काम आणि छंदाचं यथायोग्य समीकरण जुळवत तिनं १६ देशांत भ्रमंती केलेय. अजूनही युरोप एक्स्प्लोअर करायचाय असं सांगतेय, दक्षिण सायप्रसची वैशाली प्रभू.
वैशाली प्रभू, लिमसॉल (सायप्रस)

हाय फ्रेण्डस्! मला बोलायला खूप आवडतं. विशेषत माझ्या फिरस्तीचे अनुभव शेअर करताना तर काय बोलू नि किती बोलू असं होतं. मी मुंबईच्या डी. जे. संघवी कॉलेजमध्ये बी.इ. (कॉम्प्युटर) झाले. कॉलेजमध्ये आमचा ग्रुप काही सोशल अ‍ॅक्टिव्हिटीजही करायचा. लहानपणापासून आई-बाबांसोबत जवळपास भारतभर फिरलेय. त्यामुळं अंगी फिरण्याची आवड रुजलेय. ही आवड जोपासण्याची संधी मिळाली, ती नोकरीच्या निमित्तानं. कॅम्पस इंटरव्’ाूमध्ये माझी अ‍ॅमडॉक्स कंपनीत निवड झाली. कंपनीनं सायप्रसला जाण्याविषयी विचारलं. सायप्रसची माहिती सर्च करून लगेच होकार कळवला. सायप्रस हे मुळात हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून फेमस आहे. मग नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मनाशी बेत केला की, त्या हॉलिडे डेस्टिनेशनवर जाऊ, काम करू नि फिरायलाही मिळेल. घरच्यांनी मला तेव्हा निर्णयस्वातंत्र्य दिलं होतं. आता पाच र्वष झाल्येत इथं येऊन, तरी त्यांचा पािठबा तितकाच कायम आहे.
आठवतंय की, आम्ही तेव्हाच्या लोकप्रिय ऑर्कुटवर सायप्रसला जाणाऱ्यांची कम्युनिटी क्रिएट केलेली. माझ्याबरोबर आठ क्लासमेट होते. आमच्याखेरीज उत्तरेतले, पंजाबचे, गुजरातचे असे अंदाजे तीसजण होते. सगळ्यांची गुरगावला महिनाभर इंटरॅक्शन झाली. बॅचमध्ये पाच मुली होतो. खूप एक्साईटमेंट होती. भीती अजिबात वाटली नाही. आम्ही सायप्रसला आलो, तेव्हा कंपनीत जवळपास २०० भारतीय होते. तेव्हाचा प्लॅन होता की, इथं दोन र्वष राहायचं, आवडलं तर पुढं ठरवायचं. अ‍ॅमडॉक्स ही सॉफ्टवेअर आणि सíव्हसेस पुरवणारी कंपनी आहे. ती नव्वदहून अधिक देशांत कम्युनिकेशन्स, मिडिया आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रात आपली सेवा पुरवते. कंपनीचा मोठा औद्योगिक विस्तार असून अ‍ॅमडॉक्सची ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, सायप्रस, भारत, आयलँण्ड, इस्त्रायल, यूके आणि युएसएमध्ये ऑफिसेस आहेत. सायप्रसमध्ये आमचं बॅलन्स्ड वर्कलाईफ आहे. मी जॉईन झाले ट्रेनी म्हणून. नंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका इन्फ्रास्टक्चर टीमसोबत चार र्वष काम केलं. अ‍ॅमडॉक्सचं प्रॉडक्ट साईटवर जाऊन ते इन्स्टॉल करायचं असायचं नि कस्टमरसाठी त्याला सेटअप करायचं, म्हणजे त्याला त्याचा वापर करता येईल. त्यांना ट्रेनही करायला लागायचं.
सायप्रस जगभरातल्या मोजक्याच सुरक्षित देशांपकी एक गणला जातो. ना भांडणतंटा ना कसली भयभीती. सायप्रसच्या उत्तरेला टर्की लोक आणि दक्षिण सायप्रसमध्ये सिप्रिऑट ग्रीक राहातात. मी दक्षिण सायप्रसमध्ये लिमसॉल शहरामध्ये राहाते. ही बीचसिटी बऱ्यापकी डेव्हलप्ड आहे. लोक फार कुटुंबवत्सल असतात. त्यांना त्यांच्या पुरातन संस्कृतीचा खूप अभिमान आहे. लिमसॉलमध्ये रशियन्स, बल्गेरिअन्स, रुमानियन्स खूप आहेत. सगळ्यांना इंग्लिश येतं. ग्रीक शिकायचं असल्यास, त्यांच्यासाठी फ्री क्लासेस आहेत. मी ग्रीक भाषा शिकण्याखेरीज इतरही काही छंद जोपासले. ग्रीसपाठोपाठ सायप्रस रिसेशनमध्ये गेलेलं. त्यादरम्यान काही ओळखीच्यांसोबत ‘तुम्ही भारतात परता’, असं दर्शवणाऱ्या एक-दोन घटना घडल्या. आम्ही स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन दूतावासात साजरा करतो. इथल्या शििपग कंपनीजमध्ये मराठी कुटुंब असल्यानं मराठी सणही साजरे केले जातात.
इथे बहुतेक सगळ्या देशांच्या एम्बसी आहेत. व्हिसा प्रोसिजर बरीच सोपी आहे. सायप्रसमधलं व्हॅलिड वर्क परमिट असेल तर व्हिसा रिजेक्शन सहसा होत नाही. युरोपातले देश तुलनेने जवळ आहेत. देश कोणताही असला तरी फिरताना तिथला इतिहास, भूगोल, तिथलं आíकटेक्चर वगरे जाणून घेण्यात मला नेहमीच रस वाटतो. काम आणि फिरण्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी गेलेय. काम झाल्यावर अ‍ॅमडॉक्सतर्फे वीकएण्डला फिरायला थोडेसे अलाऊन्स मिळतात. जॉईन झाल्यावर तीन महिन्यांसाठी पहिल्यांदा गेले रोमानियाला. रोमानिया खूपच सुंदर आहे. राजधानी बुकारेस्टमध्ये मोठाल्या बागा, सुंदर आíकटेक्चर बघायला मिळतं. नवीन ठिकाणी गेल्यावर ती भाषा शिकाविशी वाटते, मग ती जुजबी शिकते आणि संवाद साधते. माझी बहिण जर्मनीत राहात असल्यानं अधेमधे तिला भेटायला जाते.
दक्षिण अमेरिकेत इक्वेडॉरला गेले होते. ते ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहे. क्विटो हे व्होल्कॅनो माऊंटन्सनी वेढलेलं आहे. आमच्या कस्टमरचं ऑफिस तर व्होल्कॅनिक माउंटनजवळच होतं. तिथली लोकं स्पॅनिशच बोलत असल्यानं ते थोडं शिकावं लागलं आणि एक ट्रान्सलेटरही होता आमच्यासोबत. त्याच सुमारास एक ज्वालामुखी जागृत झाला तो पाहायला मिळाला. हा अनुभव खूपच नवीन होता. कोटोपाक्सी या व्होल्कॅनिक माऊंटनचं दृश्य अविस्मरणीय होतं अगदी. इक्वेडोरमध्ये िमडो या क्लाऊड व्हॅलीमध्ये झोपडीत राहाण्याचा अनुभव आणि झिप लाइनिंगनं एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाणं हा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा प्रकार खूपच मस्त होता. इक्वेडोर बायोडाव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. इक्वेडोर लाईनवर जाऊन आले. इक्वेडोरमध्ये वर्षभर एकसारखंच प्लेझंट हवामान असतं.
साओपावलोमध्ये कामानिमित्त जावं लागलं. तेव्हा तिथून पुढं रिओला जाता आलं. इतर युरोपियन बीचेसवर फक्त गोरी लोकं दिसतात, पण इथं अनेक वर्णाची माणसं दिसत असल्यानं वेगळं वाटत नाही. सगळ्यांचं सतत डान्स-म्युझिक चालू असतं. लोक मेहनती आहेत. कॅरेबियन्समध्ये ओपन कल्चर असून तिथंही म्युझिक-डान्सचं कल्चर आहे. एक प्रवासी म्हणून या सगळ्या ठिकाणी फिरताना अजिबात भीती वाटली नाही. मी अमेरिका, स्पेन, बार्सलिोना, स्वित्र्झलण्ड, न्यूझीलंड, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, फ्रान्स, पॅरिस, इटली, इस्त्रायल असे साधारण १६ देश फिरलेय. टर्कीमध्ये मिश्र संस्कृती आहे. तिथल्या कॅपोडेशियामध्ये भन्नाट रॉक फॉम्रेशन्स आहे. तिथं मी हॉट एअर बलून राईड केली. पहाटे पाच वाजता उठून जायचं.. सूर्योदय आणि त्या रॉक फॉम्रेशनचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.. ते दृश्य केवळ अवर्णनीय! इस्त्रायलच्या डेड सीवर लोक मडबाथ घ्यायला जातात. पलिकडल्या बाजूला जॉर्डेनीयन माऊंटन्स दिसतात. तिथं मी अंदाजे २० मिनिटं एकटीच होते. त्या सुंदर बीचवरच्या सनसेटचे ते शांत क्षण अविस्मरणीय! तर मॉन्टेनेग्रोमधल्या कोटोर शहारात एकाच वेळी स्नो माऊंटन्स आणि बीच दोन्ही दिसतात.
7
एवढा प्रवास करताना काही किस्से न घडले तरच नवल. जेरुसलेमध्ये असताना एकाच दिवशी आम्हांला चर्च बेल, मग ज्युईश वॉलवरच्या प्रेअर्स आणि संध्याकाळी मुस्लिमांची अजान ऐकायला मिळाली. तो एक वेगळाच अनुभव होता. स्वित्झर्लण्ड आणि मिलानमध्ये मी माझा वाढदिवस नुकत्याच भेटलेल्या एका फिलिपाईन्स कपलसोबत सेलिब्रेट केला. डुब्रोवनिक, क्रोएशियामध्ये माझी मत्री एका म्युझिक बॅण्डशी झाली. चारेक तास मी त्यांची आणि त्यांनी माझी गाणी ऐकली. माझ्या लक्षात आलं की, चांगली माणसं नि फ्रेण्डस् कुठंही होऊ शकतात.
सायप्रसमध्ये मी बाय चॉइस थांबलेय. मला अमेरिकेला जायची संधी मिळाली होती, पण मी ती नाकारली, कारण मला युरोप अधिक एक्सप्लोर करायचा होता. ऑफिस पाच मिनिटांवर असल्यानं घरी आल्यावर वाचन आणि म्युझिकला खूप वेळ मिळतो, जो भारतात कदाचित मिळाला नसता. इथं आल्यावर मला गाणं शिकण्यासाठीही वेळ मिळाला आणि गिटारचे ऑनलाईन धडे गिरवत मी शिकलेय. अमित त्रिवेदी, स्नेहा खानविलकरचं संगीत आवडतं. ए. आर. रहमानचं संगीत तर फार भावतं. कारण त्याच्या अनेक गाण्यातली लोकेशन्स नि भारतातल्या भटकंतीतली ठिकाणं रिलेट होतात. आवर्जून तासभर योगासनं करते. मॅरेथॉनमध्येही भाग घेतेय.
मी वर्षांतून एक-दोनदा भारतात येते. सायप्रसला दोन आठवड्यांसाठी आईबाबा येऊन गेलेत. मी रॉक म्युझिक कॉन्सर्ट्सना आणि क्लब्ज-पार्टीजना जाते. फिरस्तीच्या अनुभवांवर ब्लॉग लिहिते. आणखी एक-दोन वर्ष इथं राहून भारतात परतायचा किंवा अमेरिकेला जायचा विचार चालू आहे. एकटीनं प्रश्न सोडवता सोडवता आपण इमोशनली अधिक स्वतंत्र होतो.. शाळेत असताना लोकांना चांगला संदेश देणारया नुक्कड नाटकांमध्ये सहभागी व्हायचे.. ते अजूनही कुठंतरी डोक्यात आहे.. मुंबईनं मला बेस दिलाय. मी अजूनही ‘मुंबईकर’च म्हणवते स्वतला.. त्यामुळं मुंबईसाठी काही काम करायची इच्छा आहे.. चला, गोष्टीला अल्पविराम देते माझ्या. क्यों की ऑफिसटाईम हो गया.. चलती हूँ.. बाय!
(शब्दांकन – राधिका कुंटे)

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’साठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com