यूटय़ूब हे सध्या तरुणाईचं आवडतं व्यासपीठ बनलंय. नवोदित कलाकारांसाठी व्यक्त व्हायचं, मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचंही.. या  चॅनेल ‘वाय’वरच्या घडामोडींचा आढावा घेणारं सदर. टीव्हीएफ या लोकप्रिय चॅनेलवरच्या नव्या मालिकेविषयी..

रोड ट्रिप म्हटलं की, डोळ्यांसमोर येते खूप सारी धमाल, मस्ती, बाजूच्या निसर्गाचा मनापासून आस्वाद घेत आवडत्या व्यक्तीबरोबर घालवलेले अविस्मरणीय क्षण.. रोड ट्रिपची आपली आवडती कंपनी म्हणजे मित्रांचा ग्रुपही असू शकतो किंवा अगदी प्रेयसी / प्रियकर, नवरा / बायको, कदाचित सगळी फॅमिली. सख्खा भाऊ -बहिणींसोबत तुम्ही कधी अशी रोड ट्रिप केली आहे का? भावंडांबरोबरची रोड ट्रिप किती एक्सायटिंग असू शकते? ट्रिपलिंग नावाच्या नव्या वेबसीरिअलमध्ये हीच एक्साइटमेंट मांडण्यात आली आहे. ही नवी मालिका सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजत आहे.

‘यूटय़ूब’वर सध्या ‘ट्रिपलिंग’ मालिकेचा बोलबाला आहे. ‘पर्मनंट रूममेट्स’ फेम ‘द व्हायरल फीवर’ अर्थात ‘टीव्हीएफ’ चॅनलची ही नवीन मालिका आहे. घटस्फोट घेऊन अचानक अमेरिकेतून परत आलेला मोठा भाऊ  चंदन, पबमध्ये डीजे असणारा बेफिकीर, कूल डूड असा धाकटा भाऊ  चितवन आणि राजस्थानच्या रूढी परंपरांमध्ये अडकलेली त्यांची बहीण चंचल अशा तिघांची ही कहाणी. काहीही प्लॅन न करता सुरू झालेल्या त्यांच्या या रोड ट्रिपचे सध्या पहिले काही एपिसोड्स यूटय़ूबवर आले आहेत. टीव्हीएफ चॅनलचे १७ लाखांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. याव्यतिरिक्त ‘ट्रिपलिंग’च्या व्हिडीयोजना एक हजारहून जास्त व्ह्य़ूज आणि त्याच्या कितीतरी पट जास्त व्ह्य़ूज त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅपवर मिळालेले आहेत.

बदलत्या ‘फॅमिली व्हॅल्यूज’

या वेब मालिकेचा मुख्य विचार बदलत्या कौटुंबिक संकल्पना हाच आहे. मोठय़ा भावाचा घटस्फोट होतो तेव्हा लहान भावाला त्याचं लग्न झालं होतं हे समजतं. बहिणीच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येताहेत. आपण प्रेग्नंट असल्याविषयी ती घरी खोटं बोललेली असते आणि ते दोघा भावांना माहीत नसतं. लहान भाऊ  कर्जबाजारी झालाय, त्याला एकदा जेलमध्येही जावं लागलंय याबद्दल इतर भावंडांना कल्पनाही नसते. सध्याच्या सेल्फ सेंटर्ड आयुष्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारी ही मालिका आहे. रोड ट्रिप सुरू झाल्यावर हळूहळू या भावंडांच्या आयुष्यातलं एक एक गुपीत उघड होत जातं आणि तिघेही एकमेकांच्या आणखी जवळ येतात. एकूण आजच्या तरुणांच्या भाषेत आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी ही मालिका असल्यामुळे यंगिस्तानला जास्त भावतेय, असं दिसतं.

लोकप्रिय कॅरॅक्टर्स

चंदन : पर्मनेंट रूममेट्स ही ‘टीव्हीएफ’ची मालिका हिट झाली, त्यामागे एक मोठं कारण म्हणजे त्यातीत मुख्य पात्र – ‘मिकेश.’ हाच मिकेश म्हणजे सुमीत व्यास या ‘ट्रिपलिंग’ मालिकेत चंदन या मोठय़ा भावाच्या भूमिकेत आहे. मिकेश जितका हॅपी गो लकी होता चंदन तितकाच सीरियस आहे. आयुष्यात सगळं प्लानिंगने करणारा पण तरीही काही चुकीचे निर्णय घेणारा घटस्फोटित चंदन त्याने चांगला साकारला आहे. सुमित व्यासचं ‘फॅन फॉलोइंग’ मोठं असल्यामुळे त्याच्या या कॅरेक्टरलाही खूप प्रतिसाद मिळतो आहे.

चितवन : या पात्राचं नावच वेगळं आणि भन्नाट आहे. नावाप्रमाणे हे कॅरेक्टरही भन्नाट आहे. पबमध्ये डीजे असणारा बिनधास्त कूल चितवन असा असला तरीही इतर दोघांपेक्षा आई-वडिलांच्या जास्त जवळचा आहे. कुठल्याही परिस्थितीचं टेन्शन न घेता बेफिकीरपणे वागणारा कूल डूड चितवन तरुण मुलींना खूप आवडतोय. या संपूर्ण रोड ट्रिपची आयडियादेखील त्याचीच.

चंचल : अत्यंत बबली आणि बिनधास्त कॅटेगरीतली मुलगी. बीअर पिणारी, गाण्यांवर झिंगून धमाल नाचणारी, तरीही काहीशी इमोशनल असं चंचलचं कॅरेक्टर आहे. लग्नाआधी कूल वाटणाऱ्या बॉयफ्रेण्डचं लग्नानंतरचं रूप बघून ‘विरासत’च्या अनिल कपूरची आठवण येणारी, राजस्थानच्या पारंपरिक रूढींमध्ये अडकल्याने कंटाळलेली ही मुलगी आपले भाऊ  भेटल्यावर पुन्हा एकदा या रोड ट्रीपच्या निमित्ताने लग्नापूर्वीचं बिनधास्त आयुष्य जगू पाहते. या मुलीचंही कॅरेक्टर थोडं गूढ असल्याने प्रेक्षकांना तिच्याविषयी उत्सुकता आहे.

अशा या चंदन, चितवन आणि चंचलची रोड ट्रिप सध्या सोशल मीडियावर चांगली गाजतेय. पहिल्या तीनही एपिसोड्सना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत व्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्या बदलताहेत. आजच्या तरुणाईच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी, त्यांच्या आवडी-निवडीविषयी त्यांच्याच भाषेत भाष्य करत असल्याने याचा प्रतिसाद वाढतोय. मालिकेचा हाच ट्रॅक सुरू राहिला तर ती आणखी इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे.    -निहारिका पोळ