थंडीचा मोसम आता चांगलाच स्थिरावलाय. एव्हाना सगळ्यांनीच आपापला वॉर्डरोब चेंज केला असेल. नवीन स्कार्फ, नीटेड वेअर, जॅकेट्स, स्टोल यासोबत बूट्स वगैरे अ‍ॅक्सेसरीजसुद्धा कपटात वरती आल्या आहेत. पण या गुलाबी थंडीचा काय भरवसा? आज आहे उद्या गायबही होईल. दुपारी रणरणतं ऊन आणि संध्याकाळी गाडीवर जाताना बोचणारी थंडी. अशा वेळी आवश्यक आहे विंटर फॅशनच्या योग्य ट्रिक्स वापरणं. लेअरिंग ही या लहरी हवेतली महत्त्वाची फॅशन ट्रिक. त्याविषयी.

थंडी आली की, स्वेटर, जॅकेट्स, मफलर, उबदार कपडे वगैरे गोष्टींमधल्या लेटेस्ट फॅशनच्या चर्चा होतात. पण आपल्याकडची थंडी असते लहरी. सकाळी बाहेर पडताना अगदी स्कार्फ आणि जॅकेटच्या आत दडलेले आपण दुपार चढत जाताना नको तो फुल स्लीव्ह्जचा ड्रेस असं म्हणतो. लेटेस्ट विंटर कलेक्शन कपाटात आणलेलं तर असतं, पण ते वापरायचं कसं आणि अशा लहरी थंडीतही कूल कसं दिसायचं हे सांगणारं कुणी नसतं. तेच सांगण्यासाठी आजचा हा लेख..

viva10स्कार्फ : थंडी म्हटल्यावर स्कार्फ हवाच. स्कार्फ मुलींसाठी ऑल सीझन वेअर झालाय खरा. पण हल्ली थंडीच्या दिवसात खास वुलन स्कार्फ सगळीकडे दिसताहेत. स्टोल्स तर आहेतच. फरचे स्कार्फ हुड नसलेल्या जॅकेटवर जास्त छान दिसतात. तसंच स्वेटरशी मॅचिंग असलेला स्कार्फपण चलनात आहे. बरेचदा कॅप अटॅच असलेलं मफलर पण मुली प्रिफर करतात. पलाझो, फरचा फूल स्लीव्ह्ज टॉप आणि पलाझोला मॅचिंग स्कार्फ हे असं कॉम्बिनेशन कूल दिसेल. स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल. गाडीवर जाताना गुंडाळून घट्ट बांधता येईल. इतर वेळी हेड गीअर म्हणून डोक्याला बांधता येईल किंवा नुसता गळ्यात अडकवण्याचा आणि कधी कधी गळ्यात क्रॉस करून गुंडाळण्याचाही ट्रेंड आहे. ओढणीपेक्षा कमी लांबी व रुंदीचे आणि मोठय़ा रुमालापेक्षा लांब असे स्टोल्स किंवा स्कार्फपण जीन्स जॅकेट या कॉम्बिनेशन सोबत क्लासी दिसतात. शॉलच्या कपडय़ाचे किंवा पश्मिना शालीसारख्या कापडाचे ट्रॅडिशनल कुती ट्रेंडी लुक देतात. थंडी जास्त असल्यास केवळ शोसाठी न घेता हे स्टोल्स गुंडाळूनदेखील घेता येतात. थंडीसाठी स्कार्फच्या भरपूर व्हरायटीज मार्केटमध्ये दिसत आहेत.

जॅकेट्स आणि टॉप्स : थंडीत वेगवेगळ्या जॅकेट्सची भरपूर व्हरायटी येते. मग त्यात जीन्स, लेदर, हुडीज हे सर्व आलंच. जीन्सवर जीन्सच्याच जॅकेटची फॅशन चांगली दिसतेच. पण जीन्सवर लेदर जॅकेट्स जास्त कूल दिसतात. हुडीज किंवा बेल्ट असलेली जॅकेट्सदेखील खूप थंडी असेल तेव्हा चांगलीच. जॅकेट आणि बूट्सचा कलर मॅच होत असल्यास लुक आणखीच क्लासी दिसेल. फुल स्लीव्ह्ज टॉप आणि टाइट फिट जीन्सवरून असं जॅकेटचं लेअरिंग.. एकदम छान लुक देईल. पार्टीवेअर टॉप्समध्ये फरचे टॉप प्रचलित आहेत. पार्टी लुक देणारे हे टॉप्स स्कर्ट, पलाझो सोबतदेखील छान दिसतील. स्वेटर कुर्तीज हल्ली बाजारात दिसताहेत. त्या जीन्सवर घातलेल्या चालतात. पण जेगिंग्जसोबत हटके कॅज्युअल लुक देतात. कमी थंडी असल्यास हायनेक टी-शर्ट्स आणि त्यावर क्रॉप टॉप असं लेअरिंगदेखील करता येईल. कॅज्युअल पार्टी, पिकनिक, फ्रेंड्स मीटसाठी हा परफेक्ट लुक.

पार्टी वेअरमधलं लेअरिंग : थंडीमध्ये डार्क रंग वापरणं जास्त प्रचलित आहे. मरून, बॉटल ग्रीन, ग्रे आणि काळा रंग तर यंगस्टर्सना थंडीत खूप अट्रॅक्ट करतो. पण त्याशिवाय पिंक, लेमन यलो, ऑरेंज, लाइट ब्लू हे कलर्स थंडीत मुलींवर जास्त छान दिसतात. कलरफुल सॉक्स आणि स्टॉकिंग्स थंडीतल्या लुकसाठी चेरी ऑन द केकसारखे असतात. थंडीच्या दिवसातील इव्हनिंग पार्टीमध्ये शॉर्ट वनपीस घातल्यास अशा स्टॉकिंग्ज उपयुक्त. पण थंडीत शॉर्ट ड्रेसपेक्षा ब्लॅक आणि डार्क कलरचे लाँग गाउन्स जास्त प्रिफर करावेत. लेअर्ड गाउन्स हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये कपडय़ांचे विविध लेअर देऊन फ्रीलचा लुक देण्यात येतो. लग्नाचा सीझन असल्याने अशा प्रकारच्या लेअर्ड गाउनला विशेष मागणी आहे. हे गाउन इंडो-वेस्टर्न प्रकारातही करून घेता येतात.

शॉल कुर्तीज : या थंडीत आलेला हा स्पेशल फॅशन ट्रेण्ड म्हणता येईल. स्टायलिस्ट सीमा सर्वटे सांगतात की, घरी असलेल्या, मिळालेल्या किंवा खास यासाठी घेतलेल्या विविध शॉल्स घेऊन मुली येतात आणि त्याचे स्टायलिश कुर्ते बनवून घेतात. ब्राइट कलर्सच्या शॉल्सपासून ते ब्राऊन, डार्क ग्रे, ब्लॅक हे रंग या कुर्तीसाठी डिमांडमध्ये आहेत. यामध्ये स्टँड कॉलर, कोटी अशी अनेक डिझाइन्स करता येतील. घरात पडून राहिलेल्या शॉल्सचा चांगला वापर होईल.

फूटवेयर : कपडे कितीही क्लासी असले तरी त्यावर शोभतील असे फूटवेयर नसले तर सगळा लुक खराब होण्याची शक्यता असते. थंडीत बूट्सची डिमांड वाढते. टाइट फिट, स्लिम फिट जीन्सवर हे बूट्स छान दिसतात. स्पोर्ट्स शूजमध्ये पण व्हरायटी आली आहे. ट्रॅडिशनल वेअरवर फ्रंट पॅक सँडल्स आणि हील्स किंवा बुटीज जास्त उठून दिसतात. वन पीस आणि गाउन्सवर स्टॉकिंग्स आणि हील्स उठून दिसतात. ओव्हरकोट घातल्यास त्यावर बूट्स जास्त चांगले दिसतील. सिंपल जॅकेट असल्यास सॉक्स आणि शूज क्लासी लुक देतील. घरी घालण्यासाठी फरचे फंकी लुक देणारे बुटीजदेखील सध्या मार्केटमध्ये दिसत आहेत.

अ‍ॅक्सेसरीज : हेडगीअर्स, कॅप्स, इयरपॅक्स आणि बऱ्याच थंडीच्या अ‍ॅक्सेसरीज कपाटात आल्या असतील. त्या वापरायच्या तर ठेवायला मोठी बॅग हवी हे लक्षात ठेवा. केस मोकळे सोडल्यामुळे क्राउन बेल्ट्सही वापरायला हरकत नाही. केस मोठे असल्यास सैलसर वेणी घातलेली पण छान दिसते. तसंच कॅप्समधून दोन पोनीज घालणं पण मुलींना आवडत आहेत.
थंडीमध्ये स्टायलिश दिसणं हे काही खूप कठीण नाही. सिंपल आणि स्मार्ट ट्रिक्स मेकओव्हर करू शकतात. मग थंडीनुसार करणार ना स्टाइल चेंज?

– निहारिका पोळ