पंधराव्या गिरिमित्र संमेलनाला देशभरातील आघाडीच्या गिर्यारोहक महिला येणार आहेत. या गिरीमैत्रिणींची ही ओळख..
दिनांक ९ व १० जुलै महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडमध्ये होणाऱ्या गिरिमित्र संमेलनात या सर्व महिला गिर्यारोहक दृकश्राव्य सादरीकरणातून त्यांचे अनुभव मांडतील. त्यांच्याशी खुला संवादही साधता येईल. या संपूर्ण कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, ऑनलाईन पद्धतीने http://www.girimitra.org या संकेतस्थळावर तुम्ही नावनोंदणी करु शकता.

पहिल्या फळीतली गिर्यारोहक :
chandaचंद्रप्रभा ऐतवाल
देशातील महिला गिर्यारोहणाच्या अध्वर्यू म्हणावं असं हे व्यक्तिमत्त्व. आजच्या इतकी एव्हरेस्टची क्रेझ नव्हती तेव्हापासून म्हणजेच १९७२ पासून त्यांची डोंगराशी मैत्री झाली. त्यामुळेच नंदादेवी, कामेट, अबिगामिन, सतोपंथ अशा तब्बल ३२ अवघड हिमशिखरांवर त्यांनी यशस्वी मोहिमा केल्या आहेत. नंदादेवीवरील त्यांच्या मोहिमेचा खास उल्लेख करावा लागेल. गिर्यारोहणातील तत्त्वांशी प्रामाणिक राहून अक्षरश: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी डोंगरांशी मैत्री केली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, नॅशनल अ‍ॅवार्ड फॉर अ‍ॅडव्हेंचर, तेनसिंग नोर्गे अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅवार्ड आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आहे. गिर्यारोहणाला सारं आयुष्य समर्पित करणारं असं हे व्यक्तिमत्त्व संमेलनाचे अध्यक्षपद भूषवीत आहे.


7एव्हरेस्टसह १७ शिखरं सर : सुमन कुटियाल

आजवर १७ हिमशिखरांवर आरोहण केलेल्या सुमन या एव्हरेस्टवीरदेखील आहेत. इंडो – जापनीज कांचनजुंगा मोहिमेत त्यांचा समावेश होता. तर फक्त महिलांच्याच कामेट, अबिगामिन हिमशिखरांवरील मोहिमेत त्यांनी शिखरमाथा गाठला.

गिर्यारोहण म्हणजे नेमकं काय?
आम्ही गिर्यारोहण करतो असं हल्ली अगदी सरसकट म्हटलं जातं. प्रत्यक्षात एखादा डोंगर अथवा गिरिदुर्ग चढलेला असतो, एक दिवसाची हाईक असं त्याचं स्वरूप असते. गिर्यारोहणाविषयी चर्चा करताना हा फरक प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे. डोंगर आणि पर्वत ह्य़ातील फरक ओळखायला हवा. गिर्यारोहण ही व्यापक संकल्पना आहे. हाईकिंग, हिलवॉकिंग, ट्रेकिंग (गिरिभ्रमण), हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग (अति उंचावरील गिरिभ्रमण), रॉक क्लाईंबिंग (प्रस्तरारोहण) आणि माऊंटेनीअरिंग (गिर्यारोहण-हिमपर्वतारोहण) अशी सर्वसाधारण चढती भाजणी आहे.
डोंगररांगेतील सहजसोप्या नैसर्गिक पायवाटेने केलेली चढाई म्हणजे हाईक. एखाद्या डोंगररांगेवर सारं सामान पाठीवर लादून दोन-चार दिवसांची सलग भटकंती म्हणजे ट्रेकिंग. डोंगरातील प्रस्तरांवर उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक रचनेचा वापर करून अंगभूत कौशल्य व कृत्रिम साधनांच्या आधारे केलं जाणारं आरोहण म्हणजे रॉक क्लाईंबिंग हा त्यातील पुढचा टप्पा. साधारण ८००० फुटांपेक्षा अधिक उंचीवरील डोंगरांमध्ये नैसर्गिक पायवाटेने केलेली भ्रमंती म्हणजे हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग होय. तर अति उंचावरील हिमशिखरांवर तांत्रिक साधनं आणि कौशल्याच्या आधारे केलेलं आरोहण, हिम अथवा बर्फारोहण म्हणजे गिर्यारोहण.

ट्रेकर आणि पोलीस अधिकारी : डॉ. रश्मी करंदीकर
डोंगर-दऱ्यांत भटकायची आवड असणाऱ्या आणि पोलीस दलात कार्यकर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या ठाणे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर या संमेलनाच्या मुख्य अतिथी आहेत.

maya-sherpa‘के टू’ वर यशस्वी : माया शेर्पा
सर्वोच्च शिखर म्हणून एव्हरेस्टचं महत्त्व असलं तरी उंचीने दुसऱ्या क्रमांकाचं, पण आरोहणास एव्हरेस्टपेक्षा कठीण अशा हिमशिखरावर माया यांनी यशस्वी आरोहण केलं आहे. त्याचबरोबर तीन वेळा एव्हरेस्ट, चो यूसह इतर सात हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलं आहे. माया शेर्पा संमेलनाच्या सन्माननीय अतिथी आहेत.

तीन वेळा एव्हरेस्टवीर : अंशु जामसेनपा
बहुतांश गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट हे एकदा तरी सर करावं असं स्वप्न असते. अंशु जामसेनपा यांनी तर तीन वेळा एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण केलं आहे. २०११च्या मोसमात त्यांनी सलग दोन वेळा (दहा दिवसाच्या अंतरात) सर्वोच्च हिमशिखरावर जाण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर तीन हिमशिखरं सहा दिवसांच्या काळात सर केली आहेत.

दोनदा एव्हरेस्टवीर : संतोष यादव
महत्त्वाकांक्षी महिला गिर्यारोहक अशी त्यांची नोंद करावी लागेल. १९९१ सालच्या मोहिमेतील एव्हरेस्टवीर म्हणून त्यांची ओळख असली, तरी त्याआधी त्यांनी अनेक हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलं आहे. १९९२साली त्यांनी पुन्हा एकदा एव्हरेस्टवर आरोहण करून दोन वेळा आरोहण करणारी पहिली महिला असा मान मिळवला. आयटीबीपीमधील नोकरी आणि घर संसार सांभाळून त्यांनी ही आव्हानं झेलली आहेत.