अनेक दिवसांनंतर खाबू मोशायला मुंबईत उत्तम मासे खाऊ  घालणारं ठिकाण मिळालं. अशा परिस्थितीत खाबू स्वत:च्या जिभेला आवर घालू शकला असता, तरच नवल! या मत्स्याहारानंतर भर ऑक्टोबरच्या  पावसामुळे चिखलमय झालेले मुंबईतले रस्तेही सुखावह वाटू लागले..

सध्या खाबूमोशायला पूर्वजन्म वगैरेंचं वेड लागलंय. मध्यंतरी खाबूने यासंबंधी अनेक पुस्तकं वाचली. इतर काही करण्यासारखं नव्हतं, हा एक भाग आणि ‘वाचाल तर वाचाल’ हे लहानपणी शिकवलेले वचन खाबू नेहमीच अमलात आणतो, हा दुसरा. तर मुद्दा असा की, खाबू मोशायने ही पुस्तकं वाचून स्वत:बाबत एक सिद्धांत मांडला आहे. गेल्या जन्मी खाबू मनुष्यप्राणी नक्की नव्हता. गेल्या जन्मी तो घ्राणेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असलेला एखादा कुत्रा वगैरे असणार. एक वेळ खाबूला आपल्या बुद्धीचा अभिमान नसेल, पण वास घेण्याच्या क्षमतेचा नक्कीच अभिमान आहे. पण त्यातही खाबूने आपलं नाक खाद्यपदार्थाच्या वासासाठी प्रशिक्षित केलं आहे. त्यामुळे खाबू कढईत पडलेली भाजी भेंडी आहे की गवार, हे जसं ओळखू शकतो तसंच, तव्यावर पडलेला मासा पापलेट आहे, बांगडा आहे की सुरमई आहे हे त्याच्या नाकाला लगेच कळतं.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

या गोष्टीचा प्रत्यय खाबूला नुकताच आला. खाबू त्याच्या कामाच्या निमित्ताने लालबाग-परळ या त्याच्या आवडत्या भागात फिरत होता. गणेशोत्सव वगळला, तर खाबूला या भागात फिरायला खूप आवडतं. आता तुम्ही म्हणाल, गणेशोत्सव वगळला, तर या भागात आहे काय फिरण्यासारखं? पण खाबूला इकडच्या मुंबईचा वेगळा रंग आवडतो. सांस्कृतिकदृष्टय़ा अत्यंत सजग असा हा भाग नेहमी नांदता असतो. त्याशिवाय काही खास ठेवणीतली दुकानंही याच भागात आहेत. त्यामुळे खाबू अधेमधे या भागात चक्कर मारून इथल्या चाळी, काही मिल्स आदी वास्तूंचं दर्शन करून घेत असतो. या भागातल्या चाळी आणि अगदी मोजक्या गिरण्या आणखी किती दिवसांच्या सोबती आहेत, कोणास ठाऊक! त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी खाबू आवर्जून जात असतो.

असाच करीरोड, चिंचपोकळी भागांतून चालताना खाबूला थेट भायखळ्यापर्यंत चालत जाण्याची हुक्की आली. खाबूने पावलं चालवायला सुरुवात केली. भायखळ्यापर्यंत चालत जाऊन तिथल्या एखाद्या इराण्याकडे किंवा मोगलाई हॉटेलात रोटय़ा तोडण्याचा विचार करून टळटळीत दुपारी खाबू तंगडतोड करायला लागला. चिंचपोकळीच्या पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला मारुती सुझुकीची एक शोरूम लागली. त्याच्या पुढे फुटपाथवरून चालत असताना खाबूला एका गाळ्यासमोर एक घोळका उभा असलेला दिसला. बालसुलभ कुतूहलानं खाबू त्या घोळक्यापर्यंत पोहोचला. त्या घोळक्याजवळ गेल्यानंतरच तव्यावर पडलेल्या सुरमई, पापलेट आणि बांगडा अशा माशांच्या घमघमाटाने खाबूच्या मनाचा ठाव घेतला. त्या घोळक्याच्या एका टोकाला असलेला गाळा म्हणजे साई सुवर्ण नावाचं एक छोटंसं हॉटेल होतं. लालबाग भागात असलेल्या अनेक खानावळींप्रमाणेच ही एक खानावळ!

खाबू या ठिकाणी पोहोचला तेव्हा भुकेची वेळ होती. त्यामुळे आसपासच्या ऑफिसांमधली तमाम बाबू मंडळी टायची गाठ सैल वगैरे करून या खानावळीत जेवायला आली होती. कसंबसं खाबूने त्या गर्दीत शिरकाव करून नंबर लावला. तब्बल २० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर खाबूला जागा मिळाली. ही २० मिनिटं खाबूच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण २० मिनिटांपैकी एक होती. खाबूच्या खाबूगिरीतील प्रेयस असलेल्या माशांचा नुसता वास घेत बसायचं, हीदेखील एक तपश्चर्या आहे. ती पार पाडल्यानंतर खाबू खानावळीत शिरता झाला. खालच्या भागात चार टेबलं, वर पोटमाळ्यावर जाणारा जिना आणि वरतीही चार टेबलं एवढाच या खानावळीचा आवाका आहे.

खाबूने बसल्या बसल्या एकदा तिकडे मेन्यू लिहिलेल्या फळ्यावर नजर टाकली. चिकन मसाला थाळी, अंडा मसाला थाळी, कोलंबी थाळी, बांगडा, पापलेट, सुरमई आणि बोंबिल अशा प्रत्येक माशांची थाळी आणि त्यांच्यापुढे किमती लिहिलेल्या त्या फळ्याच्या उजव्या बाजूकडे खाबूची नजर स्थिरावली. या थाळीच्या किमतीही बऱ्याच स्वस्त होत्या. सुरमई आणि पापलेट ही त्यातल्या त्यात मातबर मंडळी १५० रुपयांमध्ये ताटात येणार होती. कोलंबी, बांगडा आणि बोंबिल यांच्यासाठी मात्र १०० रुपये मोजावे लागणार होते. खाबूने बऱ्याच दिवसांत सुरमई खाल्ली नसल्याने खाबूने सुरमई थाळी मागवली. तेवढय़ाने भागणार नाही, हे लक्षात घेऊन त्याने एक बांगडा फ्रायही मागवला.

पाचच मिनिटांमध्ये खाबूसमोर त्याचं ताट आलं होतं. त्यात सुरमईच्या दोन तुकडी, करी, दोन मुदी भात, तीन पोळ्या आणि जवळा असा ऐवज होता. खाबू त्या सोनेरी वर्खाच्या सुरमईच्या दर्शनानेच भारावून गेला होता. त्यात तो घमघमाट! थाळी पुढय़ात आल्यानंतर आसपासच्या जगाला फाटय़ावर मारून खाबूने सुरमईवर ताव मारायला सुरुवात केली. करीची चवही अस्सल मालवणी ढंगाची होती. तिरफळाचा तिखटपणा, आमसुलाचा आंबटपणा आणि माशाचा एक अनोखा स्वाद यांमुळे या करीला घासाघासाला दाद देत खाबूने तिचा आस्वाद घेतला. जवळ्याची चटणी नावाचा प्रकारही खूप उत्तम होता. जवळा हादेखील खाबूच्या अगदी मनाच्या जवळचा प्रकार. त्याच्या वासानेच खाबू आडवा होतो.

सुरमईचा उपभोग घेण्यात खाबू दंग असताना त्याच्या समोर तळलेला बांगडा आणून ठेवला. मासे खाणाऱ्या लोकांमध्ये पट्टीचे मासे खाणारेच बांगडय़ाच्या वाटेला जातात. बांगडा हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे! खाबू बहुधा अभिमन्यूसारखाच आईच्या उदरातूनच बांगडय़ाचे काटे चुकवायची विद्या घेऊन जन्माला आलेला! त्यामुळे लहानपणापासूनच बांगडा हा खाबूचा खूप लाडका मासा आहे. हा मासा खूप वैस असतो आणि काहीसा उग्र असतो, ही त्याच्याबाबत नेहमीची तक्रार. ‘नाचता येई ना, अंगण वाकडे’, या म्हणीसाठी इतकं चांगलं उदाहरण दुसरं शोधून सापडणार नाही. खाबूने आपली कृपादृष्टी सुरमईवरून बांगडय़ावर वळवली. एखाद्या लहान मुलाचा हातानेच पापा घ्यावा, तेवढय़ाच लडीवाळपणे खाबूने बांगडय़ावरील तो तांदूळ-रव्याचा अलौकिक वर्ख बाजूला करून एक तुकडा तोंडात सारला. वास्तविक खाबू बाहेर खायला गेल्यावर बांगडय़ाच्या वाटेला जात नाही. तो करण्यासाठी जाणता हात लागतो. पण या हॉटेलमधल्या बांगडय़ाने खाबूचा विश्वास सार्थ ठरवत खाबूला प्रसन्न केलं.

सुरमई आणि बांगडा हे दोन्ही भिन्न स्वादांचे मासे एकाच ताटात नांदत होते. खाबूने थाळीत भाताला हात घातला. तिथल्या माणसाने तत्परतेने लगेचच माशाची करी आणून भातावर वाढली. एका घासाला सुरमई आणि दुसऱ्याला बांगडा असे तोंडी लावत खाबूने तो भातही फस्त केला आणि भरल्या पोटाने तृप्त ढेकर दिली. (ढेकर दिली की दिला, हा वादाचा विषय असू शकतो. पण खाबू ‘ती ढेकर’च्या बाजूने आहे.) एवढय़ा सगळ्या खादाडीचं बिल फक्त २०० रुपयांच्या आसपास झालं होतं. खाबूने अगदी खुशीखुशी खिशातल्या शंभराच्या दोन नोटा काढून दिल्या आणि समोरच्या प्लेटमध्ये आलेली बडीशोपही न घेता तो हॉटेलची पायरी उतरला.

भायखळ्याकडे येताना खाबूचं पोट तट्टं भरलं होतं. अशा माशांच्या जेवणानंतर हमखास येणारी पेंगही डोळ्यांवर आली होती. जड डोळ्यांनी खाबू लालबागच्या उड्डाणपुलाखालचा तो रस्ता तुडवत होता. तेवढय़ात त्याला बाजूच्या एका छोटय़ा हॉटेलमध्ये कॅरॅमल कस्टर्ड दिसलं. पण एवढय़ा सुंदर पद्धतीने केलेल्या माशांच्या जेवणाची चव जाऊ  नये, म्हणून खाबूने मान दुसरीकडे वळवत भायखळा स्टेशन गाठलं. खाबूच्या आयुष्यात एखाद्या पदार्थाचा आब राखण्यासाठी त्याने कॅरॅमल कस्टर्डकडे पाठ फिरवण्याचा हा पहिलाच आणि कदाचित शेवटचाच प्रसंग!

कुठे : हॉटेल साई सुवर्ण

कसे जाल : भायखळा स्थानकात उतरल्यावर दादरच्या टोकाच्या पुलावरून पूर्वेकडे या. स्थानकातून बाहेर पडून मुख्य रस्त्याला येऊन दादरच्या दिशेने चालायला लागा. लालबागच्या फ्लायओव्हखालून रस्ता ओलांडून समोरच्या फुटपाथला जा. साधारण पाच-सात मिनिटं चालल्यावर उजव्या हाताला पोलीस उपायुक्तांचं एक कार्यालय लागतं आणि उजवीकडे वळणारा एक रस्ता येतो. तो रस्ता ओलांडल्यावर समोरच शोभा नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूलाच ही छोटीशी खानावळ आहे.

खाबू मोशाय