गेल्या आठवडय़ात संमेलनगीताची चाल देणारी संगीतकार म्हणून तिचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं. नाटक, लघुपट, ऑनलाइन म्युझिक शो, अल्बम आदी माध्यमांतून ती वैविध्यपूर्ण संगीत देते आहे. म्युझिकल मेसेंजरया संगीत क्षेत्रातील अभिनव स्टार्टअपला तिनं जन्म दिलाय. शब्द आणि सुरांच्या सहवासात रमणारी ही कल्लाकार आहे सुखदा भावेदाबके.

नुकत्याच डोंबिवलीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ‘संमेलनगीता’ने संगीतमय सुरुवात केली होती. ‘सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन, शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जिवाशिवाचे मीलन..’ हे संमेलनगीत रसिकांना भावलं. हे गीत लिहिलंय आनंद पेंढारकर यांनी आणि संगीतबद्ध केलंय सुखदा भावे-दाबकेनं. या गीताची धून संमेलनातील सत्काराच्या वेळी वेळोवेळी वाजवली गेली. ‘यूटय़ूबवर’ संमेलनगीताला पहिल्या तीन दिवसांत हजारांवर व्ह्य़ूज मिळाले. डोंबिवलीकर सुखदा सांगते की, ‘‘डोंबिवलीतील कलाकारांसह एक कलाकृती सादर करायची माझी इच्छा होती. या गीतात सर्व स्तरांतील आणि सर्व वयोगटांतील कलाकारांचा समावेश असून एकूण चाळीस जणांची ही टीम होती. पहिल्यांदाच साहित्य संमेलनासाठी असं गीत रचलं गेलं आहे.’’

सुखदाच्या शुभसूर क्रिएशन्सतर्फे सादर करण्यात आलेली म्युझिकल मेसेंजर ही अभिनव संकल्पना आहे. म्युझिकल मेसेंजर ही ऑडिओ फॉर्ममधली पर्सनलाईज्ड मेसेजिंग सव्‍‌र्हिस म्हणता येईल. गेल्या वर्षी सुखदा आणि पराग दाबके यांनी ही सेवा सुरू केली.  म्युझिकल मेसेंजरला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. वाढदिवस, सणसमारंभ, आनंदसोहळा, अगदी दिलगिरीसुद्धा.. प्रत्येक भावनेला सुरांच्या कोंदणात गुंफता येतं. एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीसाठी म्युझिकल मेसेज करायचा असल्यास ‘शुभसूर’शी संपर्क साधायचा. मग त्या व्यक्तीशी बोलून तिला मेसेजमध्ये काय म्हणायचंय, ते जाणून घेऊन त्यानुसार छानशी जिंगल तयार केली जाते. या जिंगलमध्ये एखादी गोष्ट त्या व्यक्तीनं स्वत: केलेली असेल. उदाहरणार्थ- शब्द, चाल किंवा ते गाणं म्हणणं, तर या ‘म्युझिकल मेसेंजर’ला पर्सनल टच येतो. आतापर्यंत केलेल्या म्युझिकल मेसेजेसनी इमोशनली खूप धमाल उडवली आहे.

आतापर्यंत या सेवेचा वापर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला, निरोप समारंभ किंवा रिटायर्डमेंट फंक्शन्समध्ये योग्य संदेश द्यायला, सॉरीचे सांगितिक मेसेज देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर झालाय, असं सुखदा सांगते. ‘मेसेज पाठवायचं ठरल्यावर सगळ्या प्रोसेससाठी तीन-चार दिवस लागतात. पण प्रसंगी आयत्या वेळी काही निमित्त साधायचं असेल तरीही हा मेसेज पाठवता येतो. आता व्हॅलेंटाइन डेच्या पाश्र्वभूमीवर काहीजणांनी म्युझिकल मेसेंजरचा वापर करायचं ठरवलं आहे. त्यात प्रपोज करणारा रोमँटिक म्युझिकल मेसेज आहे, व्हॅलेंनटाईन डेचं महात्म कपलपेक्षा आणखी कुणाला असणार? त्यामुळं त्यानिमित्तानं पार्टनरला केलेला मेसेजही तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत हे मेसेज मराठी, हिंदी आणि मुख्यत्वे तरुणाईसाठी असल्यास ‘मिंग्लिश’मध्ये तयार केले गेलेत. शब्द मेसेज पाठवणाराही देऊ शकतो किंवा सुखदा—पराग ते लिहितात. ते त्यांना पाठवले जाऊन कन्फर्मेशन घेतलं जातं. नंतर त्या शब्दांना चाल लावून पाठवली जाते. क्वचित काही वेळा अ‍ॅडिशन हवी असेल तर ती केली जाते.’

‘एका गुराख्याचे महाकाव्य’ या रसिकांनी नावाजलेल्या प्रायोगिक नाटकाची संगीतकार आहे सुखदा.

त्यासाठी तिला राज्य  नाटय़स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय पारितोषिकासह झी गौरव पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. तिनं ज्येष्ठ  कलाकार उषा नाडकर्णी यांची भूमिका असणाऱ्या ‘लंडनच्या आजीबाई’ या व्यावसायिक नाटकाला संगीत दिलंय. ‘झी मराठी’वरील ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेतील ‘वेडे मन’ हे तिचं गाणं तरुणाईला फारच भावलं होतं. साम मराठीवरील ‘कादंबरी’मधल्या ‘श्रीकृष्णाची मधुर बासरी’ या गाण्यालाही तिनं संगीत दिलं होतं. कल्याण-डोंबिवली महापालिकेसह काही संस्थांनी आयोजिलेल्या ‘शताब्दी राष्ट्रगीताची’ या कार्यक्रमात ‘संपूर्ण जन गण मन’ची रिअरेंजमेंट तिनं केली. ३५०० शालेय विद्यार्थ्यांनी गायलेल्या राष्ट्रगीताची दखल ‘लिम्का बुक ऑप रेकॉर्ड्स’मध्ये घेतली गेली.

संगीताबद्दल ती सांगते की, ‘‘कम्पोझिंग करताना कधी आधी शब्द मिळतात आणि त्याला चाल लावली जाते, तर कधी चाल आधी तयार करायची असते आणि शब्द बरोबरीनं किंवा नंतर मिळतात. शब्द आधी मिळतात तेव्हा त्या शब्दांचा अर्थ, त्याच्या व्याकरणाला हानी न होता कसा पोहोचवता येईल, यावर माझा भर असतो. चालीपेक्षा शब्दाला अधिक महत्त्व देते. आधी चाल बांधताना कोणत्या गोष्टीसाठी गाणं हवं आहे, हे भान आणि संभाव्य परिणाम लक्षात ठेवला जातो. दोन्हीत गाण्याचा फील महत्त्वाचा असतो.’’

लहानपणी हार्मोनिअम शिकताना गाणं कसं तयार होतं, याविषयी कुतूहल वाटलं. मग त्याविषयी एकेका टप्प्यावर ती अधिक जाणून घेऊ  लागली. तिनं मुंबई विद्यापीठात ‘म्युझिक कम्पोझिशन अ‍ॅण्ड डायरेक्शन’, ‘अ‍ॅडव्हान्स साऊंड रेकॉर्डिग अ‍ॅण्ड रिप्रॉडक्शन’ हे कोर्सेस केले. गेली सहा र्वष ती कलाक्षेत्रात विविधांगी कामगिरी करते आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘कॉमेडी एक्स्प्रेस’च्या एक्स्प्रेस बॅण्डमध्ये ती म्युझिशिअन होती. तिच्या ‘दुर्वाकुर’ या पहिल्या अल्बमचं प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झालं. ‘‘माझ्या आदर्श संगीतकारांपैकी एकाच्या हस्ते अल्बमचं प्रकाशन होणं, हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा एक क्षण होता,’’ असं ती सांगते. त्यानंतरच्या ‘निसर्गायन’ या अल्बमलाही चांगला प्रतिसाद मिळाला. तिनं संगीत दिलेल्या ‘मेकिंग ऑफ परशुराम’ या लघुपटाची नवी दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि ‘लेफ्ट हॅण्ड रुल’ या लघुपटाची गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली होती. त्याखेरीज ‘अंत:स्थिती’, ‘बुद्धी’, ‘चार्ली द स्माइल’ या लघुपटांनाही संगीत दिलंय. मध्य रेल्वेच्या ‘मोबाइल तिकीट प्रणाली’ची माहिती देणारी जिंगल तिनं तयार केली आहे.

‘किंगफिशर स्ट्राँग बॅकस्टेज, महाराष्ट्र एडिशन २०१५’ या यूटय़बवरील ऑनलाइन शोमध्ये काम करायची संधी सुखदाला मिळाली. या कार्यक्रमात भारतभरातून काही जणांची निवड केली जाते. त्यापैकी महाराष्ट्रातील सेलेब्रिटी सिंगरना कम्पोज करण्यासाठी सुखदाची निवड झाली होती. तिनं लिहिलेलं आणि संगीत दिलेलं ‘लावण्याची खणी’ हे गाणं लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडेनं गायलं. रेकॉर्डिग पूर्ण झाल्यावर गाणं पुन्हा ऐकताना शाल्मलीला अगदी भरून आलं. ‘मी आतापर्यंत असं गाणं गायलेलं नाही,’ असं म्हणत तिनं सुखदाला मिठीच मारली होती.

बोलता बोलता तिला आठवतो, साधारण २००९च्या सुमाराचा एक किस्सा. ती सांगते की, ‘‘खळेकाकांना भेटायचा योग आला होता. त्यांना वाटलं, मी ‘सारेगमप’मधली स्पर्धक आहे. मी संगीत देते आणि माझी संगीतकार व्हायची इच्छा आहे, हे कळल्यावर त्यांना आनंद झाला. त्यांनी माझी एखादी चाल गाऊन दाखवायला सांगितली आणि मला सांगितलं की, ‘चाल ऐकवण्यासाठी साथीला माझी हार्मोनियम घे.’ त्या क्षणी त्यांच्या हार्मोनियमला पहिल्यांदा हात लावताना मन फार भरून येत होतं.. मी आजही तो क्षण विसरू शकणार नाही. त्यांनी अगदी कौतुकानं चाल ऐकली. त्यांना ती आवडली. मी प्रोग्रामिंगही करते, हे कळल्यावर त्यांनी त्याबद्दलही उत्सुकतेनं माहिती घेतली. त्यांनी भेट दिलेला त्यांचा अल्बम आजही जपून ठेवला आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात इतक्या दिग्गज कलाकारांचे आशीर्वाद मिळाले, यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे. संगीताची आवड जोपासायला मदत करणारे आई-बाबा आजी, बहीण आणि सतत प्रोत्साहन देणारे प्रेमळ सासू-सासरे आणि भक्कम साथ देणारा कलाकार नवरा पराग.’

सुखदानं आतापर्यंत जवळपास सगळ्या बाजाच्या गीतांसाठी चाली बांधल्या आहेत. अशोक पत्की, श्रीनिवास खळे, आर. डी. बर्मन, यानी, मोझार्ट, बिथोवन आदी संगीतकार तिचे आयडॉल आहेत. आशा भोसले यांनी आपल्याकडं गावं, अशी तिची इच्छा आहे. सध्या ती ‘शोधयात्री’ ही कॉन्सर्ट सादर करतेय. यात तिचं संगीत आणि परागच्या कविता आहेत. शब्दतालसुरांच्या आविष्कारांतून उलगडतो एक काव्यप्रवास. आपण अनुभवलेल्या, अनुभवत असलेल्या आणि अनुभवू इच्छिणाऱ्या भावना, अपेक्षा आणि कल्पनांचा लेखाजोखा यानिमित्तानं सात जणांची टीम मांडते. ‘‘प्रत्येक जण सतत कोणत्या ना कोणत्या शोधात असतोच, त्या शोधांचा हा एक प्रवास आहे,’’ असं ती म्हणते. मनस्वी कलावंत असणाऱ्या सुखदाच्या पुढील ‘सांगीतिक शोधयात्रे’साठी सुरेल शुभेच्छा.