍ॅक्सेसरीजची गरज नसल्याने लुक नीटनेटका दिसतो. तसंच या प्रिंट्सच्या स्टायलिंगचे बरेच प्रयोग करता येतात. फॉर्मल्समधील चेक्स शर्ट आणि अर्थी टोन ट्राऊझर किंवा डार्क चेक्स स्कर्ट आणि प्लेन सफेद शर्ट ही जोडी तर आपल्याला माहीत आहेच. पण त्याखेरीज लायक्राचा ब्राइट रंगाचा चेक्स मॅक्सी आणि स्नीकर्स कॉलेज लुकसाठी मस्त ठरतील. प्लेन बोल्ड कलर शर्टवर डार्क चेक्स जॅकेट घालता येऊ  शकतं. ही जोडी डेनिम पँट किंवा स्कर्टवरसुद्धा छान दिसेल. चेक्स शर्टवर लूझ डेनिम जॅकेट घालून बघा. चेक्स प्रिंटचे स्कार्फसुद्धा मिळतात. प्लेन किंवा प्रिंटेड ड्रेसवर तेही उठून दिसतात. सटल रंगाच्या चेक्स ड्रेसवर प्रिंटेड जॅकेट किंवा श्रगसुद्धा घालता येईल. प्रिंट्स आणि चेक्स मिक्स करून छान स्टायलिंग करता येऊ  शकतं. एकाच चेक्स प्रिंटचं शर्ट आणि पँट किंवा जंपसूट असाही प्रयोग करता येईल. मद्रास चेक्सचा प्रकार साडय़ांमध्ये पूर्वीपासून आहेच. त्यांचा घेरेदार घागरा आणि बोल्ड रंगाचा क्रॅप टॉप हा प्रयोग यंदा दिवाळीत करून बघाच. चेक्स प्रिंट्ससोबत कुंदन ज्वेलरी छान दिसते. फंकी ज्वेलरीसुद्धा यासोबत घालू शकता. नेहमीच्या दागिन्यांपेक्षा ब्रोच, बाजूबंद, कमरपट्टा, इअरकफ अशा हटके दागिन्यांचा वापरसुद्धा यात करता येईल. तुम्ही कराल तितके प्रयोग कमी आहेत. त्यामुळेच चेक्सची लोकप्रियता कमी होत नाही. फक्त त्यांचा वापर कसा करता हे तुमच्यावर आहे.

viva@expressindia.com