उन्हाळ्यात शरीराची उन्हापासून काळजी महत्त्वाची असतेच, घामाच्या चिकचिकाटात मेकअप- दागिने तर नकोच वाटतात, तरीही प्रेझेंटेबल तर राहावंच लागतं. कूल अ‍ॅक्सेसरीजचा वापर त्यासाठी चलाखीनं करायला हवा. या उन्हाळ्यात तुम्ही एकदम कूल दिसावं आणि तसंच वाटावं म्हणूनच या ऋतूतील ट्रेंडिंग अ‍ॅक्सेसरीजबद्दल थोडंसं..

सनग्लासेस

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा हॅट महत्त्वाची तेवढाच डोळ्यांवर कूल गॉगलसुद्धा महत्त्वाचा आहे. आयवेअर किंवा सनग्लासेसच्या बाजारात यंदा प्रचंड वैविध्य आहे. ऑनलाइन बाजारात फेरफटका मारलात तर हे जाणवेल. गॉगलची खरेदी मात्र शक्यतो प्रत्यक्ष दुकानात केलेली बरी, कारण काचेचा रंग, डार्कनेस, आकार या गोष्टी स्क्रीनवर वेगळ्या आणि प्रत्यक्षात वेगळ्या दिसू शकतात. शिवाय तुमच्या चेहऱ्याला शोभेल असे सनग्लासेस घेतलेले बरे. सध्या कॅट आईज, एव्हिएटर्स आणि राऊंड शेप्ड सनग्लासेसची चलती आहे. त्याचबरोबर क्लबमास्टर्स (वरची अर्धी फ्रेम जाड आणि चौकोनी आणि खाली पातळ राऊंड शेप)आणि वेयफेयर्स म्हणजे चौकोनी आकाराचे गॉगलदेखील दिसू लागले आहेत. सध्या तरुण मुलींमध्ये हटके ट्रेण्ड आहे हार्ट शेप्ड ओव्हरसाइज्ड सनग्लासेसचा. असा गॉगल घालायला पेहरावही तसाच हटके हवा आणि तो कॅरी करण्याचा आत्मविश्वास हवा. मेटॅलिक फीदर कॅट आईज आणि व्हिंटेज कॅट आईज, पोल्का डॉट कॅट आईज हे रेट्रो फॅशन आवडणाऱ्यांसाठी आवडीचे आकार आणि पॅटर्न असू शकतात. पार्टीमध्ये किंवा डे आऊटिंगसाठी सगळ्यांहून वेगळं दिसायचं असेल तर असे गॉगल एकदम हिट; पण रोज वापरायला कुठल्याही आऊटफिटला शोभतील असे हवे असतील तर एव्हिएटर्सना पर्याय नाही.

नुकत्याच येऊन गेलेल्या ‘रईस’मध्ये शाहरुख खानने वापरलेला ब्रिजवाला काचेचा चष्मा सध्या अनेक मुलांच्या डोळ्यांवर दिसतो आहे.

शूज

कुठलंही कॅज्युअल वेअर शूजशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सध्या शूज म्हटलं की स्नीकर्सच डोळ्यापुढे येतात, एवढे स्नीकर्स सध्या ट्रेण्डइन आहेत. हे शूज पायांना जितके आरामदायी तितकेच दिसायला कूल. त्यामुळे शॉर्ट ड्रेस, जीन्स, केप्री, डे ड्रेस कशावरही स्नीकर्स वापरायला हरकत नाही. मुलींच्या स्नीकर्समध्ये सिंपल वनटोन किंवा व्हाइट स्नीकर्सच्या बरोबरीने प्रिंटेड, कलरफुल पॅटर्नही आले आहेत. स्नीकर्सव्यतिरिक्त मुलींसाठी ग्लॅडिएटर्स, फ्लॅट्स, फ्लिप-फ्लॉप्ससुद्धा उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात हिल्स नकोशा असल्या तरी कधी तरी पार्टीला वगैरे जाताना प्लॅटफॉम्र्स, स्टिलेटोज किंवा वेजेस नक्कीच उठून दिसतील. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी किटन हिल्स म्हणजे अगदी छोटय़ा हिल्सचा ट्रेण्ड इन आहे.

पायात स्नीकर्स, डोळ्याला क्लबमास्टर्स, त्यासोबतीला फंकी स्लिंग बॅग शॉर्ट स्कर्ट, टॉप आणि एखादा छानसा स्कार्फ घेतलात की उन्हाळ्यातला कूल लुक परफेक्ट जमलाच म्हणून समजा. वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! हॅपी समर!

बॅग

फॅन्सी गॉगलच्या सोबतीला हाती ट्रेण्डी बॅगही हवीच की! स्लिंग बॅगची फॅशन या उन्हाळ्यातही कायम राहणार आहे. वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळ्या रंगांच्या स्लिंग बॅगचे अनेकविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून ते ब्रॅण्डेड लेदर बॅग हवी असल्यास २५ हजारांपर्यंत एवढय़ा मोठय़ा रेंजमध्ये अशा स्लिंग बॅग दिसतात. उन्हाळ्यात ब्राइट कलरची बॅग ट्रेण्डी दिसू शकेल. कुर्त्यांवर वापरण्यासाठी कॉटनफिनिश आणि किंवा पार्टी ड्रेसवर मेटॅलिक फिनिशच्या स्लिंग बॅग शोभून दिसतील. याशिवाय सध्या कॉटनच्या बॅगवर राजस्थानी पद्धतीचं जरदोसी वर्क केलेल्या बॅग्जपण फंक्शनल वेअरवर शोभून दिसतील. रंगीबेरंगी धाग्यांच्या एम्ब्रॉयडरीच्या छोटय़ा-मोठय़ा बॅग्जसुद्धा सध्या चलतीत आहेत. एथनिक लुक पूर्ण करण्यासाठी या बॅग आवश्यक. कॉटनच्या मोठय़ा बॅग्जवर तुम्हाला हवं ते चित्र आणि वाक्य रंगवून घेण्याचीही हल्ली पद्धत आहे. अशा कस्टमाइज्ड मेसेज बॅग्ज ऑनलाइन बाजारात तसंच मोठय़ा मॉल्समध्ये किंवा प्रदर्शनांमध्ये बघायला मिळतात. कॉटन बॅग्स वापरायला अगदी सोप्या आणि हलक्या असतात आणि तरीही मजबूत असतात. कॅनव्हास बॅगपॅक, वन शोल्डर बॅगचासुद्धा सध्या ट्रेण्ड आहे. कॅनव्हास बॅगवर झुपके, गोंडे, खिसे किंवा पिसांचे आकार अशा गोष्टींनी सजावट केलेली असते. फंकी कलेक्शनची आवड असेल तर या बॅग चांगल्या दिसतील.