टीम इट अपकॅज्युअल, फॉर्मल, एथनिक, फेस्टिव्ह, पार्टी वेअर असे कप्पे न पाडता यातलं हवं ते, सोयीप्रमाणे आणि पसंतीप्रमाणे टीम-अप करून एक वेगळा फ्युजन लुक मिळू शकतो. ‘हा टीम इट अप’ट्रेण्ड नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटवर दिसून आला. हा ट्रेण्ड बॉलीवूड सेलेब्रिटींना क्लासी लुक देऊन गेला.

‘मिक्स अँड मॅच’चा फॅशन ट्रेण्ड आपल्याकडे गेली अनेक र्वष आहे. प्रत्येकीने तो कळत-नकळत फॉलो केला असेल. खरं तर आता तो खरेदीचाच पॅटर्न बनून गेलाय. उदाहरणार्थ पंजाबी सूट.. म्हणजे सलवार किंवा चुणीदार, कुर्ता आणि दुपट्टा असं सगळं एकगठ्ठा संचातून खरेदी करायचे दिवस आता गेले. आता खरेदीचा ट्रेण्ड आहे तोच मुळी मिक्स अँड मॅचचा. आवडलेला कुर्ता निवडायचा आणि त्यावर सूट होणारी हव्या त्या पॅटर्नची चुणीदार किंवा लेगिंग्ज घ्यायची. मग हवं तर त्यावर एखादा फंकी स्टोल किंवा दुपट्टा किंवा एथनिक जॅकेट.. हवं ते मॅच करायचं. हा क्रम उलटाही असू शकतो बरं का! म्हणजे आपल्याला हव्या त्या रंगाचा सलवार- दुपट्टा आधी घ्यायचा आणि मग त्यावर काय घालू शकतो ते हुडकून शॉर्ट कुर्ता, कुर्ती असं काही घ्यायचं. ही खरेदीची पद्धत आता बरीच कॉमन आहे. टीम इटअप हा फॅशन ट्रेण्ड त्याच्या पुढे नेणारा आहे. म्हणजे आता एथनिक-फॉर्मल, कॅज्युअल-एथनिक असे कपडेदेखील मिक्स अँड मॅच केले जाऊ शकतात. किंबहुना याचे यशस्वी प्रयोग नुकतेच विविध अ‍ॅवॉर्ड फंक्शन्सच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. अनेक सेलेब्रिटींनी एकाच डिझायनरचा अखंड कॉस्च्युम सिलेक्ट करण्याऐवजी, वेगवेगळे डिझायनर वेअर टीम-अप करून हटके लुक मिळवलेला दिसला.
नुकत्याच झालेल्या उमंग २०१६ या पोलिसांच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये हजेरी लावताना अभिनेत्री आलिया भट एकदम हटके आउटफिटमध्ये दिसून आली. एक मस्त फॉर्मल वाटावा असा कॉलरचा शर्ट आणि त्याबरोबर एथनिक हाय वेस्टेड फ्लोअर टच स्कर्ट (..खरं तर लेहेंगा असंही या स्कर्टला म्हणता येईल) तिने टीम अप केलेला होता. पारंपरिक लेहेंग्यावर असा शर्ट टीम अप करण्याची आयडिया एकदम युनिक होती आणि त्यानं तिला अगदी क्लासी लुक दिला. शिल्पा शेट्टीसुद्धा या कार्यक्रमात खूप युनिक लुकमध्ये दिसून आली. एलीगंट बोट नेक क्रॉप टॉप तिनं घालता होता आणि तो टीम अप केला होता मल्टी कलर्ड चेकर्ड साडीमध्ये. क्रॉप टॉपचं इथे फुल स्लीव्ज ब्लाउज झालं आणि त्यानं साडीला वेगळा लुक दिला.
अशा प्रकारची कोणतीही नवी फॅशन प्रथम सेलेब्रिटींनी फॉलो केले की, त्याची अपोआपच चर्चा होऊ लागते. त्यामध्ये काही लहानमोठे प्रॅक्टिकल बदल होऊन ती फॅशन सामान्यांपर्यंत पोचते आणि तो ट्रेण्ड बनला की आपण त्याला आपलंसं करतो. आलिया आणि शिल्पा यांनी घातलेल्या आउटफिट्सचे ट्रेण्ड व्हायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. मल्टी युजेबल एथनिक टॉप्स किंवा शर्ट्स लवकरच बाजारात ‘इन’ होण्याची शक्यता आहे. असे टॉप्स मग स्कर्ट, लेहेंगा, साडी, पलाझो अशा कोणत्याही बॉटम्ससोबत टीम-अप करता येतील. आपल्याला हवा तसा फ्युजन आणि क्लासी लुक यातून साधता येईल. कॉलर ब्लाउझ साडीबरोबर टीम अप होऊ शकतात. त्याचबरोबर स्ट्रेट पँट्स, पलाझो यावरसुद्धा हे फॉर्मल स्टाइल शर्ट्स खूप वेगळा लुक मिळवून देतील. एथनिक क्रॉप टॉप्स साडीवर तर छान दिसतीलच त्याबरोबर पँट्स, पलाझो, स्कर्ट्स, धोती पँट्स यावरदेखील टीम अप करून कॉम्बो लुक मिळवता येईल. लाँग कुर्ती थोडय़ा एथनिक स्टाइलची असेल तर ती पलाझो किंवा स्लिम फिटेड पँट्स, स्कर्ट् यावर टीम-अप होऊ शकते. त्यातून एक छान फ्युजन पण क्लासी लुक मिळू शकतो. अशा प्रकारे टीम-अप केलेली आऊटफिट्स सोयीप्रमाणे फॉर्मल, फेस्टीव्ह, कॅज्युअल वेअर अशा कुठल्याच एका साच्यात बसणारी नसतात.
संकलन : प्राची परांजपे