‘युवर इंडियन कन्झ्युमर’ हे लोकप्रिय यूटय़ूब चॅनेल चालवणारा मराठमोळा तरुण प्रसाद वेदपाठक याच्याशी बातचीत.

यूटय़ूबवरचा सगळ्यात खपणारा म्हणजेच पाहिला जाणारा व्हिडीओचा प्रकार म्हणजे ‘हाऊ टू..’ अगदी गॅस कसा सुरू  करावा इथपासून ते मदरबोर्ड साफ कसा करावा यापर्यंत आणि डाळिंबाचे दाणे कसे काढावेत यापासून ते सोनपापडी कशी बनवावी इथपर्यंत व्हिडीओ अपलोड केलेले दिसतील आणि त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्य़ूज मिळालेले दिसतील. या प्रकारचेच पण तांत्रिक बाबींची माहिती देणारे व्हिडीओ देणारे एक यूटय़ूब चॅनेल सध्या चर्चेत आहे. त्याचं नाव ‘युवर इंडियन कन्झ्युमर’ आणि ते चालवतोय एक मराठमोळा तरुण- प्रसाद वेदपाठक. यूटय़ूबिंग हेसुद्धा एक तंत्र आहे आणि आपला व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तंत्रकुशलतेबरोबर सातत्य आणि दर्जाही लागतोच. लाखाच्या वर सबस्क्रायबर असलेल्या यूटय़ूब चॅनेलचा कर्ता आणि नेक्स्ट अप यूटय़ूब २०१६ पुरस्कार मिळवलेल्या प्रसादकडून या तंत्राबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न..

कोणता मोबाइल चांगला, कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू चांगली, कोणत्या उत्पादनात काय उणिवा आहेत, कोणतं किती स्वस्त आहे, कोणतीही वस्तू घेताना एक ग्राहक म्हणून काय खबरदारी घ्यावी, कोणती वस्तू योग्य तऱ्हेने कशी वापरावी या आणि अशा अनेक शंकांची उत्तरं प्रत्येक वेळी आपल्याला कोण देईल? एक यूटय़ूब चॅनेल नक्की देईल- ‘युवर इंडियन कन्झ्युमर’. मोठय़ा संख्येने सबस्क्रायबर असणाऱ्या लोकप्रिय यूटय़ूब चॅनेलच्या कर्त्यांकडून यूटय़ूबिंगच्या अनुभवाविषयी जाणून घेतलं आणि यूटय़ूबिंगचे अ, आ, इ जाणून घेता आले.

गप्पांना सुरुवात अर्थातच प्रसाद वेदपाठकला नुकत्याच मिळालेल्या ‘नेक्स्ट अप यूटय़ूब २०१६’ या पुरस्कारापासून झाली. ‘यूटय़ूब चॅनेल्सला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद, भविष्यातले प्लॅन्स आणि चॅनेलचं भवितव्य यावरून ‘नेक्स्ट अप’ या स्पध्रेचे विजेते निवडले जातात. संपूर्ण देशभरातून केवळ ३० यूटय़ूब चॅनेल्सना हे अ‍ॅवॉर्ड दिले जातात. २०१६च्या टॉप ३० यूटय़ूब चॅनेलमध्ये आमची गणना झाली, ही फार मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांची गरज आणि त्यांना पडणारे साधेसोपे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर आधारित चॅनेल सुरू करणे ही मोठी उडी होती. त्या उडीचं यश आत्ता समोर येतंय,’ प्रसाद सांगत होता.

भारती विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयिरग केल्यानंतर मशीन डिझाइिनगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेल्या प्रसादने काही कंपन्यांमध्ये सेल्स इंजिनीयर म्हणून काम केलं. त्याचसोबत तो वयाच्या १९व्या वर्षांपासून स्टॉक मार्केट ट्रेडिंग करत होता. नोकरीनंतर मशीन डिझाइन प्रोजेक्ट्ससाठी सुद्धा त्याने काम केलं, स्वतचा कस्टम गीफ्टिंगचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर एक महिन्याने एका मोठय़ा कंपनीकडून त्याला सेल्स इंजिनीयरची चांगली ऑफर मिळाली होती, मात्र तोपर्यंत त्याने यूटय़ूबर बनायचं पक्कं केलं होतं. प्रसाद म्हणतो, ‘ते ऑफर लेटर अजूनही आठवण म्हणून मी जपून ठेवलं आहे.’

कोणतीही लहान- मोठी वस्तू विकत घेताना आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रसाद त्याच्या व्हिडीओंमधून देतो. प्रसाद पूर्वीपासून हौस, छंद म्हणून व्हिडीओ बनवून अपलोड करत होता, पण यूटय़ूब चॅनेल सुरू करून पूर्ण वेळ यूटय़ूबर व्हायचं कधी ठरलं? ‘ज्यावेळी यूटय़ूब हाच केवळ पूर्ण वेळाचा व्यवसाय म्हणून निवडायला त्यावेळी माझं लग्न नुकतंच झालेलं होतं. हातात कमाईचं दुसरं काही साधन नव्हतं, आलेली नोकरी स्वीकारली नव्हती आणि असं अनिश्चित आणि अपरिचित माध्यम मी निवडलं होतं. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा ‘बी युवर ओन बॉस’ अशा पद्धतीने आणि तरीही लोकांना आवडेल, आकर्षति करेल असं काहीतरी मला करायचं होतं. त्यावेळी माझी बायको दीपिका आणि माझा भाऊ दीपराज या दोघांनीही पूर्ण पॉझिटिव्हिटीने मला पािठबा दिला. कॅमेऱ्यासमोर बोलण्याची कला मला चांगली अवगत आहे असं मला लक्षात आलं होतं. भावाने त्याला शूटिंगची जोड दिली. बायकोनेच ‘अफिलिएट मार्केटिंग’चा पर्याय सुचवला. माझ्या व्लॉग्जमध्ये मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला सहभागी करून घेतलं आहे.’

‘कोणत्याही प्रॉडक्टबद्दल माझं अनबायस्ड असणं मला इतर यूटय़ूबर्सपेक्षा वेगळं ठरवतं. मी कधीच कोणत्याच उत्पादनाची जाहिरात करत नाही. सुरुवातीला मी आणि माझ्या भावाने गंमत म्हणून बनवलेले आणि अपलोड केलेले यूटय़ूब व्हिडीओज आता मोठय़ा प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचले आहेत. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातली दरी जाणवायला लागली तशी हाच विषय आपल्या चॅनेलचा गाभा असेल हे निश्चित केलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कोणत्याही उत्पादनाला नावं ठेवणं किंवा कोणाचंही प्रमाणाबाहेर कौतुक करणं हे मी माझ्या व्हिडीओजमध्ये करत नाही’, प्रसाद सांगतो.

यूटय़ूब चॅनेल हेच एखाद्याचं रोजीरोटीचं साधन म्हणून वापरता येऊ शकतं का या प्रश्नाला प्रसादने क्षणाचाही विलंब न लावता ‘हो’ म्हणून उत्तर दिलं. यूटय़ूब चॅनेल कसं सुरू करावं याचा एक व्हॉग प्रसादने आपल्या चॅनेलवर टाकला आहे. स्वत: पूर्ण वेळ यूटय़ूबर असलेल्या प्रसादने त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितल्या. ‘यूटय़ूब चॅनेल सुरू करणं हे तर मुळातच विनामूल्य असतं. त्यातून मिळणारं उत्पन्न व्हिडीओ किती लोकांनी बघितला यावरून ठरतं. एका व्हिडीओच्या १००० ह्य़ूजमागे यूटय़ूब आपल्याला एक डॉलर देतं. त्यामुळे यूटय़ूबर्स काही करोडपती किंवा लखपतीही नसतात. यूटय़ूब चॅनेल हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पाहायचा असल्यास तीन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ‘गुगल अ‍ॅड-सेन्स’शी करार करायचा जेणे करून आपल्याला व्हिडीओजसाठी जाहिराती मिळतात. दुसरं म्हणजे स्पॉन्सर्स! आपण एखाद्या व्हिडीओमध्ये एखादं उत्पादन वापरणार असू तर त्याच्यातूनही आपल्याला पसे कमावता येतात. त्या उत्पादनाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुम्ही जाहिरातच करत असता. त्यामुळे याचा वापर करून त्या कंपनीकडून स्पॉन्सरशिप मिळवता येऊ शकते. अर्थात मी माझ्या व्हिडीओजमध्ये उत्पादनातल्या उणिवाही सांगत असल्याने माझ्यासाठी हा पर्याय जवळजवळ बंदच झाल्यात जमा आहे. आणि तिसरा पर्याय म्हणजे ‘अफिलिएट मार्केटिंग’. यात तुम्ही अ‍ॅमेझोन, फ्लिपकार्ट वगरेंसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सबरोबर अफिलिएट पार्टनरशिप करून त्यांच्या जाहिराती किंवा िलक्स तुमच्या चॅनेलमध्ये, व्हिडीओमध्ये आणि व्हिडीओच्या बाजूला दाखवू शकता. त्या िलकवरून जर कोणी खरेदी केली तर त्यातलं काही टक्के कमिशन तुम्हाला मिळतं. अ‍ॅपवरून खरेदी झाली तर जास्त आणि वेबसाइटवरून झाली तर थोडं कमी कमिशन मिळतं. फॅशन अ‍ॅक्सेसरीज आणि कपडय़ांवर अधिक तर इलेक्ट्रॉनिक्सवर थोडं कमी असं साधारण या कमिशनचं गणित आहे. साधारण या कमिशनची रेंज २ ते २० टक्क्यांपर्यंत असते. माझं स्वतचं सर्वाधिक उत्पन्न पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायातून होतं.’

यूटय़ूबरचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? यावर प्रसाद सांगतो.  ‘सबस्क्रायबर्सची संख्या वाढवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं. कारण जो विषय आम्ही निवडला होता तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातली दरी मिटवण्याचा, ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्याचा आणि रोजच्या वापरातल्या उत्पादनासंदर्भात असलेल्या शंकांचं निरसन करण्याचा आमचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. आमच्या अंदाजानुसार २०१६ या वर्षांच्या अखेरीला आम्ही एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करणार याची आम्हांला खात्री होती. ते वेळेआधीच पूर्ण झाल्याचं वेगळं समाधान आहे.’

‘एखादा कलाकार एक वेळ पशाशिवाय राहू शकतो मात्र कौतुकाशिवाय राहणं त्याला शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या प्रेक्षकांना, सबस्क्रायबर्सना सर्वाधिक महत्त्व देतो. आतापर्यंत एक लाखाच्या वर तर ही संख्या गेलीच आहे. आता अजून कशी वाढवता येईल याकडे पूर्ण लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे’, असंही प्रसाद नमूद करतो.

एक वेगळं माध्यम, एक वेगळं जग एवढंच नाही तर यूटय़ूब हे एक वेगळं उत्पन्नाचं साधन ठरत आहे, हे प्रसादच्या इंडियन कन्झ्युमरकडे पाहून पटतं.