जाती-पातींमधील, विविध समाजांमधील राजकारण करून जरी अनेक जण आपले पोट भरत असले, तरी या पोटभर ट्रेंड पोटीमात्र अनेक समाज, अनेक ज्ञाती एकमेकांच्या अधिक जवळ येतायेत, परस्परांमधल्या सीमारेषा धूसर करू लागल्या आहेत याची प्रचीती आल्याशिवाय राहात नाही.

अनुभवातून अधिक चवदार झालेले विविध ज्ञातीतील, समाजातील ज्येष्ठ पिढीच्या हातचे वैशिष्टय़पूर्ण पदार्थही त्यांच्यासोबतच विलीन होण्याचा आजचा काळ असताना, एक खमंग ट्रेंड येऊ घातलाय जो अस्सल खवय्यांमध्ये एक निराळाच उत्साह जागृत करणारा ठरतोय. जाती-पातींमधील राजकारण एकीकडे ठेवत केवळ खाण्याच्या प्रेमापोटी तुझे-माझे दूर सारून वेगवेगळ्या समाजाच्या लोकप्रिय पदार्थावर खवय्ये ताव मारताना दिसतात. जे घरात बनतं ते हॉटेलमध्ये जाऊन का खायचं?, हाही विचार मागे पडला असून नाक्यानाक्यावर कधी कोल्हापूरी, कधी सावजी तर कधी अस्सल ब्राम्हणी पदार्थ विकणारी उपहारगृहे झोकात उभी राहिली आहेत आणि त्यांना गर्दी करणाऱ्या खवय्यांची रांगही वाढतेच आहे..

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
maharashtra sugar production, 108 lakh ton sugar production
यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन

आठवडय़ातून चार वेळा हॉटेलिंग करणाऱ्या व्यक्तीला आता मेनू कार्ड एखाद्या मासिकासारखे चाळून, ‘ये रे माझ्या मागल्या’ करत न्याहारीची वेळ असेल तर डोसा, मिसळ आणि जेवणाची वेळ असेल तर विविध रंगांमध्ये येणारी पनीरची तीच ती भाजी मागवावी लागत नाही. तर तो एक दिवस आगरी खानावळीत जातो आणि त्यांचे अगत्याने केलेले मांसाहारी विविध प्रकार अगदी आवडीने खातो; कधीतरी तो ‘सी. के. पी.’ टेक अवे काऊंटरपाशी येऊन आतून मोहात पाडणाऱ्या गंधात थोडा वेळ रेंगाळत, पावसाळ्यात येणारी आणि याच सी. के. पी. समाजाची खासियत असणारी शेवळ्याची भाजी आपल्या घरच्यांनीही चाखावी म्हणून पार्सल घेतो, तर कधी कोळ्यांच्या हॉटेलात खिश्याची चिंता न करता सरळ पापलेट आणि मित्रमंडळी यांचा मनसोक्त आस्वाद घेत जेवणाच्या माध्यमातून जीवनच रुचकर करण्याचा प्रयत्न करत असतो. या माणसाचे वैशिष्टय़ म्हणजे, आगरी खानावळीत जाणारा माणूस हा आगरीच असेल अशातला भाग नाही आणि  सी. के. पी. काऊंटरवरचा तो खवय्या त्याच ज्ञातीतला असेल असेही नाही. कदाचित तो दाक्षिणात्यही असू शकतो, मालवणी हॉटेलात जाणारा तो अगदी ब्राह्मणही असू शकेल आणि उद्या ब्राह्मणांच्या खाद्य केंद्रावर खास काजूची भाजी चाखायला जाणारा माणूस हा पंजाबी किंवा भंडारीही असेल. तेव्हा आता उदयास येणारी खाद्य संस्कृती ही ‘हे विश्वची माझे घर आणि पोटभर खावे रुचकर’ हे वाक्य सार्थ करणारी आहे यात तिळमात्र शंका नाही!

आपण क्षणभर महाराष्ट्र सोडून जर जगाचा विचार केला तर एक लक्षात येईल की जग जवळ येण्यामागे जसा तंत्रज्ञानाचा भाग आहे तितकाच महत्त्वाचा वाटा हा खाद्य संस्कृतींच्या देवाणघेवाणीचाही आहे. तेव्हा रुचकर जेवण हे केवळ पोट भरत नाही तर दोन मनांना, दोन वेगळ्या प्रकृतीच्या, संस्कृतीच्या जिवांना एकत्र आणून एक मंथन घडवते असे आपण नक्कीच म्हणू शकतो.

काही वर्षांपूर्वी हॉटेल म्हटलं की केवळ पंजाबी, चायनीज, साउथ इंडियन यांच्या चवींची घरातल्या माणसांइतकीच सवय होऊन गेली होती. मराठी माणूस ९ ते ५नोकरी करून शनिवार-रविवारी कुटुंब कर्तव्य म्हणून त्याच ठिकाणी जाऊन तेच ते खाऊन येत होता. परंतु त्यानंतरच्या काळात ह्याच मराठी माणसाने स्वत:ची पोळी-भाजी केंद्रं सुरू केली, त्याही पुढे जाऊन पंजाबी, चायनीजच्या ‘पंक्ती’त बसून ‘महाराष्ट्रीय फूड’ अशा सणसणीत नावाखाली आपले अस्तित्व प्रस्थापित केले. पूर्वी फक्त पोहे, मिसळ आणि वडे यासाठी ओळखला जाणारा मराठी माणूस आता त्यातील अधिक वैशिष्टय़पूर्ण पदार्थासाठी ओळखला जाऊ लागला. एखाद्या गोष्टीतील यश माणसाला पुढचे पाउल टाकण्याची इच्छा निर्माण करते हे याच मराठी माणसाच्या खाद्य व्यवसायातील पुढील वळणामुळे लक्षात येतं. महाराष्ट्रीय फूड हे तेवढय़ापुरतंच सीमित न राहता विविध ज्ञातींमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या खाद्यपदार्थापर्यंत येऊन पोहचले. सुरुवातीला प्रयोग म्हणून या ज्ञातींचे मेळावे भरू लागले. या खाद्यपदार्थाचे जाणकार एकत्र येऊन, कधी कोळी बांधवांचा खाद्य मेळावा असेल, कधी आगरी मोहत्सव असेल, कधी सी. के. पी. फूड फेस्ट असेल असे त्या त्या खाद्य वैशिष्टय़ांना अधोरेखित करणारे इव्हेंट आयोजित करत गेले. यातूनच प्रेरणा घेऊन काहींना व्यवसायाच्या नवीन वाटा मिळाल्या. अनेकांनी या मेळाव्यांमधून प्रेरित होऊन स्वत:च्या ज्ञातीचे प्रतिनिधित्व करणारी हॉटेल्स, ढाबे, टेक अवे स्टोअर्स सुरू केली आणि हेच सध्या महाराष्ट्राच्या खाद्य क्रांतीतले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पूर्वी जे घरात मिळते तेच हॉटेलमध्ये जाऊन का खायचे? म्हणणारी मंडळी घरच्या हरवत चाललेल्या चवीच्या खुणा शोधत अशा विविध समाजांच्या खाद्यसंस्कृतीकडे खेचले जात आहेत.

या क्षेत्रातील व्यावसायिकांशी बातचीत केल्यावर या ज्ञातींच्या खाद्य सेवेतील अनेक निरनिराळे पदर लक्षात येतात. अनेक हरवत चाललेले पदार्थ या माध्यमातून जतन होत आहेत, विशिष्ट समाजातील सरत्या पिढीचा हा ठेवा जेव्हा त्या त्या समाजातील तरुण मंडळी जपताना ज्येष्ठ पिढी पाहते तेव्हा त्यांचा उर अभिमानाने भरून येतो. त्याच वेळी अमुक अमुक ज्ञाती स्वत:चे हॉटेल उघडते असे म्हटल्यावर तिथे फक्त त्याच ज्ञातीतील लोक जाऊन त्यांच्या ठरावीक पदार्थाचा आस्वाद घेत असतील, असे सहज मनात येऊ शकते. मात्र वस्तुस्थिती काही औरच आहे. त्या त्या ज्ञातीतील खवय्ये तिथे हजेरी लावतातच, परंतु समाज विविधतेत विखुरलेला आणि काही नवीन अनुभव घेऊ इच्छिणारा एक मोठ्ठा वर्ग या हॉटेल्सकडे वळताना दिसतो आहे. कधी कधी मुले दूर देशात वृद्ध आई-वडिलांना घरी जेवणासाठी व्यक्ती ठेवावी लागते. तिच्या हातून आपल्या पदार्थाची चव मिळेलच असे नाही. मग इतक्या वर्षांच्या आपल्या विशिष्ट चवीचे चोचले पुरवण्यासाठी ही पिढी अशा हॉटेल्स, खानावळीच्या माध्यमातून आपल्या जुन्या दिवसांमध्ये रमताना दिसते.

आजही अशा अनेक ज्ञाती आहेत ज्यांनी आपला खाद्य खजिना समाजापुढे खुला केलेला नाही. परंतु काळजीचे कारण नाही हेच आजचे खाद्यवीर यांच्यासाठी प्रेरणा ठरतील. अशा वैशिष्टय़पूर्ण खाद्य मेळाव्यांच्या माध्यमातून अनेक समाज, अनेक ज्ञाती एकत्र येतील आणि या देवघेवीतूनही अनेक नवीन पदार्थाची नोंद भविष्यातील मेन्यू कार्डसवर होत राहील. भारतात फिरणारा पर्यटक महाराष्ट्रात आला की निसर्गात, काळ्या मातीत रमता रमता याच ज्ञातींच्या वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थावर ताव मारत तृप्तीची ढेकर देत परततो हेही वास्तव नजरेआड करून चालणार नाही.

आज याच गोष्टीमुळे अनेकांचे छंद हे त्यांचे व्यवसाय बनले आहेत. अनेक समाजातील गृहिणी या त्यांच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. अनेक तरुण या खाणावळींचे रूपांतर ‘मॅक डोनल्डस’, ‘केएफसी’ यांना तोडीस तोड टक्कर देणाऱ्या फूड चेन्समध्ये कसे करता येईल यांच्या विचारात आहेत. एकंदरीत नानाविध ज्ञातींच्या उदयाला आलेल्या या हॉटेल संस्कृतीतून एकाच वेळी आपल्या संकृतीचे जतन, उदरभरण आणि अर्थकारण अशा अनेक गोष्टी साध्य होताना दिसत आहेत. शेवटी एखाद्याला जिंकण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो असे म्हणतात, तेव्हा समाजाला घट्ट धरून ठेवणाऱ्या अनेक गोष्टींपकी खाद्यप्रेम हा एक महत्त्वाचा घटक आहे. ‘जाति’वंत खवय्यांसाठी निर्माण झालेले एक आपुलकीचे आणि महत्त्वाचे कारण आहे!

लोकांच्या चवीमध्ये तोचतोपणा जाणवू लागल्याने आपण काहीतरी वेगळे लोकांसमोर आणावे असे मनात होते. आगरी पद्धतीच्या जेवणाला एक विशिष्ट चव आहे हे आमच्या मसाल्यांनी सिद्ध केले आहे, त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन एखाद्या पंजाबी ढाब्याच्या तोडीचा असा आगरी ढाबा का सुरू करू नये असा विचार मनात आल्यामुळे या व्यवसायाकडे वळलो. आमच्या आगरी पद्धतीच्या जेवणाला मिळणारा प्रतिसाद हा थक्क करणारा आहे. यामुळे आमच्या ज्ञातीतील अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला याचे समाधान आहे.

रोहन रोहिदास पाटील (मालक, आगरी कट्टा)   

या व्यवसायात येणे हा माझ्यासाठी खरोखर योगायोग होता. ‘सी. के. पी. फेस्ट’मध्ये आमच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हे पाऊल उचलण्याचे धाडस केले. आज आम्ही ठरावीक सिझनमध्ये मिळणारे सी.के.पी. पदार्थ आवर्जून बनवतो. कारण ते फारसे कुठे चाखायला आज मिळत नाहीत. जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा केवळ सी.के.पी.च नाही तर समाजातील प्रत्येक स्तराकडून आम्हाला उत्साही प्रतिसाद मिळाला, म्हणजे फक्त मराठीच नाही तर अमराठी लोकांचा ओढा या चवीकडे वळताना आम्ही अनुभवत आहोत आणि याचाच आम्हाला आनंद आहे.

शिल्पा राजे (मालक, ‘रुचकर राजे’)

या ठरावीक ज्ञातींचे खाद्य व्यवसाय सुरू होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत, एक म्हणजे स्वत:च्या ज्ञातीबद्दल आणि तिच्या खाद्यसंस्कृतीबद्दल असणारा अभिमान आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा असलेला प्रयत्न आणि दुसरे म्हणजे सामान्य लोकांमध्येही आपल्यापेक्षा वेगळ्या अशा ज्ञातींचे खाद्यपदार्थ चाखून बघण्याची निर्माण झालेली उत्सुकता. जातींमधील बंधनं देखील आता मुक्त झालेली आपण पाहतो, त्यामुळे अर्थातच आहाराच्या बाबतीतही ती लागू होतात आणि यातूनच निर्माण झालेले कुतूहल या व्यवसायाला पोषक ठरते आहे. आजही काही ज्ञाती या व्यवसायात पुढे येताना दिसत नाहीत तेव्हा त्या समाजातील लोक याकडे व्यवसाय म्हणून पाहतात की नाही हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे आणि स्वत:पेक्षा वेगळ्या समाजामध्ये आपले पदार्थ आवडीने स्वीकारले जातील तेव्हाच या व्यवसायातील खऱ्या यशाचे मूल्यमापन करता येईल.

-मोहसिना मुकादम (खाद्यतज्ज्ञ)

viva@expressindia.com