संवादकला साधलेली, प्रसंगावधान राखणारी आणि भोवतालाबद्दलची नेमकी

निरीक्षणं नोंदवणारी स्नेहल सांगतेय, आपल्या सिंगापुरी जीवनानुभवांविषयी. 

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष, हा मायना लिहितानाच किती बरं वाटतंय सांगू.. किती तरी दिवसांनी लिहितेय हे.. रूढार्थानं हे पत्र नाही. मात्र पत्र लिहायला इथं आल्यापासून सवडच मिळालेली नाहीये. म्हणून मग या सदराचा उपयोग पत्ररूपी करावा, असं मनात आलं. या पत्रात लिहिते आहे माझ्याविषयी.. थोडंसं ऑड वाटतंय, पण तुम्ही गोड मानून घ्याल, हा विश्वासही आहे. मी मूळची कोल्हापूरची. आई-वडील मालगुंडला शिक्षक असल्यानं माझं दहावीपर्यंतचं शिक्षण तिथंच झालं. अकरावीनंतर कोल्हापूरला काही काळ हॉस्टेल नि नंतर आजीसोबत राहिले. अकरावी-बारावी विज्ञान शाखा घेतली होती, मात्र हा आपला प्रांत नव्हे, हे ओळखून कला शाखेकडं वळले. कमला कॉलेजमधून बी.ए. इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं.

कॉलेजच्या वर्षांत दोन सीनिअर ताईंकडून प्रेरणा मिळाल्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्या माध्यमातून समाजसेवा करायची होती. त्या दोन वर्षांत यशापयशाच्या हुलकावण्या आणि तेव्हा या परीक्षांदरम्यान उडालेल्या सावळ्या गोंधळामुळं नैराश्य आलं होतं. घरच्यांचा पाठिंबा लाभल्यानं सावरले. पण मनापासून वाटत होतं की, पूर्णवेळ अभ्यासक्रम घ्यावा. दरम्यान, टुरिझमशी संबंधित काही छोटे कोर्सेसही केले. पुढं शिवाजी विद्यापीठात टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हलची पदविका घेतली. त्या दरम्यान जाणवलं की, आपल्याला माणसांशी संवाद साधायला, रोजच्या जीवनात त्यांना वेळप्रसंगी मदत करायला आवडतं आहे. म्हणून त्यावर गंभीरपणे विचार केला. पुण्यात राहून आयटाचा फाऊंडेशन कोर्स आणि सिंहगड इन्स्टिटय़ूटमधून सर्टिफिकेट इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट हे कोर्स केले. इन्स्टिटय़ूटमधल्या एका मॅडमच्या ओळखीनं मँगो हॉलिडेजमध्ये दोन महिने इंटर्नशिप केली. नंतर आयटाची परीक्षा दिली.

कॉलेजमधून जेट एअरवेज आणि इंडिगोमधल्या केबिन क्रू इंटरव्हय़ूसाठी पाठवण्यात आलं. तेव्हा नेमकी पुण्यात नव्हते. एका दिवसात तिथं पोहचणं शक्य नव्हतं. त्यानंतर पुन्हा संधी आली ग्राऊंड स्टाफसाठी, तीही दोन्ही कंपन्यांमधून. दोन्हींत क्लीअर झाले. पण ‘इंडिगो’चं ऑफर लेटर आधी आल्यानं तिथं जॉइन झाले. तिथं मी कस्टमर सव्‍‌र्हिस ऑफिसर होते. तिकीट बुकिंगपासून ते बोर्डिगपर्यंतच्या प्रोसिजर्स आम्ही पार पाडतो.

या दीड वर्षांत एक प्रसंग कायम लक्षात राहिला. दुपारची शिफ्ट असल्यानं थोडी निवांत होते. चेन्नईच्या दुपारच्या फ्लाइटसाठी एक मुलगी तिच्या मावशीसोबत आली होती. माझ्या पलीकडल्या काऊंटरला त्या चेक-इन करायला गेल्या. त्या मावशींनी त्यांची बॅग ठेवली, पण त्यांच्या आधी एक जण चेकइनला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. काऊंटरवर बोलताना त्यांची टॅग लावलेली बॅग त्या माणसाच्या बॅगबरोबर गेली. ते लक्षात आल्यावर त्यांची बॅग पुन्हा मागवण्यात आली. त्या माणसाला तसं सांगून पुढची प्रोसिजर समजावली गेली. मात्र तो फार हायपर होऊन त्या मावशींवर वाटेल तसा ओरडला. त्यांनी सॉरी म्हणूनही तो ओरडतच राहिला नि त्यानं त्यांच्यावर हातदेखील उचलला. मी आणि आमच्या इन-चार्ज थेट तिथं जाऊ  शकलो नाही, पण तेवढय़ात मावशीही थोडय़ा आक्रमक झाल्या. मग तो बडबडत त्याच्या कुटुंबाजवळ जाऊन बसला. त्या मावशी शांत झाल्यावर मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना एअरपोर्ट सिक्युरिटीला याबाबत कळवण्याचा सल्ला दिला. सिक्युरिटीला इन्फॉर्म केल्यावर त्या माणसाला बोलवायला गेल्यावरही तो खूप उद्धटपणं वागला नि बडबडला. पटकन यायलाही तयार नव्हता. त्यानंतर त्यानं इन-चार्जसमोर खूप नाटकबाजी केली. अखेरीस त्याचा कॅनेडियन पासपोर्ट रद्द करा, अशी सूचना करून इन-चार्जनी त्याचा पासपोर्ट काढून घेतल्यावर तो भानावर आला. त्यानं मावशींची सपशेल माफी मागितली. दोघांकडून तसं स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं. मावशी खूश झाल्या. दोन आठवडय़ांनी पुन्हा प्रवासाला आल्यावर आमच्या कस्टमर सव्‍‌र्हिसवर मावशींनी आम्हाला कौतुकाचा ई-मेल पाठवला होता..

इंडिगोमधला जॉब सुरू असताना लग्न ठरलं. माझा नवरा – अभिजित सिंगापूरला येऊन तीन र्वष झाली आहेत. इंडिगो मला सोडायचं नव्हतं. पण बदली मिळत नसल्यानं राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘एमबीए’ ऑनलाइन करायचा विचार चालू होता. पण सिंगापूरला आल्यावर ते शक्य झालं नाही. सहा महिने झालेत मला इथं येऊन. सुरुवातीचे थोडे दिवस घरीच होते. मग मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ सिंगापूरमधील (एमडीआयएस), ‘यूके’च्या संडरलॅण्ड युनिव्‍‌र्हसिटीमध्ये प्रवेश घेतला. मनाप्रमाणे पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याची संधी मिळाली. वर्षभराच्या या एम.एस्सी. इन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी कोर्समधल्या एका विषयात शिष्यवृत्तीही मिळाली. इथं उच्च शिक्षणासाठी अधिकांश भारत, चीन, कोरिया, व्हिएतनामहून मुलं येतात. मँडरिन नि तमिळ भाषेला अधिक महत्त्व आहे. त्या आल्या तर ऐंशी टक्के काम सोपं होतं. इथल्या नि आपल्या परीक्षापद्धतीत निश्चित फरक आहे. ती जास्त अप्लाइड आहे. इथं पहिल्या टर्मला दोन पेपर असून त्यासाठी दोन-दोन असाइनमेंट आहेत. त्यातला ऐंशी टक्के भाग स्वत:चा असणं अपेक्षित आहे. एका सॉफ्टवेअरद्वारे ही टक्केवारी पडताळली जाते. सुरुवातीला मी काय, कसं लिहू, कळत नव्हतं. माझ्या एअरलाइन संदर्भातल्या प्रोजेक्टसाठी प्रोफेसरांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉब केला तरी इथं सेटल व्हायचं नाहीये.

सिंगापूरविषयी घरच्यांकडून ऐकलं होतं. ते टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, हे अभ्यासक्रमामुळं माहिती होतं. हा माझा पहिलाच परदेश प्रवास होता. इथला एअरपोर्ट बघितल्यावर थोडीशी भीती नि टेन्शन आलं होतं. तिथलं वातावरण आल्हाददायक होतं. सगळीकडं सूचना लिहिलेल्या. सुरक्षारक्षकांची संख्या जास्त होती. ते सतर्कही होते. क्षणभर वाटलं, इथंच जॉब करायला आवडेल.. सुरुवातीचे काही महिने आम्ही एका भारतीय वंशाच्या कुटुंबासोबत राहिलो. माझ्या साग्रसंगीत जेवण करण्याचं विशेषत: पोळी-भाकरी करण्याचं त्या काकूंना खूप कौतुक वाटे. त्यांनी माझ्याकडून ते शिकून घेतलं. आजीसोबत राहताना स्वयंपाक करायचेच, फार आवड नसली तरी स्वयंपाक करायला येत होताच. मी शाकाहारी असल्यानं फारसे पर्याय सुरुवातीला माहिती नव्हते. इथल्या फूडकोर्टमध्ये मराठी माणसं काम करताना आढळली.

इथं तमिळ लोक खूप असून इथली दुसरी भाषा तमिळ आहे. थोडी मातृसत्ताक पद्धती जाणवते. लहान मुलांची काळजी बाबाही तितक्याच प्रेमानं घेतात. निर्णय घेण्यात स्त्रियांचा प्रभाव दिसतो. इथं ‘आशियाई’ या संकल्पनेनं सगळ्यांना एकत्र आणलंय. आपल्यापेक्षाही इथल्या लोकांना इंग्रजांबद्दल खूप राग आहे. आपल्या पितृपंधरवडय़ाप्रमाणे इथं घोस्ट मंथ असतो. आपण नेवैद्य दाखवतो तसं मेणबत्ती लावून फळं, गोड पदार्थ, बिअरकॅॅन, कागदी कपडे वगैरे गोष्टी ठेवतात नि मग जाळतात. काही ठिकाणी सार्वजनिक गाण्यांचा कार्यक्रम असतो नि काही वेळा त्यात पहिली रांग घोस्टसाठी रिकामी ठेवतात. भारतातल्या धर्म आणि इंडियन करीबद्दल इथल्या लोकांना आकर्षण आहे. भारतीयांच्या हातानं जेवण्याविषयी फार कुतूहल वाटतं. माझ्या चिनी क्लासमेटसोबत एकमेकींच्या देशात जाण्याविषयी गप्पा मारताना कळलं की तिला भारतात यायची भीती वाटते. त्यामागचं कारण ऐकून खूप वाईट वाटलं.. तिच्या चीनमधल्या मैत्रिणींनी तिला सांगितलं होतं की, ‘भारतात जाऊ  नकोस. भारतीय चिनी लोकांचा तिरस्कार करतात..’

कॉलेज सकाळचं असल्यानं सोईनं मी रात्रीच जास्तीचा स्वयंपाक करून ठेवते. अभिजितची बरीच मदत होते. वेळेअभावी वाचनाला वेळ मिळत नाही. स्वयंपाक करताना यूटय़ूबवर गाणी लावते. पण अभिजित घरी आल्यावर मोबाइल बंद करून तो वेळ संवादात सत्कारणी लावते. रात्री दोघांच्या आवडीची जुनी गाणी लावतो. वीकएण्डला आम्ही बर्ड पार्क, मरिना बे, सायन्स सेंटर वगैरे ठिकाणी फिरलो आहोत. सिंगापूर हे टुरिझम नि बिझनेस हब आहे. स्वच्छता-सुरक्षेबाबत सिंगापूरशी तुलना करताना लक्षात ठेवायला पाहिजे की, या देशाचं आकारमान आणि लोकसंख्या कमी असल्यानं इथं या गोष्टी मेंटेन करणं सरकारला शक्य आहे. शिवाय त्यासाठी लोकांनीही जाणीवपूर्वक शिस्त जपली आहे. इथं वयस्कर लोकही काम करतात. बऱ्याच म्हाताऱ्या माणसांना रोज संध्याकाळी सूर्याला नमस्कार करून उदबत्ती ओवाळताना पाहिलं आहे.

आजच्या ई-माध्यमाच्या काळात मी खरंच पत्र लिहिते. नुकतंच अभिजितला पत्र लिहिलेलं घरातल्या घरात. माझ्या आईनं लिहिलेलं पत्र कायमच माझ्यासोबत असतं. बारावीत असताना शोभा डेंचं ‘स्पीड पोस्ट’ हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाल्यानं नंतर मी पत्रं लिहीत गेले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत ग्रुपमधल्या तिघी जणींनी दर आठवडय़ाला एक पत्र लिहायला सुरुवात केली. खूप गोष्टी आम्ही शेअर केल्या होत्या. आता सोशल मीडियाद्वारे कनेक्टेड असून आपापल्या व्यवधानांत व्यग्र आहोत. त्यामुळं पत्रलिखाण थांबलंय.  आता हे पत्रलेखन आवरतं घेते. लोभ आहेच. तो वृद्धिंगत व्हावा, ही विनंती.

स्नेहल रुग्गे जाधव,  सिंगापूर

संकलन : राधिका कुंटे