बाहेरच्या पावसाळी कुंद वातावरणाची मजा घ्यायची तर काहीतरी चमचमीत, गरमागरम, मसालेदार आणि नेहमीपेक्षा वेगळ्या खाऊची डिश समोर यायला हवी. म्हणूनच खास पावसाळ्यात आस्वाद घेता यावा असा एक मांसाहारी आणि एक शाकाहारी चमचमीत हेल्दी खाऊची रेसिपी तुमच्यासाठी देत आहोत.

थाय चिकन ग्रीन करी विथ व्हेजिटेबल्स

‘थाय चिकन ग्रीन करी’ ही थाय खाद्यप्रकारामधील मसालेदार आमटी आहे, ज्यामध्ये लेमन ग्रासचा स्वाद आणि भाज्या व ओट्सचा पौष्टिकपणाही आहे. जेवणासाठी म्हणून गरमागरम भात आणि ही आमटी असा वेगळाच मेनू तुम्ही तुमच्यासाठी करू शकाल.

साहित्य :

अर्धा किलो चिकन २ सेंमी लांबीच्या तुकडय़ामध्ये कापलेले, दोन बारीक कापलेले गाजर, शंभर ग्रॅम बेबी कॉर्न, शंभर ग्रॅम ब्रोकोली कापलेली, एक इंच तुकडय़ामध्ये कापलेले ५० ग्रॅम सोयाबीन, एक इंच तुकडय़ामध्ये कापलेले शंभर ग्रॅम मशरूम्स, ५० मिली नारळाचे दूध, ८० ग्रॅम वेजी ट्विस्ट ओट्स, ८ ताजी तुळशीची पाने बारीक कापलेली, चवीनुसार मीठ, तेल ५ मिली, अडीच कप पाणी.

करी पेस्टसाठी साहित्य :

चार हिरव्या मिरच्या, १० ग्रॅम तीन कांद्याच्या पातीचे देठ, पाव कप ताजे धणे, २० ग्रॅम दोन इंच सुंठ किंवा आले, पाच लसणाच्या पाकळ्या, तीन लेमन ग्रासचे देठ- फिकट भाग फक्त, १ चमचा धणेपूड, अर्धा चमचा मिरपूड , अर्धा चमचा जिरे, पाव चमचा जायफळ आणि २० मिली पाणी.

कृती :

ग्रीन करी पेस्टसाठी थोडे थोडे पाणी टाकत सर्व साहित्यांचे मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर करी पेस्ट टाका आणि काही सेकंदांसाठी परतून घ्या. त्यात चिकन टाका आणि त्यावर करी पेस्टचे मिश्रण जमा होऊ द्या. अर्धा कप पाणी व मीठ टाका. कढई झाकून ठेवा आणि चिकन मसाल्यांमध्ये पूर्णत: सामावून जाईपर्यंत शिजवा. चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये नारळाचे दूध, ओट्स व दोन कप पाणी टाका. पुन्हा योग्य त्या प्रमाणात मीठ टाका. तयार मिश्रणात भाज्या टाका आणि मध्यम आचेवर मिश्रण गरम करा. दहा मिनिटांपर्यंत मिश्रण टप्प्याटप्प्याने ढवळत राहा. त्यानंतर मिश्रण गरम करणे थांबवा आणि त्यात पाम शुगर व तुळशीची पाने टाका आणि आमटी ढवळा. पुन्हा एकदा चव तपासा आणि चवीनुसार मीठ टाका. गरमागरम थाय चिकन ग्रीन करी भाताबरोबर सव्‍‌र्ह करा.

 

पनीर ओट्स अँड चिली डोसा

नेहमीच्या डोशाला चायनीजचा तडका देऊन पनीर ओट्स अँड चिली डोसा तयार केला जातो. चटपटीत स्वाद आणि परिपूर्ण नाश्ता असलेली अशी ही रेसिपी आहे.

साहित्य :

एक कप तांदळाचे पीठ, अर्धा कप रवा, अर्धा कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, प्रति डोसा ३ मिली तेल, दोन कप पाणी.

ओट्स चिली पनीरसाठी साहित्य :

दोनशे ग्रॅम पनीर, एक हिरवी सिमला मिरची, दोन मोठे टोमॅटो, दोन लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप हिरव्या पातीचा कांदा, ४० ग्रॅम मसाला ओट्स, दोन चमचे शेजवान सॉस, एक चमचा टोमॅटो केचअप, पाच मिली तेल आणि पाव कप पाणी.

कृती :

डोशासाठीचे सर्व साहित्य एकत्र करा. उत्तम पीठ तयार होण्याकरता हे मिश्रण ढवळा. पीठ जाडसर होण्याकरता थोडे थोडे पाणी ओतत राहा. जास्त जाड वाटले तर पुन्हा पाणी टाकून योग्य प्रमाणात आणा. पीठ दहा मिनिटे बाजूला ठेवून डोशासाठी पुरणाची तयारी करायला घ्या. कढईत एक चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तापवा. त्यात लसूण, हिरव्या पातीचे कांदे आणि सिमला मिरची टाका. ते गरम झाल्यानंतर त्यात चिरलेले टोमॅटो, सॉस, ओट्स व पाव कप पाणी टाका. चवीनुसार मीठ टाकून ओट्स पूर्णपणे शिजेपर्यंत मिश्रण गरम करा. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर डोशाचे पीठ पातळ होईपर्यंत पसरवा. जास्त पातळ पसरवू नका, अन्यथा ते फाटून जाईल. अर्धा चमचा तेल सोडून खुसखुशीत होईपर्यंत गरम करा. डोसा हलकासा तपकिरी झाल्यानंतर त्यावर चिली ओट्स पनीरचे मिश्रण ठेवा. डोसा दुमडून घेऊन तो गरमागरम सव्‍‌र्ह करा. या डोशाला चटणीची गरज नाही.

फिटफूडी.इनच्या सौजन्याने