‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.

म्युझिक व्हिडीओ महत्त्वाचे की ज्यासाठी तो करण्यात आलाय ते गाणे महत्त्वाचे? एमटीव्हीत्तर काळामध्ये हा प्रश्न अस्तित्वात आला. एखाद्या ठीकठाक गाण्याचा व्हिडीओ त्या गाण्याला भलतेच यशस्वी करू शकतो आणि एखादे सुंदर गाणे व्हिडीओ न केल्यामुळे फारशा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, असा अनुभव नव्वदीच्या दशकातील कलाकारांना आला. एखादा अल्बम तयार करायचा. त्यातील आठ किंवा दहा गाण्यांपैकी दोन किंवा तीन गाणी एमटीव्ही-व्ही चॅनलवर प्रमोशनसाठी व्हिडीओ शूट करावी. मग त्या शूट केलेल्या गाण्याची लोकप्रियता वाढली की तेच गाणे हजारो वेळा कन्सर्टमध्ये गात राहायचे हा जगभरच्या रॉकस्टार, पॉपस्टारचा शिरस्ता होता. बहुतांश व्हिडीओजच्या तीन ते पाच मिनिटांत एखादी गोष्ट सांगितलेली असायची. चित्रपटामध्ये संगणकाचा वापर झाल्यानंतर जो बदल झाला, त्याचे पडसाद एमटीव्हीवरील गाण्यांच्या व्हिडीओवर अधिक उमटलेले दिसतात. संगणक आल्यानंतर व्हिडीओ सादरीकरणाच्या संकल्पनांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर नावीन्य आले. हे नावीन्य लक्षात आणणारा एक व्हिडीओ ब्रायन अ‍ॅडम्स या कॅनडातील गायकाचा आहे. आपल्याकडे १९९६ ते २०१२पर्यंत त्याच्या गाण्यांचे तरुणाईमध्ये तुफान वेड होते. त्याची प्रेम आणि प्रेमविरह गीते वेगवेगळ्या प्रकारे भारतीय गाण्यांच्या चालींमध्येही शिरली आहेत. तर या कलाकाराच्या ‘फ्लाइंग’ या गाण्यामध्ये त्यानी गाण्यात नेहमीप्रमाणे गोष्ट सांगितलेली नाही. त्याच्या व्हिडीओ दिग्दर्शकाने चार वेगवेगळ्या चित्रीकरणांतून त्या चित्रीकरणातील त्याच्या चेहऱ्याचे तुकडे करून ते एकत्र जोडले. परिणामी त्याचा जोडलेला चेहरा गाणे गाताना दिसतो आणि पाठीमागे रेल्वेच्या पारदर्शक काचांतून दिसणारा परिसर चित्रित होतो. पाहणाऱ्याला एकत्रित जाणीव गाण्यातील संगीताला आणखी परिणामकारक केल्याची होते. ब्रायन अ‍ॅडम्सच्या गाण्याहून काहीसा विचित्र प्रकार त्याआधी कैक वर्षे आलेल्या इनिग्मा या बॅण्डच्या ‘रिटर्न टू इनोसन्स’ या गाण्यामध्ये झाला आहे. व्हिडीओकर्त्यांने गोष्टी शूट केल्या आणि त्या स्लोमोशनमध्ये उलटय़ा फिरविल्या आहेत. म्हणजे आपल्याला गाण्यामध्ये सायकल उलटी चालताना दिसते. घोडा उलटा धावताना दिसतो. झाडांवरून फळे काढणारी नाही तर झांडावर फळे डकविणारे लोक दिसतात. कोंबडीला पिसे लावण्याची प्रक्रिया दिसते आणि ऑम्लेटचे अंडे होताना देखील पाहायला मिळते. या गाण्यामध्ये शब्द कमी आहेत आणि मंत्रोच्चारसदृश हाळ्या अधिक  आहेत. अमेरिकी आदिवासींच्या लोकसंगीताचा तो भाग आहे. गाण्यातील गोष्ट आहे, मृत्यू ते जन्मापर्यंतचा उलटा प्रवास. तो ज्या संकल्पनेने मांडला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून अनुभवावा असा आहे.

कोल्डप्ले या संगीतसमूहाची गाणी जगभरात लोकप्रिय आहेत. ‘अप अ‍ॅण्ड अप’ या त्यांच्या गाण्यामध्ये हजारो व्हिडीओजचे मिक्सिंग आणि संगणकीय एडिटिंगचे कौशल्य दिसते. इथे मासे आकाशात उडताना दिसतात. पक्षी पाण्यात पोहताना दिसतात. कधी माणसांचे आकार अतिप्रचंड दिसतात. कधी घोडे पाण्यावरून पळताना दिसतात, तर अंतराळ तळामध्ये तर पृथ्वी अवकाशात दिसते. जुने व्हिडीओ-नव्याचे एकत्रीकरण आणि स्वप्नातही दिसू शकणार नाही इतके दृश्यवैविध्य या गाण्यामध्ये पाहायला मिळते.  स्वप्नांसारखेच पण दु:स्वप्नांप्रमाणे शोभावा असा एक व्हिडीओ वुडकिड या बॅण्डने आपल्या ‘रन बॉय रन’ या गाण्यासाठी तयार केला आहे. या गाण्याचे सौंदर्य त्याच्या कृष्ण-धवल रूपात आहे. एक शाळकरी मुलगा यात धावताना दिसतो आणि त्याच्यासोबत जमिनीतून राक्षसांची एक साखळीच धावताना दिसते. सुरुवातीला दप्तर घेऊन धावणारे हे मूल राक्षसांच्या भीतीने पळ काढत असल्याचे भासते. नंतर त्यातला एक राक्षस त्याला समांतर धावतो. लढण्यासाठी त्याला शस्त्र उपलब्ध करून देतो आणि त्याच्या धावण्यासोबत राक्षसनिर्मितीचा ओघ काही आटत नाही. एका आयुष्यात माणसाला कित्येक मानसिक बागडबिल्ला राक्षसांशी सामना करावा लागतो, हे स्पष्ट करणारे गाणे त्यातल्या बिट्समुळे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.

संगणकीय इफेक्ट्स वापरणे सुरुवातीला कमीपणाचे मानले जात असे. पण नंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो  म्युझिक व्हिडीओजमुळे. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे दर्शविण्यासाठी कलाकार आपल्या म्युझिक व्हिडीओजमध्ये स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्याला पसंती देतात. त्या चित्रीकरणामुळे तयार झालेल्या वेगळ्याच जगाचे गाणे लक्षात राहावे, यासाठी दक्ष असतात. या वेगळेपणाच्या अट्टहासाचे सगळेच प्रयोग जमतात असे नाही. तरीही जे जमतात ते आपल्याला दृश्यश्रीमंत बनवतात, हे मात्र खरे.

viva@expressindia.com