हर्षदा जोशी नाटेकर कॅलिफोर्निय, यू.एस..

रसायनशास्त्रात संशोधन करून पर्यावरणपूरक ‘पर्यायी खाद्यपदार्थ’ निर्माण करण्याचं वेगळं काम करणारी हर्षदा सांगतेय तिचे ‘बे एरिया’तले अनुभव.. वनस्पतीजन्य बीफ अर्थात ‘व्हेज मीट’ तयार करण्याची जादू करणाऱ्या संशोधकांपैकी हर्षदा एक आहे. इम्पॉसिबल फूड्स या कंपनीत ती रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून नोकरी करते आणि या कंपनीने बनवलेल्या व्हेज मीटचा पहिला बर्गर अमेरिकेच्या बाजाराच नुकताच धडकलाय.

हाय फ्रेण्ड्स, मी मूळची मुंबईकर. आमचं टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. घरी आईबाबा नि बहीण. शाळेत असताना मला कविता करण्याची आवड होती. पुढे मुंबईच्याच खालसा कॉलेजमधून बी.एस्सी. आणि मुंबई विद्यपीठातून ‘इनऑरगॅनिक केमिस्ट्री’मध्ये एम.एस्सी. केलं. शिक्षणक्षेत्राकडं कल असल्यामुळं हंसराज  जीवनदास कॉलेजमध्ये बी.एड. केलं. त्यानंतर वर्षभर पाटकर ज्युनिअर कॉलेजला केमिस्ट्री लेक्चरर होते. त्या वेळी थोडी दुविधेत होते की, पीएच.डी. करावं की शिकवणं चालू ठेवावं.. मग दादरच्या आय.ई.एस. ओरायन शाळेत तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवलं. मुलांना शिकवताना खूप मजा आली. केमिस्ट्री खूप आवडता विषय होता, शिवाय शिक्षणक्षेत्रात करिअर करायचा विचार सुरू होता. दरम्यान माझं लग्न सुयोग नाटेकरशी ठरलं. सुयोग तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झालेला असल्यानं इथं यायचं ठरलं. लग्नाची तयारी करतानाच इथल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायच्या दृष्टीनं परीक्षांचा विचार सुरू होता. रसायनशास्त्रात संशोधनात्मक शिक्षण घ्यायचं ठरवलं, कारण कॅलिफोर्नियात संशोधनाला पुष्कळ वाव आहे. त्या दृष्टीनं परीक्षांची तयारी सुरू करून अर्ज पाठवले.

इथं येऊन मला चार र्वष झाली आहेत. मी सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीतून अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये एम.एस. केलं. सायंटिफिक जर्नलमध्ये माझं संशोधन प्रसिद्ध झालं. आपल्याकडं विद्यार्थ्यांचे गुण आणि टक्केवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला काय येतं याविषयी हे गुण काहीही दर्शवत नाहीत. इथं ‘जीपीए’ अर्थात ग्रॅण्ड पॉइंट अ‍ॅव्हरेजसह शिक्षण किंवा नोकरीच्या वेळी कोणती प्रोजेक्ट्स केली आहेत, कामाचा अनुभव किती आहे वगैरे मुद्दे विचारात घेतले जातात. भारतात आपण शिकत राहतो आणि चार पदव्या घेतल्यावर नोकरी शोधतो. इथं एक पदवी घेतात, मग कामाचा अनुभव घेतात मग पुन्हा शिकतात. हा दृष्टिकोन मला खूप आवडला. आपल्याकडं प्रश्न विचारायला खूप भीती वाटते. अनेकदा प्राध्यापकांची ठरलेली उत्तरं, थिअरीज आणि नोट्स्् असतात. अजूनही आठवतंय की, माझं पहिलं लेक्चर होतं. मला एक आठवडा उशीर झाला होता, भारतातून इथं यायला. माझा पहिलाच क्लास होता. थोडी धाकधूक मनामध्ये होतीच. मी लेक्चरला गेले. तिथं एक प्रोफेसर आधीच आलेले होते. त्यांची परवानगी घेऊन मी आत गेले. आश्चर्य म्हणजे त्यांनी मला नावानं हाक मारली. माझी विचारपूस केली. त्यानंतर माझ्या चुकलेल्या लेक्चर्सच्या नोट्स त्यांनी दिल्या. मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता. इथं प्रश्न विचारण्याला खूप महत्त्व आहे. एकेका मुद्दय़ावर सविस्तर चर्चा केली जाते. मी एम.एस. करतानाच दुसरीकडं इथल्या बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांची ‘टीचिंग असोसिएट’ म्हणून काम करत होते. लॅब इन्स्ट्रक्टर म्हणून तीन सेमिस्टर केलेल्या कामाचा अनुभवही खूप काही शिकवून गेला. सुरुवातीला विद्यार्थी मला कसं स्वीकारतील, असं वाटलं होतं. काही लेक्चर्सनंतर आमच्यातलं अवघडलेपण दूर झालं. मग शिकवायला – शिकायला मजा आली. मला बेस्ट टीचिंग असोसिएट म्हणून नावाजलं गेलं.

गेली दीड र्वष मी इम्पॉसिबल फूड्समध्ये नोकरी करते आहे. (Impossible Foods Inc)  माझ्या कंपनीत खूप मोकळं वातावरण आहे.  प्रत्येकाला कामाचं स्वातंत्र्य आहे. ठरावीक मुदतीत आपण आपलं काम पूर्ण करायचं असतं. इथं गुणवत्तेला महत्त्व दिलं जातं. माझ्या कामाविषयी सांगायचं झालं तर.. आम्ही वनस्पतीजन्य पण मांसाहारींना आवडतील असे पदार्थ तयार करतो. मांसजन्य पदार्थाचे मॉलिक्यूल लेव्हलला विश्लेषण करून तेच मॉलिक्यूल्स वनस्पतींमधून शोधले जातात आणि त्यापासून ही जादू होते. आम्ही हेम हा वनस्पतीजन्य घटक आणि खोबरेल तेल, प्रथिनयुक्त बटाटा आदी पदार्थ मुख्यत्वे वापरून हा पर्यायी खाद्यपदार्थ तयार केला आहे. हे प्रॉडक्ट चार महिन्यांपूर्वीच आम्ही लाँच केलंय. सध्या ते मोजक्याच रेस्तराँमध्ये उपलब्ध आहे. काही काळानं ते सुपरमार्केटमध्ये येईल. माझा मित्र एका सोशल मीडियाच्या कंपनीत काम करतो. त्याच्या ऑफिसमधल्या काही जणांना या व्हेज बीफ बर्गरबद्दल कळल्यावर ते तो खायला गेले होते. त्यांनी मित्राला त्याबद्दल सांगितलं आणि त्याच्याकडून मला हे कळलं. तेव्हा खूप छान वाटलं. या नोकरीत मी रिसर्च असोसिएट कक – (सायंटिफिक रिसर्चर) – अ‍ॅनालिस्ट आहे. मी वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे नमुने त्यांच्या मॉलिक्युलर लेव्हलला विभाजन करून त्यांतील मूलभूत घटकांचं विश्लेषण मास स्पेक्टोमेट्री टेक्निक वापरून करते. आपल्याकडं ही उपकरणं अत्यंत महाग असल्यानं केवळ इंडस्ट्रीतच असतात. मला केमिस्ट्रीची आवड बारावीपासून आहे. त्यात सखोल संशोधन करता येतं आहे, हे सुदैव. एकदा मी एका सॅम्पलवर जवळपास तीन आठवडे काम करत होते आणि अखेरीस मला त्याची उकल करता आली. शिकवतानाही विद्यार्थी सांगतात की, शिकताना खूप मजा आली, हे क्षण अत्यंत महत्त्वाचे आणि आनंददायी असतात. पुढच्या गोष्टींचा फारसा विचार केलेला नाही. सध्या मी संशोधन क्षेत्रात काम करते आहे. त्यात खूप गोडी वाटतेय. अजून वेगवेगळ्या टेक्निक शिकाव्यात, असं मनाशी आहे. तो अनुभव गाठीशी जमा करून मग परत यावं, असा विचार चालू आहे. काही वर्षांनी कदाचित वेगळ्या क्षेत्रातही जाऊ  शकते. संशोधनाखेरीज शिकवणं हाही पर्याय कदाचित निवडेन.

मी सॅन फ्रान्सिस्को बे एरियात राहते. खऱ्या अर्थानं ही मिश्र संस्कृती आहे. जॉब आणि कॉलेजमध्येसुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी मैत्री झाली. त्यात इराण, मध्य पूर्वेकडील काही देश, दक्षिण अमेरिका, ब्राझील, पूर्व युरोपीय देशांतील लोक होते. मायदेशी असताना आपलं मर्यादित स्वरूपाचं वर्तुळ असतं. विचारांची ठरावीक पद्धत असते आणि आपण त्या जीवनशैलीत रममाण असतो. इथं वेगवेगळ्या संस्कृतींतील लोकांना भेटता आलं. खूप गोष्टी शिकायला मिळतात. इथं रुळताना काही गोष्टी नव्यानं शिकून घ्यायला लागल्या. सुरुवातीच्या काळातला अ‍ॅक्सेंटचा प्रश्न सरावानं लगेचच सुटला. सगळ्यात मोठ्ठं ध्येय होतं ते ड्रायव्हिंग शिकण्याचं. कॉलेजला जाण्यासाठी बसच्या पर्यायाची पळवाट शोधली होती खरी. पण बसची फ्रीक्वेन्सी एवढी चांगली नसते. तिथली सार्वजनिक वाहतूक फारशी चांगली नाही. पण जॉब करायची वेळ आली तेव्हा, ते सुयोगकडून शिकले. खूप पेशन्सनी शिकवलं त्यानं. इथले ड्रायव्हिंगचे नियम वेगळे आहेत आणि ते पाळावेच लागतात. आता दीड र्वष चांगलं ड्रायव्हिंग करतेय मी. आधी एमएसचा अभ्यास करताना आणि आता जॉब लागल्यावरही सुयोगची कामात खूपच मदत होते. त्यानं कायमच मला प्रोत्साहन दिलंय. तो इथे ‘गुगल’मध्ये जॉब करतो.

फिरायची आम्हाला आवड आहेच. नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा निसर्गरम्य ठिकाणी जायला अधिक आवडतं. जंगल ट्रेलला खूपदा जातो. इथले बीचेस एकदम निवांत आहेत. गजबज नसते फारशी. भोवताली वॉकिंग किंवा सायकलिंग ट्रॅक केलेले असतात. आम्ही हवाई, मायामीला जाऊन आलो. न्यूयॉर्क गेलो होतो. नायगारा फॉल्स पाहिला. कॉन्फरन्सेसच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. मराठी नाटकांची खूप आवड असल्यानं ती मिस करते. मी ‘आविष्कार’मध्ये पाचवी ते दहावी शिबिरांना जायचे. नाटकांतही काम केलं होतं. पुढं अभ्यासामुळं नाटय़कला मागं पडली. इथं फारशी नाटकं येत नाहीत. तुलनेनं हिंदी-मराठी चित्रपट अधिक येतात. वाचनाची खूपच आवड आहे. इथं मला वाचायला खूप वेळ मिळतो. इथं मी किंडल घेऊन समुद्रावर किंवा गार्डनमध्ये जाऊन वाचत बसते. इथं प्रत्येक काउंट्री आणि सिटीमध्ये ठरावीक जागा हरित ठेवलीच पाहिजे असा नियम आहे. त्यामुळं कोपऱ्याकोपऱ्यांवर मोठाली गार्डन असतात. लाँग ड्राइव्हला जायला खूप आवडतं. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतं. उदाहरणार्थ हवाईला गेलो असताना स्कूबा डायव्हिंग होतं. मला पोहता येत नाही. तरी घाबरत पाण्यात उतरले, फ्लोटर वगैरे लावून. मला हॉट एअर बलूनची राइड घ्यायची आहे, बघूया कधी जमतंय ते. इथल्या मराठी नाटकांच्या ग्रुपला जॉइन करायचा विचार आहे.

इथं केप्रच्या लोणच्यापासून ते चितळ्यांच्या बाकरवडीपर्यंत सगळे पदार्थ मिळतात. तरीही मुंबईचा वडापाव प्रचंड मिस करते. मी खूपच स्वावलंबी झालेय. आत्मविश्वास अधिक वाढलाय. दृष्टिकोन खूप विस्तारलाय. इतक्या लोकांशी संवाद साधल्यानं आणि त्यांच्या संस्कृतीची माहिती करून घेतल्यानं विचारांत बदल झालाय.  माझे आवडते गायक किशोर कुमारांचं जीवनार्थ उलगडणारं मी गाणं अनेकदा गुणगुणते, जिंदगी एक सफर हैं सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना..

जगभरात बीफ आणि इतर मांसजन्य पदार्थाना खूप मागणी आहे. पण ज्या पद्धतीनं हे मीट उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो, ते पर्यावरणाकरता अतिशय घातक आहे. डेअरी प्रॉडक्ट्स आणि मांस उद्योगासाठी पशुपालन केलं जातं. पण खाण्यायोग्य मांस बनवण्याच्या आणि मीट प्रोसेसिंगच्या प्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणावर मिथेन वायू तयार होतो. जागतिक तापमानवाढीला हा वायू मुख्यत्वे जबाबदार आहे. विविध प्रकारच्या गाडय़ा, विमानादींमुळं होणाऱ्या प्रदूषणापेक्षा पशुपालनामुळं होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे. कॅलिफोर्नियास्थित आमची कंपनी ‘वनस्पतीजन्य बीफ’ तयार करते. आम्ही तयार केलेला व्हेज बीफ बर्गर अमेरिकेतल्या मोजक्या रेस्टराँमधून नुकताच लाँच झाला.