प्रेम.. ह्य़ाचं तिच्यावर आणि तिचं त्याच्यावर आणि त्याचं आणखी कुणावर..भावनांच्या बळावर, रागरुसव्यांच्या काळावर, आणाभाकांची घालमेल, सोबत इनसिक्युरिटीची रेलचेल.. सोडवण्यासाठी ही समीकरणं आहेच की लवगुरूंची स्टोरीटेल!

2
प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. पण काहींना हेच प्रेम व्यक्त करता येत नाही.. कधीच नाही. ती किंवा तो समोर होती, पण कधी मनातलं सांगायची हिंमतच झाली नाही असं चेहरा पाडून सांगणारे आजही अनेक आहेत. प्रेम, रिलेशनशिप या गोष्टी जरी पर्सनल असल्या तरीही इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबुकसारखी सोशल अस्त्र मात्र या नात्यांना पब्लिक रूप देतात. आजकाल तर नात्याची ‘ऑफिशिअल’ घोषणाही याच माध्यामांतून केली जाते. रिलेशनशिपमध्ये महत्त्वाचं स्थान असणाऱ्या याच साइट्समुळे प्रेमळ नात्यांमध्ये दुरावा, ब्रेकअप अशी संकटंही येतात आणि मग एन्ट्री होते ‘लव्हगुरू’ची. लव्हगुरू..बोले तो सब सॉर्ट आऊट. रिलेशनशिपमध्ये काहीही भांडण झालं, रागरुसवे आले, ‘इगो’ मध्ये आला की, ढासळलेलं मन अलगदपणे हाताळायला हेच लव्हगुरू अगदी हक्काच्या माणसाप्रमाणे हाकेला धावून येतात.
एका टीव्ही चॅनेलवरचा ‘लव्ह स्कूल’ हा कार्यक्रम सध्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या, नसणाऱ्या, ब्रेकअप झालेल्या किंवा मनोमन कुणाच्या तरी प्रपोजलची वाट पाहणाऱ्या बहुतेकांच्या आवडीचा झालाय तो त्यातील लव्हगुरूमुळेच. तर त्यातली ‘लव्ह स्कूल’ची हीच संकल्पना रोजच्या जीवनात हल्लीची तरुणाई अनुभवत असते. प्रत्येकाचा एकेक ‘लव्हगुरू’ असतो. आता इथे गुरू म्हटलं तरी लव्हगुरू ही एक व्यक्ती असून याचा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक बाबीशी संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी. कारण प्रेमळ भांडणांचा हा तिढा सोडवणारे हे दुसरे तिसरे कोणीही नसून आपल्याच जवळचे, आपल्याला जास्त चांगले ओळखणारे मित्र किंवा मैत्रिणीच असतात.
कॉलेज कॅम्पस, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स अशा ठिकाणी किंवा कॉर्पोरेट हबमध्ये काम करणाऱ्या अनेकांसाठी हे असे ‘पंटर’ फार महत्त्वाचे असतात. किंबहुना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडपेक्षाही रिलेशनशिपमध्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण नाजूक नात्यांच्या या वाटेत मजबूत अशा बुरुजाचं काम हे लव्हगुरू करत असतात. काहीही गोंधळ असो, गैरसमज असो किंवा मग मनाविरुद्ध ब्रेकअपपर्यंतच्या तक्रारी असोत, बऱ्याच जणांच्या नात्यामध्ये एखादी व्यक्ती असते जी हा सगळा पसारा क्षणात आवरून नात्यांची ही घसरलेली गाडी अलगद पूर्वपदावर आणून सोडते. कॅम्पसमधल्या आणि कॅम्पसबाहेरच्या अशाच काही ‘इन अ रिलेशनशिप’ किंवा ‘कमिटेड’ असं स्टेटस ठेवणाऱ्या दोस्तांनी शेअर केले आहेत त्यांचे ‘लव्हगुरू’. अशा काही लव्हगुरूंची अवतरणंदेखील आम्हाला मिळाली.
‘रिलेशनशिपमध्ये वादविवाद तर होतच असतात. पण जर कधी काहीही वाद झाला आणि तो विकोपाला गेला तर ‘रेडिओ’ हा माझा लव्हगुरू असतो’, सुमुखी सांगते. ‘कोणताही प्रॉब्लेम असो, काहीही शंका असो रात्रीच्या एकांतात रेडिओ लावून कोणाच्याही टोकण्याची पर्वा न करता जुन्या गाण्यांच्या झोकात वाहत जाते, मधून आवडत्या आर.जे.चा आवाज ऐकायला मिळतो आणि मग मनातल्या शंका, राग, विनाकारण इतरांवर होणारी चिडचिड याचं नकळतच ‘सुरेल’ उत्तर मिळतं,’ सुमुखी तिच्या लव्हगुरूबद्दल भरभरून सांगते.
अक्षय पाटीलसाठी लव्हगुरूची ही भूमिका वठवणारी एक व्यक्ती म्हणजे त्याची मैत्रीण निधी. रिलेशनशिपमध्ये काही कन्फ्युजन, कोणतीही चांगली गोष्ट अक्षय नेहमीच निधीशी शेअर करतो. त्यामुळे आमच्या रिलेशनशिपमध्ये निधी म्हणजे हक्काची आणि प्रसंगी लव्हगुरू म्हणून सल्ले देणारी मैत्रीण असं अक्षय म्हणतो. कोणताही प्रश्न असो, कितीही गंभीर विषय असो तो हाताळण्याची निधीची शैली युनिक आणि रिलाएबल आहे. ‘माझ्या वयापेक्षा मोठा असला तरीही तो माझा सच्चा दोस्त. प्रेम, फर्स्ट क्रश, रिलेशन्स याबाबतीत
सख्या भावाप्रमाणे पावलोपावली उभा असणारा अनिकेत बांद्रेसारखा मित्र मनाला दिलासा देऊन जातो,’ असं विकी आपल्या लव्हगुरूबद्दल सांगतो. ‘कधी काही वाद झाले तर आमच्या नात्यातल्या भांडण, गैरसमजांचा राग नकळतच अनिकेतवर निघतो. पण आमच्यात असा एक बॉण्ड आहे की, माझा चेहरा पाहूनही त्याला परिस्थतीची जाणीव होते आणि मग अशा वेळी हर चीज माफ होती है.. अनिकेतच्याच सल्ल्यामुळे माझ्या रिलेशनशिपमध्ये कुठे तरी स्थैर्य आलं आहे असं मला ठामपणे वाटतं..’ विकी लव्हगुरूबद्दल एवढय़ा प्रेमानं बोलतो.
प्रेमात पडलेल्यांना सावरायला काही जणांना असे लव्हगुरू भेटतात. पण काही जणांसाठी स्वत:चे अनुभव आणि अंतर्मन हेच असतं लव्हगुरू. आजच्या जीवनाचा आणि नाती जुळण्याचा- तुटण्याचा वेग पाहता काही वर्षांनंतर ‘लव्हगुरू हवे आहेत’ अशा जाहिरातीही दिसायला वेळ लागणार नाही.

3मित्रमैत्रिणींना काही अडीअडचणी आल्या किंवा काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आले तर मला त्यांना सल्ले द्यायला आवडतं. माझं तसं सगळ्यांशी छान जमतं. बडबड करण्याच्या माझ्या सवयीचा चांगला उपयोग होतो कधी कधी. कोणाचं तरी जिवाभावाचं नातं सावरण्यासाठी या बडबडीचा उपयोग होत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे.
निधी खमितकर

4लव्हगुरू.. गेल्या व्हॅलेंटाइन डेचं औचित्य साधत मला मिळालेली ही पदवीच आहे. मित्रांसाठी त्यांच्या अडचणीत उभं राहताना, प्रेम- रिलेशनशिपमधले वाद-तंटे मिटवताना माझा लव्हगुरू कसा झाला हे माझं मलाही कळलंच नाही. पण मला पर्सनली असं वाटतं की, प्रेमात गुरूची काय गरज? प्रेमाची जाण आणि कदर महत्त्वाची.- अनिकेत बांद्रे