नवा उद्योग सुरू करण्यासाठी वय, पैसा, शहर, शिक्षण, भाषा या कशाचंच बंधन नसतं. महत्त्वाची असते ती जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि चिकाटी. गेल्या आठवडय़ात व्हिवा लाउंजमध्ये नंदुरबारपासून विदेशापर्यंत पोहोचलेल्या एका उद्योजिकेची यशोगाथा ऐकताना याचीच जाणीव झाली. ‘स्पा आणि वेलनेस’ या तुलनेने अल्प परिचित क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजिका आणि ‘ग्लोबल वेलनेस अ‍ॅम्बॅसीडर’ म्हणून ओळख मिळालेल्या रेखा चौधरी यांचा विस्मयकारक प्रवास उलगडला त्यांच्याबरोबरच्या संवादातून उलगडला. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी त्यांना बोलते केले.
प्रयत्नांती मेकओव्हर
आम्ही नवी मुंबईत राहायचो. या शहराबद्दल फारशी माहिती नव्हती. मुंबईतले रस्ते कळत नव्हते. तेव्हा गुगल मॅप्स नव्हते आणि असते तरी मला ते वापरायचं ज्ञान नव्हतं. मग स्कूटर काढून शहर पालथं घालायचे. शहरातली ब्युटी पार्लर बघायचे, निरीक्षण करायचे. मुंबई जाणून घ्यायला ही अशी सुरुवात केली. सोबत थोडं थोडं इंग्रजी शिकायला लागले होते. अर्थात क्लास लावायला वेळ नव्हता. मुलांकडूनच शिकत होते, बोलायचा प्रयत्न करत होते. माझ्याकडे बघून, माझं बोलणं ऐकून तेव्हा लोक हसतही होते. तरीही मी न लाजता, न घाबरता बोलत होते. इंग्रजी येत नाही म्हणून प्रगती थांबत असेल तर तो न्यूनगंड काढून टाकायला हवा, हे तेव्हाच कळलं होतं. ही केवळ एक भाषा आहे आणि सवयीने ती आत्मसात करता येते. कुठलं गोल्ड मेडल मिळवण्यासाठी नाही, तर स्वत:ला यावं म्हणून शिकलं पाहिजे. त्या वेळी लोकांना असंही वाटायचं, मी उगाच इंग्रजीत बोलून शो ऑफ करते; पण ते तसं नव्हतं. त्यामधलं कौशल्य वाढवण्यासाठी त्या भाषेमध्ये बोलायला हवं होतं. कुणी हसलं तरी बेहत्तर. माझ्या अपीअरन्समधला बदलही एका रात्रीत आलेला नाही. बघून बघून हळूहळू हा बदल मी घडवला. कुणाकडेही त्यासाठी गेले नाही. कुठले मॅनेजमेंटचे धडे घेतले नाहीत. फक्त न डगमगता काम करत राहिले.
नंदुरबारपासूनचा प्रवास
तीस वर्षांपूर्वी नंदुरबारमध्ये सौंदर्यविषयक जागरूकता नव्हती. ब्युटी पार्लर मी पाहिलंदेखील नव्हतं. तरीही वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या एका बहिणीचा मेक-अप मी केला होता. मेक-अप म्हणजे रंगरंगोटीच ती. मला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. टीव्ही वगैरे माध्यमं नसतानाही सौंदर्यप्रसाधन, मेक-अप यांचं ज्ञान अनुभवाने चुकतमाकत मिळवत गेले. अठराव्या वर्षी माझं लग्न झालं. मी धुळ्याला आले. एकोणिसाव्या वर्षी पहिली मुलगी झाली. एक आई म्हणून मुलीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. संसारात रमलेली असतानाच मला काही तरी वेगळं करावं हे सतत वाटत होतं. सौंदर्यसाधनेच्या क्षेत्रातच काही तरी करावं, हेही निश्चित होतं. मग ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठी घरच्यांची परवानगी घेतली. त्यासाठी नवऱ्याला, सासूबाईंना पटवलं. हे काम तेव्हा एवढं प्रतिष्ठेचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचा विरोध होता. माझे वडील सामाजिक क्षेत्रात होते. अशा घरातून आलेली एखादी मुलगी, गृहिणी वेगळं व्यक्तिमत्त्व घडवायचं ठरवते आणि असं फारसं अ‍ॅक्सेप्टेबल नसलेलं क्षेत्र त्यासाठी निवडते, हे सगळंच तेव्हा नवीन होतं.

न्यूनगंड काढून टाकायला हवा
आपल्याला शिकायचं आहे, हे निश्चित असेल तर कुणी हसलं, बोललं तरीही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिकायला, नवं काही सुरू करायला वय नसतं. वय, भाषा, गाव-शहर या कशाविषयी न्यूनगंड मनात असू नये. भाषेचा अडथळा तर प्रथम दूर करायला हवा. सौंदर्योपचार तंत्राचं ज्ञान मला आहे, या टेक्निकल नॉलेजच्या बेसिसवर तुमचा ब्रॅण्ड व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकेन हे समोरच्याला समजावून दिलं होतं. पण सुरुवातीला माझ्या ग्रामीण अवताराकडे बघून, ब्युटी पार्लरमध्ये ब्रॅण्ड घेऊन माझ्या बोलण्याची शैली ऐकून क्लाएंट मला सीरिअसली घेत नसत. पण पहिली काही मिनिटं माझं ऐकून झाल्यानंतर मी सामान्य विक्रेत्यासारखी नुसतं प्रॉडक्ट विकत नसून त्यातली संकल्पना देण्यात मला रस आहे, हे समजलं की समोरचा माणूस सरसावून ऐकत असे. या माझ्या टेक्निकचा, तळमळीचा मला फायदा झाला. पहिल्या भेटीत मला फारसा वेळ न देणारा माणूस दुसऱ्या भेटीत मात्र मला सोडायला दारापर्यंत यायचा.

‘स्व’ला जाणा
स्वत:च्या अंतरंगात डोकावून स्वत:चं नेमकं परीक्षण करायला प्रत्येकानं शिकायला हवं. आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू जाणून घेऊन त्यानुसार ‘स्व’चा विकास घडवावा. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज राहावं. चांगला मार्ग सापडतोच.

काही तर आगळंवेगळं करा
माझं अजूनही माझ्या विद्यार्थ्यांना, मुलांना सांगणं असतं की, जे काही कराल ते स्वत:च्या शैलीत करा. साधं ग्रॅज्युएशन करायचं असेल तरी त्यात काही तरी वेगळेपणा दाखवा. शिरपूरमधलं माझं ब्युटी पार्लरदेखील मी वेगळ्या पद्धतीने चालवलं. त्या काळी मी अपॉइंटमेंट बेसिसवर काम करायचे, याचंदेखील लोकांना नवल वाटायचं. मी त्या काळी गावीदेखील स्कूटर चालवायचे. मुलींना शाळेत सोडून आल्यानंतर त्यांना घ्यायला जाईपर्यंत मी काम करायचे. हा व्यवसाय तसा प्रतिष्ठेचा मानला जायचा नाही. त्यामुळे मग कुणी तरी नवऱ्याला काही सांगायचं. ब्युटी पार्लर वगैरे कशाला हवंय, असा सूर अधूनमधून यायचा. ते साहजिक होतं. मग पुन्हा समजावावं लागायचं. काही तरी वेगळं करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तेवढा संघर्ष करावाच लागतो. सासूला, नवऱ्याला पटवण्यासाठीही तिला अंगभूत कलागुण वापरावे लागतात. कुठल्याही स्त्रीला घरात कटकट करून कुठली गोष्ट अचीव्ह करायची नसते. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना तिला घरात शांतता हवी असते. आपल्या प्रयत्नांना सगळ्यांनी साथ द्यावी, असं तिला वाटत असतं.

वर्षांचा कोर्स महिन्यातच आटोपला
ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठी घरच्यांची संमती मिळाल्यावर मी शिकण्याचा धडाका लावला. वर्षभराचा कोर्स महिन्या-दीड महिन्यातच शिकून संपवला, कारण कुणाचं कधी मत पालटेल आणि माझा कोर्स बंद होईल हे सांगता येत नव्हतं. खूप दिवस उपाशी असलेली व्यक्ती कशी पटापट खाईल त्या शिकण्याच्या भुकेनेच मी भराभर शिकले. त्यानंतर शिरपूरला मी पहिलं ब्युटी पार्लर सुरू केलं. एंजल ब्युटी पार्लर. दरम्यान मला दुसरी मुलगीही झालेली होती. माझ्या भावाची मुलगीदेखील कायम माझ्यासोबत राहायची. अशा तीन मुली, घरातले सगळे यांचं रुटीन सांभाळून मी ब्युटी पार्लर चालवत होते. त्याआधी गावातल्या मुला-मुलींना नृत्य शिकवणं, त्यांचा गरबा बसवणं, कुकिंग क्लासेस असे नाना उद्योग मी करत होते; पण सगळं घरचं सांभाळून. अगदी पापड, कुरडया करण्यापासून सगळं घरी करायचो. अजूनही आपल्याकडे सुगृहिणीची हीच कन्सेप्ट रूढ आहे. स्वयंपाक आणि घरकामात तरबेज असेल तरच गृहिणी हुशार; पण ती हुशारी खरं तर सगळ्या स्त्रियांकडे उपजत असते. त्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे आणि तिनेदेखील स्वत:कडे पाहायला हवं.

5

 

खिलाडूवृत्ती
माझ्या खिलाडूवृत्तीचा या क्षेत्रात खूपच उपयोग झालाय. माझ्यासारखी एखादी गावातली मुलगी शहरात येते, या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडते, स्वत:च्या अस्तित्वासाठी प्रयत्नपूर्वक झगडते आणि स्वत:ला यशस्वीपणं सिद्ध करते. यादरम्यान मला अनेक अनुभवांना, आव्हानांना सामोरं जावं लागलं. बरेचदा मला पोशाखावरून, दिसण्यावरून हिणवलं गेलं. पण मी या सगळ्या गोष्टी खेळीमेळीनं घेतल्या. शाळेत असताना मी अभ्यासात चांगली होते आणि खेळात तर अव्वल होते. शाळेत भालाफेक, उंच उडी, धावणे यात भाग घेत असे आणि बास्केटबॉल टीमची कॅप्टन होते. पुढच्या आयुष्यात या खेळांतील खिलाडूपणा जोपासत मी स्वत:च स्वत:ची गुरू झाले. माझा खिलाडूपणा मला कधी हरू देत नव्हता. हरले तरी जिंकण्याचा आनंद मी त्यातून उपभोगत होते. मला स्वत:कडं लक्ष द्यायला वेळ कमी असला, तरी मी स्वत:कडं दुर्लक्ष करत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून, स्वत:ला मोटिव्हेट करून स्वत:ला आनंदी ठेवायचा प्रयत्न मी करते. तो सगळ्यांनीच करायला हवा.

स्वप्नपूर्तीसाठी धडपड
तू खूप स्वप्नाळू आहेस, खूप मोठी स्वप्न बघतेस असं मला पहिल्यापासून ऐकवलं जायचं. मुलांकडून इंग्रजीचे आणि त्यांच्याबरोबरच इंटरनेटचे धडे घेत असताना ‘स्पा’विषयी समजलं. ब्युटी पार्लर व्यावसायिक असले तरी स्पा या शब्दाशी माझी ओळख उशीरा झाली. २००४ च्या आधीची ही गोष्ट. त्या वेळीदेखील एक दिवस मुंबईत माझं मोठं स्पा असेल, असं मी बोलून दाखवलं होतं. मी आजही स्वप्न बघते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडदेखील करते. नुसतं स्वप्नात रमण्याऐवजी ते पूर्ण करण्याचा ध्यास माझ्या व्यक्तिमत्त्वातच आहे. त्याचा कुठेतरी फायदा झाला.

वाढत्या संधी
वेलनेस आणि स्पा हे वाढतं सेवा क्षेत्र आहे. १८ ते २० टक्के या दराने हे क्षेत्र विस्तारतंय. या सेवा क्षेत्रातली मोठी अडचण म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ. स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा याला इंडस्ट्रीला चांगला पाठिंबा मिळतोय. स्पा क्षेत्राचं रीतसर शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू होताहेत. या क्षेत्रांतही आता स्कॉलरशिप मिळू शकतात. मीदेखील नंदुरबारसह काही छोटय़ा गावांत अशा प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. या क्षेत्राचा दिवसेंदिवस विकासच होणार आहे. दीड महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत अनेक अभ्यासक्रम या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही करू शकता. मनुष्यबळाची एवढी चणचण आहे की, अगदी दीड महिन्याचा कोर्स केल्यानंतरही तुम्हांला रोजगार संधी मिळू शकते. शिक्षणाची अट नाही आणि रोजगाराची शक्यता अधिक असं दुसरं कुठलं क्षेत्र आहे? आता यातला एकच एक अभ्यासक्रम शिकायचा की, बऱ्याच गोष्टी शिकून पुढं मुसंडी मारायची, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बरेच कोर्सेस सुरू झाले आहेत. येत्या काही वर्षांत ‘मेडिकल स्पा’देखील सुरू होईल. विविध उपचारांच्या बरोबरीनं स्पादेखील एक उपचार पद्धत म्हणून नावारूपाला येऊ शकेल. त्यामुळं पर्यटनाला चालना मिळू शकेल.

..आणि व्यक्तिमत्त्व घडत गेलं
रेमिल्युअरच्या माध्यमातून मी २००५ मध्ये फ्रान्सला गेले. तिथे माझ्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं. माझी ट्रेनर होती ७२ वर्षांची एक फ्रेंच स्त्री. मला तिचा अ‍ॅटिटय़ूड खूप आवडला. तिच्याकडे बघताना जाणीव झाली की, आपण दुसऱ्यावर खूप विसंबून असतो. ती त्या वयातही स्वावलंबी होती. स्वतला छान प्रेझेंट करत होती आणि मुख्य म्हणजे तिलादेखील इंग्लिश येत नव्हतं. त्या स्त्रीला जर भाषेचा, वयाचा अडसर येत नसेल तर त्याचं दडपण आपण का घ्यावं? मला तिच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. माझ्यात नवा आत्मविश्वास आला. फ्रान्समधून पाच दिवसांचं ट्रेनिंग आटोपून येताना मी एक नवं व्यक्तिमत्त्व लेवून आले. डोळे- कान आणि मन उघडं ठेवलं तर प्रत्येक गोष्ट क्लासला जाऊन शिकायची गरज नसते.

दृष्टिकोनातला फरक
मसाज सेंटर्स आणि स्पा यामध्ये लोकांचा गोंधळ होतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी येतातच. मसाज पार्लरच्या नावाखाली काही अनैतिक गोष्टी चालतही असतील. त्यामुळे तिथे जायचं असेल तर सावधपणा ठेवायलाच हवा. पण ‘स्पा’कडं बघण्याचा दृष्टिकोनही त्यामुळे नकारार्थी असेल तर तो बदलायला हवा. स्पा हे क्षेत्र आपल्या सुआरोग्य आणि आनंदासाठी काम करतं. स्पामध्ये मसाज खूप कॉमन आहे. पण केवळ मसाज म्हणजे स्पा नव्हे. ‘स्पा’मध्ये येणारे मसाजविषयी सविस्तर चौकशी करतात. तो क्लाएंट म्हणून तुमचा अधिकार आहे. तुमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देण्यासाठी स्पा सेंटर्स बांधील असतात. स्पा सेंटर किती प्रोफेशनल आहेत, क्लाएंटला कसं काउन्सेलिंग केलं जातंय, कसं प्रेझेंट केलं जातंय आणि सेवा दिली जातेय, हे अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही स्पा सेंटरला जाणार असाल तर कुठली ट्रीटमेंट, तीच का हे प्रश्न अवश्य विचारा. ती कशा पद्धतीने दिली जाते, ते बघा. बऱ्याचदा ग्राहकांचाही अयोग्य दृष्टिकोन असतो. अशा क्लाएंटला कसं हॅण्डल करायचं, याचं आम्ही स्पा सेंटरच्या स्टाफला ट्रेनिंग दिलेलं असतं. खरं तर ‘स्पा’वर धाड टाकण्याचा अधिकार पोलिसांना नाही. काही चुकीच्या गोष्टी वाटल्यास त्यावर कोणत्या पद्धतीनं कारवाई करावी, यालाही काही मर्यादा असतात. पण पोलीस खातं त्यांचं काम करतं आणि स्पावाल्यांना त्यांचे हक्क माहिती नाहीत, यात दोष कुणाचाच नाही. स्पा क्षेत्र असंघटित असल्याने असं होतं. आता ते संघटित होतंय. या क्षेत्रात कायदेशीर परवाना मिळाल्यानंतर त्याचं स्वरूप बदलेल. त्यासाठी आवश्यक असणारी पावलं उचलली जाताहेत.

‘स्पा’ची संकल्पना जुनीच
बॉडी, माइंड, सोल हे शब्द सगळीकडे आजकाल लिहिलेले असतात. या सगळ्याचं समाधान या वेलनेस संकल्पनेत आहे. स्पा ही संकल्पना आपल्यासाठी खरं तर नवी नाहीच. आपल्या परंपरेत ही संकल्पना आहे. केवळ स्पा हा शब्द नवीन आहे. आपल्या अनेक तीर्थक्षेत्रांपाशी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यात आंघोळ केली की, आजार बरे होतात असं म्हटलं जातं. तीच ही ‘स्पा’ची संकल्पना आहे. किंवा ‘सोळा शृंगार’ ही आपल्याकडची संकल्पना आहे, त्यातही हे असं अभ्यंग, तेलमर्दन वगैरे गोष्टी येतात. फक्त त्या पूर्वी राजे-रजवाडय़ांपुरत्या मर्यादित होत्या. स्पा हा शब्द युरोपीय संस्कृतीतून आला आणि मग आपण त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो. बाहेरून आल्यामुळे आता आपल्याला या संकल्पनेचं अप्रूप वाटतंय.
..आणि पहिलं पेटंट घेतलं
रेमिल्युअरची प्रॉडक्ट विकताना मी त्यामागच्या संकल्पनेसह विकत असे. प्रॉडक्टसोबत मी स्वत: डेव्हलप केलेल्या काही ट्रीटमेंट्सही सुचवायला मी सुरुवात केली. स्वत:चा विकास मी त्यातून साधत होते. ती प्रॉडक्ट्स वापरून फूट स्पा आणि हॅण्ड स्पा मी सुरू केलं. पण एका मोठय़ा कंपनीने माझी ही संकल्पना जशीच्या तशी स्वतची म्हणून उचलली. तेव्हा मला स्वत:च्या कल्पनेचं पेटण्ट घ्यावं असं वाटलं. जिओ स्पा थर्मोथेरपी नावाची नवीन ट्रीटमेंट मी सुरू केली आणि त्यासाठी पेटंट मिळवलं. स्पा ट्रीटमेंटचं पेटण्ट मिळवणारी मी पहिली भारतीय ठरले.

उद्योगी व्हा
ब्युटी पार्लर किंवा स्पा तुम्ही कुठल्याही भागात सुरु करू शकता. कारण तुम्ही असा उद्योग सुरू करणार नाही, तोपर्यंत लोकांना त्याची सवय लागणार नाही. थायलंडमध्ये मसाज करणारे लोक जागोजागी दिसतात. ही संस्कृती आपल्याकडंदेखील यायला हवी. आपली आतिथ्यशील वृत्ती, संस्कार त्यासाठी उपयोगी ठरू शकतील. त्याला शिक्षणाची जोड द्यायला हवी. सातत्यानं प्रयत्न करा, यश नक्की मिळेल.

गावाकडून शहराकडे
मला इंग्रजी अजिबात बोलता यायचं नाही. अभ्यासातदेखील मी खूप हुशार नव्हते. ५५-६० टक्के मिळत असत; पण इतर अ‍ॅक्टिव्हिटीज मी खूप करायचे. बास्केटबॉल खेळायचे. माझे वडील मात्र शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे होते. त्यांनी गावातल्या काही मुलांना शहरात शिकण्यासाठी मदत केली होती. मग माझ्या मुलींनाही तसं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी मी त्यांना घेऊन मुंबईत का येऊ नये.. या विचाराने २००० साली मुंबईला यायचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणाचा विचार करून मोठय़ा शहरात यायचं ठरवलं. पतीने आणि सासूने मला या निर्णयात पाठिंबा दिला; पण गावातल्या स्त्रीला शहरात रुळणं सोपं नसतं. गावात आपण कितीही हुशार असलो तरी मुंबईसारख्या शहरात, महासागरात आपली किंमत काहीच नसते. शिक्षण, राहणीमान, वातावरण सगळ्यातच फरक जाणवतो. शहरी वातावरणात रुळण्याची सुरुवात राहत्या सोसायटीपासून केली. पहिल्या होळीच्या सणाच्या वेळी कचऱ्याची होळी ही संकल्पना मांडली. मला चांगली रांगोळी काढता यायची. मुलांना मदतीला घेऊन रांगोळी काढली आणि उत्साहात सगळ्यांच्या साथीने सण साजरा केला. माझ्या गावाकडच्या राहणीमानाकडे बघून सुरुवातीला न बोलणारी मंडळी हळूहळू बोलायला लागली. मुलांना शहरातील शाळेत अभ्यास झेपेल का, ते पास होतील की नाही, हाच पहिल्या वर्षीचा टास्क होता. मुलं शाळेत रुळल्यानंतर मी स्वत:च्या करिअरकडे बघायला सुरुवात केली. सुरुवातीला एका ब्रॅण्डची प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि यथावकाश स्पा सुरू केला आणि ‘जेसीकेआरसी’ ही स्वतची कंपनी सुरू केली.

6

टर्निग पॉइंट
हळूहळू मैत्रिणी होत गेल्या. एका मैत्रिणीच्याच माहितीवरून वरळीत एका मोठय़ा ब्युटी ब्रॅण्डचं प्रदर्शन लागल्याचं कळलं. रेमिल्युअर या ब्रॅण्डने वरळीला हे प्रदर्शन भरवलं होतं. मी तिथे गेले. योगायोगानं त्याविषयी स्टॉलवर चौकशी करत असतानाच तिथल्या एका प्रतिनिधीला दहा मिनिटांत डेमो द्यायचा होता, त्यानं मलाच मॉडेल म्हणून स्टेजवर येशील का म्हणून विचारलं. त्या प्रॉडक्टची पहिली ट्रीटमेंट माझ्यावर देण्यात आली. मला त्यानंतर फीडबॅक द्यायचा होता. मी अर्थातच हिंदीतच फीडबॅक दिला; पण मला या गोष्टींतलं टेक्निकल नॉलेज असल्यानं मी नेमका फीडबॅक दिला. रेमिल्युअर ब्रॅण्डच्या प्रतिनिधींना जाऊन भेटलेदेखील. त्यांना माझ्याविषयी सांगितलं आणि मला त्यांचा ब्रॅण्ड रिप्रेझेंट करायला आवडेल, असंही सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. गावाकडच्या गृहिणीचा पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याचा तो पहिला प्रसंग. नवऱ्याला सोबत घेऊन गेले आणि माझ्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत त्यांना मला या ब्रॅण्डचा प्रतिनिधी व्हायला आवडेल, असं सांगितलं. तोच आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.

ग्लोबल वेलनेस डे
ग्लोबल स्पा अ‍ॅण्ड वेलनेस समिटसाठी २०१०मध्ये मी भारताचं प्रतिनिधीत्त्व केलं. आता माझी ग्लोबल वेलनेस अ‍ॅम्बॅसीडर म्हणून निवड करण्यात आलेय. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. लोकांमध्ये हेल्थ आणि वेलनेसविषयी जागृती करण्याचं काम यात अपेक्षित आहे. येत्या ११ जूनला भारतात आपण पहिला ‘ग्लोबल वेलनेस डे’ साजरा करणार आहोत. वेलनेस तुमच्या आनंदात आहे. तुम्ही स्वत: आनंदी असाल, तर दुसऱ्यांना आनंदित ठेवू शकता आणि पर्यायानं समाज आनंदित होऊ शकतो. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. त्याचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली आहे. आपण काही ना काही कारणानं ही काळजी घेऊ शकत नाही, ते काम स्पा आणि वेलनेस इंडस्ट्री करते.

‘मदर टच’ : नवीन अ‍ॅप
नवजात अर्भकाला तेल लावून मालीश करायची पद्धत आपल्याकडं पूर्वापार आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये ही पद्धत नव्हती. पण आता नव्याने येऊ पाहत आहे. आपल्याकडे मात्र सध्याच्या काळात असा मसाज करून देणाऱ्या स्त्रिया किंवा दाई मिळणं मुश्कील झालंय. ‘मदर टच’ संकल्पनेच्या माध्यमातून आम्ही गावाकडच्या स्त्रियांना या मसाजाचं शास्त्रीय पद्धतीनं प्रशिक्षित करतोय. बाळाला घालायला लागणाऱ्या अंगडय़ा-टोपडय़ापासून सगळ्या गोष्टी गावातल्या स्त्रियांकडून तयार करून घेतोय. सध्या या पद्धतीचं प्रशिक्षण दहा हजार स्त्रिया घेताहेत. त्यानंतर त्यांना शहरात प्लेसमेंट दिली जाईल. त्यासाठी व्यवस्थापन आणि योजना आखण्याचं काम चालू आहे. एक मोबाइल अ‍ॅप त्यासाठी लवकरच आणलं जाईल.

स्वत:कडे लक्ष द्या!
वेलनेस ही डेव्हलपिंग इंडस्ट्री आहे. आपण स्वत:च स्वत:चा हेल्थ आयकॉन बनणं हे वेलनेस संकल्पनेत आहे. मानसिक आणि शारीरिक सौंदर्यासाठी स्वत:कडे लक्ष द्या, हे या संकल्पनेत अपेक्षित आहे. स्त्रियांना एका विशिष्ट वयात आल्यावर विशेषत: ग्रामीण भागात तर सर्रास सांगितलं जातं.. आता वय झालं. लग्न झाली, मुलं झाली की, आपसूक अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो- आता काय? धामधुमीत स्वत:कडे लक्षच दिलं जात नाही आणि मग चाळिशीतच वृद्धत्वाची जाणीव करून दिली जाते. ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. स्वत:कडे लक्ष द्यावं, असं ठरवलं तरी शेजारी-पाजारी, नातेवाईक हे करू देत नाहीत. या दबावाला स्त्री बळी पडते. मी कोण, मला काय करायचंय हे प्रत्येकीने ठरवायला हवं. स्वत: आनंदी राहायला हवं. शरीर, मन साथ देत नसेल तर आनंदी कसे असाल? घरातली स्त्री आनंदी नसेल तर त्याचे परिणाम संपूर्ण परिवारावर होतात. म्हणून हे स्वत:ला मेंटेन करणं आवश्यक. स्वयंपाक आणि घरकामात तरबेज असेल तरच गृहिणी हुशार; पण ती हुशारी खरं तर सगळ्या स्त्रियांकडे उपजत असते. त्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे आणि तिनेदेखील स्वत:कडे पाहायला हवं.मानसिक आणि शारीरिक सौंदर्यासाठी स्वत:कडे लक्ष द्या. त्यातूनच आनंद मिळेल. घरातली स्त्री आनंदी नसेल तर त्याचे परिणाम संपूर्ण परिवारावर होतात. म्हणून स्त्रीनं स्वत:ला मेंटेन करणं आवश्यक.