कार्टून मालिका, माहितीपर वाहिन्यांवरचे कार्यक्रम डब केलेले बॉलीवूडपट किंवा दाक्षिणात्य चित्रपट.. त्याचा आवाज आपण कधी कधी, कुठं ना कुठं ऐकलेला असतोच. हा आवाजाचा जादूगार कल्लाकार आहे, व्हॉइसओव्हर आर्टिस्ट संकेत म्हात्रे.

डबिंगचे क्षेत्र आजघडीला नवखे नाही. दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते हॉलीवूडपटांपर्यंत डब केलेले चित्रपट वेगवेगळ्या आवाजात आपल्यापर्यंत पोहोचत असतात. कित्येकदा या चेहऱ्यांमागचा खरा आवाज हा पडद्यामागेच असतो हे सत्य खरंतर व्हॉइसओव्हर आर्टिस्ट्सनीही पचवलेलं असतं. तरीही जेव्हा तो पडद्यामागचा डबिंग करणाऱ्याचा ‘आवाज’ लोकांच्या मनात घर करतो तेव्हा.. लोकं स्वत:हून सांगतात आम्हाला वरुण धवन नको, ‘संकेत म्हात्रे’चाच आवाज हवा. तेव्हा संकेतच्या आवाजाची जादू काय हे लक्षात येते. ‘कोलावरी’फेम धनुषचा ‘व्हीआयपी२’ हा चित्रपट प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. हिंदीतील धनुषचा आवाज, ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधला ‘थॉर’चा हिंदी आवाज असलेला हा व्हॉइसओव्हर आर्टिस्ट आहे संकेत म्हात्रे!

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

संकेतला महाविद्यालयीन जीवनापासूनच नाटय़क्षेत्राची आवड होती. त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हिडीओ इंजिनीअरिंग केलं, तरीही मनमोकळा सर्जनाविष्कार फारसा करता येत नव्हता. एका नामांकित कंपनीतल्या नोकरीत त्याचा जीव फारसा रमला नाही. मग त्याने मित्रांसोबत विक्रोळीला बॅण्ड जॅमिंग आणि व्हॉइस स्टुडिओ सुरू केला. तो स्टुडिओची व्यवस्था पाहायचा. एकदा एका रेकॉर्डिगसाठी व्हॉइस आर्टिस्ट न आल्याने वेळ निभावून नेण्यासाठी संकेतने त्याचा आवाज पोपटाच्या पात्राला दिला. त्या टीमला त्याचा आवाज खूप आवडला. त्यांनी काही ओळखीच्यांकडे संकेतच्या आवाजाचं कौतुक केलं. त्यांनी आणखी काहींना सांगितलं. असं होता होता संकेतकडे डबिंगच्या कामाचा ओघ सुरू झाला आणि मग दीड वर्षांत त्याने स्टुडिओ बंद करून पूर्णपणे आवाजाच्या दुनियेत स्वत:ला झोकून दिलं.

‘सुरुवातीची चार र्वष खूपच खडतर होती. काम करता करताच शिकणं आणि स्वत:ला घडवणं सुरू होतं. प्रसंगी १२ ते १६तास स्टुडिओत घालवत होतो. स्वत:चा स्टुडिओ बंद केल्याने डोक्यावर भयंकर ताण होता. त्या काळात पैशांची खूप बचत करायचो. त्याच सुमारास ‘बेनटेन’ या कार्टून सीरिजमधील खलनायकाच्या आवाज चाचणीसाठी बोलावण्यात आलं. माझा आवाज ऐकल्यावर नायक बेनसाठीही चाचणी घेण्यात आली. ती माझी पहिली मोठ्ठी अ‍ॅनिमेशन मालिका ठरली,’ असं संकेत सांगतो. त्यानंतर अनेक देशी-विदेशी कार्टून्ससाठी मी आवाज देतो आहे, पण बेनटेन माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. तो खूप लोकप्रिय झाला. तेव्हा सुरुवात असल्याने खूप उत्साह आणि कौतुक वाटलं होतं. त्यानंतर इतकी र्वष काम केल्यावर आपसूकच हा उत्साह थोडासा कमी होतो, मात्र त्यामुळे कामाच्या गुणवत्तेत फरक पडत नाही, असं सांगणाऱ्या संकेतने ‘बेनटेन’च्या हातावरच्या घडय़ाळाची कळ दाबल्यावर तो एलियन व्हायचा. त्या ११ एलियनसाठीही आवाज दिला आहे. ‘छोटा भीम’मधील जग्गू माकडाच्या इंग्रजी संवादासाठीही त्याने आवाज दिला होता. चित्रपटांसाठी आवाज देणं सुरू झाल्यावर ‘ग्रीन लँटर्न’ या चित्रपटाचा नायक अभिनेता रायन रेनॉल्ड्सला पहिल्यांदा आवाज दिला होता. त्यानंतर अनेक चित्रपट मिळत गेले. आवाज देण्याविषयीचा आपला अनुभव सांगताना तो म्हणतो की, नियमित आवाज देणं म्हणजे दिलेलं स्क्रिप्ट रेकॉर्ड करायचं. उदाहरणार्थ रेडिओसाठी वगैरे. पण डबिंगमध्ये आपल्यासमोर व्हिडीओ असतो. हेडफोनच्या डाव्या कानात मूळ आवाज इंग्रजीत ऐकू येतो. उजव्या कानात आपला स्वत:चा आवाज ऐकू येतो. समोरचं लिहिलेलं स्क्रिप्ट हिंदीत असतं. समोरच्या व्हिडीओतलं पात्र ज्या ठिकाणी शब्दविराम घेतं आहे, तिथेच हिंदीतही शब्दविराम आले पाहिजेत. ते सहजगत्या यायला हवेत. ही सगळी तंत्रं सांभाळणं जमलं नाही तर अनेक  जण भांबावून माघार घेतात, असं त्याने सांगितलं.

डबिंग करताना संकेतला अभिनयाची आवड जशी उपयोगी ठरली तसंच या कलेसाठी सरावही अतिशय गरजेचा ठरतो, असं त्याने सांगितलं. डबिंग कलाकाराचं वाचन वेगवान हवं. व्याकरणाचा डोलारा नीटपणे सांभाळता यायला हवा. त्याने यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. कामांतूनच तो शिकत गेला. मात्र या क्षेत्रात रस असणाऱ्यांना एखादा छोटा अभ्यासक्रम करायला हरकत नाही. जेणेकरून श्वसनतंत्र, माइकच्या तंत्रासारख्या अनेक मूलभूत गोष्टी त्यांना शिकता येतील, अशी माहिती तो देतो.

डबिंग क्षेत्रातील कलाकारांकडून त्याला वेगवेगळी कौशल्यं शिकता आली किंवा तो अजूनही शिकतो आहे. मेघना एरंडेसारखा लहान मुलांचे आवाज काढण्याचा खूप प्रयत्न केला आहे. विराज अधवला खूप फॉलो करायचा प्रयत्न करायचो. युरी लव्हेंथॉल आणि तारा ब्लॅक या परदेशी व्हॉइस आर्टिस्टनाही फॉलो करायचा प्रयत्न करतो. युरीच्या बऱ्याचशा इंग्रजी ऑडिओजना मी हिंदीत आवाज दिला आहे. शानूर हा देशी कलाकार इतका विनासायास आवाज देतो की, त्या पात्राच्या भावभावना त्याच्या चेहऱ्यावर अजिबात उमटत नाही. ते मला अजूनही साधलेलं नाही. काही कलाकारांकडून पॉझमार्किंगही शिकलो आहे, असं संकेत सांगतो.

संकेतने हॉलीवूडपटांपैकी काही आवाज आता ऑफिशिअली द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्या रायन रेनॉल्ड्सच्या ‘डेडपूल’ या चित्रपटाने त्या वेळच्या हिंदी चित्रपटांवर मात केली होती. तो सांगतो की, रायनला हिंदीत डब करायला खूप मजा येते. त्याला मोकळेपणानं नि उमदेपणानं आवाज देता येतो. तर ‘मार्सन’मधला नायक मंगळावर एकटाच अडकला होता. तो स्वत:शी, कॅमेऱ्याशी बोलतोय, हे आवाजातून दाखवताना खूप मजा आली. वैविध्यपूर्ण कामांमध्ये आव्हान मिळालं की ते करायला अधिकच मजा येते, असं सांगणाऱ्या संकेतने आतापर्यंत कार्टूनसाठी १५ तर ‘डिस्कव्हरी’ आणि काही चित्रपटांत ६०-६५ या वयोगटांसाठी आवाज दिला आहे. पण माझ्या आवाजाचा बहुतांशी वयोगट आहे २५ ते ४५ र्वष. ‘डिस्कव्हरी’वर ‘नासा’च्या एका मालिकेत काही निवृत्त अंतराळवीरांसाठीही आवाज दिला असल्याचे त्याने सांगितले. शिवाय, ‘९२.७ बिग एफ’साठी तो गेली सहा र्वष अनेक स्पॉट्स करतो आहे.

‘डिस्कव्हरी’ आणि ‘टीएलसी’सारख्या वाहिन्यांच्या भाषांचा दर्जा खूपच उंचावलेला आहे. त्यांना हिंदी भाषा फारच निर्दोष लागते. डबिंग डिरेक्टर असतातच. तिथे भाषा आणि उच्चारणावर खूपच काटेकोरपणं काम केलं जातं. ‘डिस्कव्हरी’ वाहिनी आपल्या कलाकारांबाबतीत खूपच काटेकोर असते. संकेतच्या मते एकूणच हिंदी डबिंगकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा थट्टेचा असतो. पण देशभरातील लोकांचा विचार केल्यास त्यांना इंग्लिश तितकंसं समजत नाही. त्यामुळे हिंदी भाषेतून सांगितल्याने खूप फरक पडतो.

मला स्वत:ला पाळीव प्राणी आणि जंगली प्राण्यांची आवड असल्याने ते कार्यक्रम करायला प्रचंड मजा येते. रोज खूप गोष्टी शिकायला मिळतात. ‘टीएलसी’साठी जिमी ऑलिव्हरला मी गेली सहा र्वष आवाज देतो आहे. प्रत्यक्षात मला त्याच्यासारखे पदार्थ करता येत नाहीत, पण माहिती मिळतेच. त्या त्या व्यक्तीच्या लकबींचा विचार करून आवाज द्यायचा माझा प्रयत्न असतो. आवाज देताना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा विचार केल्यास कार्टूनमध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य मिळतं. त्यात आवाजाशी थोडं खेळताही येतं, असं तो म्हणतो. तर चित्रपटात कथानकाचा तोल सांभाळावा लागतो आणि माहितीपर वाहिन्यांच्या मालिकांमध्ये फक्त ती माहितीच देणं अपेक्षित असतं. संकेतला स्वत:ला चित्रपटांचं डबिंग खूपच आवडतं. त्यात अभिनयाची अधुरी आस पूर्ण करायचा प्रयत्न असतो, असं तो सांगतो. कार्टूनला आवाज देणंही त्याला आवडतं. ‘मी आवाज दिलेल्या आजवरच्या सगळ्या कार्टून्सच्या वस्तूंची मिनी गॅलरी माझ्या घरी आहे,’ असं तो म्हणतो.

संकेत आणि ‘कॅप्टन अमेरिका’ हे उल्लेख टाळता न येणारे आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये संकेतचा आवाज होता. तर चित्रपटात मात्र कॅप्टन अमेरिकासाठी वरुण धवनचा आवाज वापरला गेला होता. वरुणची निवड झाल्यावर प्रेक्षकांनी संकेतचाच आवाज आम्हाला ऐकायचा आहे, अशी मागणी केली होती. तेव्हा मला उमगलं की आपला खूप फॅ नबेस आहे. तो आपलं काम गांभीर्यानं आणि लक्षपूर्वक बघतो, असं संकेतने सांगितलं. यासंदर्भात बोलताना अनेक ज्येष्ठांनी आणि जाणकारांनी याआधी प्रेक्षकांचं इतकं प्रेम आणि प्रतिसाद कुणाला मिळाला नव्हता, असं आपल्याला सांगितल्याचंही तो नमूद करतो. मात्र हा समाजमाध्यमांचा परिणाम असावा, असं त्याला वाटतं. हिंदीत डब झालेले अनेक दाक्षिणात्य चित्रपट हा तर लोकांच्या आवडीचा विषय. त्याने डब केलेल्या ‘सराईनोडू’ या चित्रपटाला यूटय़ूबवर पंचावन्न कोटींहून अधिक व्ह्य़ूज मिळाले आहेत. आतापर्यंत धनुष, महेशबाबू, विजय, सूर्या आदी अनेक दाक्षिणात्य कलाकारांसाठी त्याने डबिंग केलं आहे.

संकेतला लिहायला-वाचायला, छायाचित्रण करायलाही फार आवडतं. त्याच्या काही लघुपटांची मोठमोठय़ा चित्रपट महोत्सवांत निवड झाली आहे. त्याच्या ‘द प्लेमेकर्स’च्या थिएटर ग्रुपतर्फे देश-विदेशातील थिएटर फेस्टिव्हलमध्ये नाटकं सादर झाली आहेत. त्याला घरच्यांचा कायमच भक्कम पाठिंबा मिळाला आहे. ‘डिस्ने’च्या अनेक चित्रपटांसाठी त्याने आवाज दिलाय. ‘फ्रोझन’मध्ये त्याने गाणंही गायलं होतं. ‘डिस्ने’ आणि ‘डिस्ने एक्सडी’साठी चॅनल व्हॉइसही तो देतो आहे. जुन्या अभिजात चित्रपटांसाठी, माहितीपटांसाठी डबिंग करायला खूप आवडेल, असं तो सांगतो. काम सुरू केल्यापासून लॉस एंजेलिसला जाऊन डिस्नेच्या अ‍ॅनिमेशनपटासाठी त्यांच्याच स्टुडिओत जाऊन डब करायचं स्वप्न त्याने उराशी बाळगलं आहे. त्याचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्यासाठी आणि पुढल्या प्रकल्पांसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा.

या क्षेत्रात काम करता करता, शिकताना कळलं की आवाज नैसर्गिकच हवा. आवाज खर्जातला वगैरे हवा हा गैरसमज आहे. आवाज प्रत्येकाचाच खास असतो. फक्त त्याचा खुबीनं केलेला वापर ही आवाजाची कला होय. डबिंग करताना भावनांचं प्रगटन ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. चित्रीकरणाच्या वेळी कलाकाराला भावना प्रगटनासाठी वेळ मिळालेला असतो. पण डबिंग करणाऱ्याला हासू आणि आसू असणारी दृश्य अनेकदा एकापाठोपाठ एक डब करावी लागतात.’

संकेत म्हात्रे – viva@expressindia.com