आजघडीला बाजारात अशी एकही वस्तू उपलब्ध नाही, जिची जाहिरात केली जात नाही. जाहिराती नेमक्या कशासाठी असतात यामागची गुपितंही आता सर्वसामान्यांच्या चांगलीच लक्षात आली आहेत. एखाद्या वस्तूच्या विक्रीतून भरघोस नफा मिळविण्यासाठी किंवा कधी कधी केवळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरातीचा मोठय़ा खुबीने वापर केला जातो. वर्तमानपत्र, टीव्ही, चित्रपट, रस्त्यांवरील होर्डिग्ज, संकेतस्थळे आणि आता मोबाईलमधील प्रत्येक अ‍ॅपच्या मधेमधे लुडबुड करणाऱ्या या जाहिरातींचा अनेकदा राग येतो. परंतु, अशाही अनेक जाहिराती असतात ज्या आवर्जून पाहाव्याशा वाटतात. अवघ्या काही सेकंदांसाठी कुठल्याही वयाच्या व्यक्तीला आकर्षित करणाऱ्या आणि सफाईदारपणे आपल्या वस्तूचं महत्त्व पटवून देणाऱ्या जाहिराती बनवणं तितकं सोप्पं काम नाही हेदेखील नाकारता येणार नाही. कधीकधी चांगल्या जाहिराती दुर्लक्षित होतात आणि काहीवेळेस टुकार जाहिरातीतूनही विनाकारण वाद उभा राहतो. पण इंग्रजीत म्हणतात तसं, ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ या उक्तीनुसार सकारात्मक असो वा नकारात्मक, वस्तूला त्याचा फायदा होतोच.

जाहिरातींमध्ये प्रत्येकवेळी संबंधित वस्तूशी निगडितच गोष्टींचा वापर केला जातो असं नाही. म्हणजे पुरुषांच्या अंतर्वस्त्राशी, दाढीच्या ब्लेडशी, साबणाशी स्त्रीचा तसा काहीच संबंध नाही. परंतु, तिथेही स्त्री असतेच. यातील आणखीन एक वाईट गोष्ट म्हणजे काही वेळेस (खरं तर अनेकदा) स्त्रीला कमीतकमी कपडय़ांमध्ये सादर करण्याचाच प्रयत्न केला जातो. ग्राहक बाजारात जाऊन ती वस्तू विकत घेईल की नाही हे माहीत नाही, पण ‘चर्चा तर होणारच’ हा त्यामागचा उद्देश.

जाहिरातींबाबत एवढं सविस्तर लिहिण्यास कारण की, ‘सूटसप्लाय’ या कपडय़ांच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डने यापूर्वीही भडक जाहिरातींद्वारे खळबळ उडवून दिली होती. तेव्हा त्यांनी पुरुषांच्या कपडय़ांची जाहिरात करण्यासाठी महिलांचा वापर केला होता. हीच कंपनी न्यूयॉर्कमध्ये ‘सूटस्टुडिओ’ नावाची नवीन कंपनी सुरू करत आहे. त्याअंतर्गत त्यांनी महिलांनी वापरायच्या सूटची (शर्ट, पॅन्ट आणि जॅकेट) विशेष रेंज जाहिरातीद्वारे सादर करत ‘नॉट ड्रेसिंग मेन’ ही टॅगलाईन वापरली आहे. या जाहिरातीही तितक्याच भडक आहेत, जितक्या आधीच्या होत्या. फॉर्मल सूट परिधान केलेली महिला सोफ्यावर मोठय़ा दिमाखात बसलेली आहे आणि तिच्या शेजारी नग्न पुरुष झोपला आहे, एक महिला कोचावर पाठ टेकविण्याच्या ठिकाणी वर बसली असून बसण्याच्या जागी नग्न पुरुष झोपलेला आहे. त्याच्या गुप्तांगावर त्या महिलेचा एक पाय आहे, महिला व पुरुष खिडकीबाहेर पाहत आहेत. पण महिला सूटमध्ये आणि पुरुष पूर्णपणे नग्न, अशा छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर सध्या हे अ‍ॅड कॅम्पेन चांगलंच गाजतंय.

महिलांच्या कपडय़ांच्या जाहिरातीमध्ये खरंतर पुरुषांची काहीच भूमिका नाही. मात्र, या जाहितीमध्ये नग्न पुरुषांचा ऑब्जेक्ट म्हणून वापर करण्यात आलाय आणि यावरूनच उलटसुलट चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. महिलांना नग्न दाखवल्यास स्त्रीवादी संघटना जागृत होतात आणि समानतेची भाषा करतात. मग आता समानता कुठे गेली असा सवाल अनेकजण उपस्थित करतायत. काहीच्या मते इथे पुरुषाला नग्न दाखविल्यामुळे महिलेच्या ड्रेसिंगकडे नाही तर पुरुषावरच लक्ष केंद्रित झालंय. त्यामुळे नग्न शरीराच्या मदतीनेच वस्तू विकल्या जातात का? अशीही चर्चा रंगत आहे. पूर्ण कपडे घालूनदेखील स्त्रिया किती सुंदर दिसतात आणि पुरुषांनीही (नग्न) महिलांचं लक्ष वेधलेलं आहे असं सांगत अनेकांनी ही जाहिरात आवडल्याची कबुली दिली आहे. प्रेमात आणि फॅशनमध्ये सगळं माफ असतं. त्यामुळे जाहिरात म्हणून ती चांगलीच आहे, त्याला इतर बाबींशी जोडणं मूर्खपणाचं ठरेल, असा युक्तिवादही होताना दिसतोय. स्त्रियांच्या वस्तूंसाठी नग्न पुरुषांचा वापर हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. १९९० साली अमेरिकन सुपमॉडेल क्रिस्टी टर्लिगटन हिने ‘वरसाचे’ या ब्रॅन्डसाठी केलेल्या जाहिरातीमध्येही नग्न पुरुषांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर पुढील सलग चार वर्षे ‘वरसाचे’ने आणि १९९५ साली इटलीच्या ‘वॅलेंटिनो’ या कंपनीनेदेखील सुपरमॉडेल्सना घेऊन हीच संकल्पना ठेवून जाहिराती केल्या होत्या. जाहिरात संकल्पना म्हणून कदाचित अशा जाहिराती वेगळ्या ठरतील. परंतु, पुरुषांच्या वस्तूंच्या जाहिरातीमध्ये स्त्रियांना कमीपणा देणे आणि स्त्रियांशी संबंधित वस्तूंच्या जाहिरातीमध्ये पुरुषांना कमीपणा देणे कितपत योग्य आहे? एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे केवळ जाहिरातबाजी किंवा लोकप्रियतेच्या आहारी जात मूल्यांना हरताळ फासायचा हे बरोबर आहे का? लिंगभेद संपविण्याच्या कितीही चर्चा होत असल्या तरी अनेकदा जाहिरातीमध्ये पुरुषांना श्रेष्ठ आणि स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, हे सत्य नाकारता येणार नाही. पण त्याचा अर्थ हा नव्हे की स्त्रियांची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या पुरुषांना कमी लेखावं. यामुळे स्त्रियांना मान मिळणार नाही तर केवळ सुडाच्या भावनेला बळ मिळेल. हा विरुद्ध लिंगवाद थांबविण्यासाठी स्त्री-पुरुष दोघांनाही समान वागणूक द्यावी लागेल. त्यासाठी जाहिरात तयार करणाऱ्यांना अधिक कल्पकतेनं विचार करावा लागेल; अन्यथा लिंगवादाच्या चर्चेला कधीच पूर्णविराम मिळणार नाही.

viva@expressindia.com