नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

आठवडय़ात, १४ तारखेला एका महान आंतरराष्ट्रीय संगीतकाराचा वाढदिवस होऊन गेला. एक असा संगीतकार ज्याला आपले संगीत सादर करायला कधी भाषेचे माध्यम वापरायची गरज पडली नाही, त्याचे संगीत आपल्याशी भाषेशिवायच संवाद साधते. ज्याने कुठल्याही शाळेत अथवा इन्स्टिटय़ुटमध्ये जाऊन संगीताचे प्रशिक्षण घेतले नाही आणि तरीही आज त्याची कंपोझिशन्स संगीताच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने ऐकलीच पाहिजेत अशी आहेत. हा कलाकार म्हणजे यान्नीस ख्रिस्सोमल्लीस अर्थात ‘यानी’. ग्रीसमध्ये जन्मलेल्या आणि पुढे अमेरिकेत स्थायिक झालेल्या या संगीतकाराने कुठल्या एका संगीत प्रकारात नैपुण्य न मिळवता, काही संगीत प्रकार एकत्र करून, त्यात आधुनिकतेचा वापर करून, आपण ज्याला आधुनिक जॅझ सिंफनी म्हणू शकू असा एक नवीन संगीत प्रकारच निर्माण केला. वादकांचा मोठा लवाजमा घेऊन, स्वत: तीन-चार सिन्थेसायझर्स, साऊंड मिक्सर आणि अजून काय काय इन्स्ट्रुमेंट्स सांभाळत भव्यदिव्य कार्यक्रम सादर करण्यात याचा हातखंडा आहे. अशी यानीची सर्वात गाजलेली कॉन्सर्ट म्हणजे Yanni live at the Acropolis! ग्रीसमधील अथेन्स शहरातील अ‍ॅक्रोपोलिस या ऐतिहासिक, भग्न अवस्थेतील मोठय़ा अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेला हा कार्यक्रम हा जगाच्या इतिहासातील सर्वोच्च कार्यक्रमांपैकी एक आहे आणि या कार्यक्रमाचा व्हिडीओ हा मायकल जॅक्सनच्या ‘थ्रिलर’नंतरचा सर्वात जास्त पाहिला गेलेला, विकला गेलेला व्हिडीओ आहे.
या कार्यक्रमातील सगळीच गाणी एवढी श्रवणीय आहेत, की सगळीच्या सगळी आपल्या स्मृतीत राहतात. या माणसाने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नसेल, पण एकेका संगीत प्रकाराचा, एकेका ‘स्केल’चा (स्वरसमूह – आपल्याकडे राग असतात, त्यांच्याकडे scales असतात), एकेका ‘टाइम सिग्नेचर’चा (आपल्याकडे कसे विविध ताल असतात), एकेका वाद्याचा, अत्यंत बारकाईने अभ्यास नक्कीच केला असणार हेच हा पूर्ण कार्यक्रम बघताना सतत जाणवत राहते. कारण या एकाच कार्यक्रमात आपल्याला या सर्वच गोष्टींचे वैविध्य पाहायला, ऐकायला मिळते. म्हणजे जास्त करून ‘रॉक’मध्ये वापरले जाणारे ड्रमसेट हे वाद्य या कार्यक्रमात एक वेगळीच ओळख घेऊन येते. उदाहरणार्थ,  within attraction  या गाण्यात ड्रम्स आणि काँगोची जुगलबंदी ऐन सिंफनीच्या मध्ये आपल्याला ऐकायला मिळते, तसेच बेस गिटारचासुद्धा उत्तम वापर झालेला आढळतो. यातच पुढे कार्यक्रमाचा कंडक्टर (आपल्याला जो हातात दोन काठय़ा घेऊन सगळ्यांना इशारे करताना दिसतो तो- सूत्रधार) Shardad Rohani आणि   Karen Briggs या वादिकेची अप्रतिम व्हायोलिन जुगलबंदीसुद्धा ऐकायला मिळते. एकूणच या कार्यक्रमात व्हायोलिनचा वापर सुरेखच झाला आहे. rain must fall  आणि  swept away या गाण्यांमध्येसुद्धा आपल्याला मस्त व्हायोलिन सोलोवादन ऐकायला मिळते. Santorini, keys to imagination आधुनिक सिंफनीमध्ये मोडतील अशी कंपोसिशन्स केवळ भारी आहेत. Santorini मध्ये केलेला ब्रास (ट्रम्पेट, सॅक्सफोन आणि तत्सम वाद्यांचा कळप), वूडविंड (बासरी, क्लेरनेट, ओबो वगैरेंचा कळप) यांच्या तानांचा वापर कमाल आहे. reflections of passion मधले पियानो आणिstrings चे एकत्रित वादन प्रत्येक वेळी अंगावर काटा आणते. पियानो प्रधान अजून काही गाणी म्हणजे नॉस्टॅल्जिया, standing in motion, one man’s dream आणि माझे सर्वात आवडते- केवळ आठवणीने अंगावर शहारा आणणारे- until the last moment! हे एकच गाणे घेऊन मी जन्मठेपही भोगायला जाऊ शकतो. नावसुद्धा समर्पकच आहे- until last moment. काय पियानो वाजवलाय यानीने यात! तोडच नाही!
अशी एक से एक गाणी असलेला हा कार्यक्रम अनुभवणे एखादा भारीतला चित्रपट पाहण्यासारखेच आहे. चित्रपट तरी एक-दोन महिन्यात, जास्तीत जास्त ६-७ महिन्यांत बनतो. या अंदाजे दोन-अडीच तासांच्या कार्यक्रमाची तयारी तब्बल दीड वर्ष चालू होती म्हणे!

हे ऐकाच.. वाह हुजूर
केवळ अक्रोपोलिसच नव्हे, जगभरातल्या विविध ऐतिहासिक, भव्य वास्तूंचे महत्त्व यानीने आपल्या भन्नाट संगीताच्या जोरावर अजूनच वाढवून ठेवले आहे. २००६ मध्ये त्याने आपल्या ‘ताजमहाल’लासुद्धा ‘वाह हुजूर’ म्हणण्यास भाग पाडले. पुढे यानीचे वाद्य-दल आणि मागे सुंदर ताजमहाल असा हा Yanni live at Tajmahall हा कार्यक्रम यू-टय़ूबवर उपलब्ध आहे. यानी प्रत्येक कार्यक्रमात एक तर नवीन गाणीच सादर करतो किंवा जुनी गाणीही नवीन पद्धतीने सादर करतो, त्यामुळे या कार्यक्रमातही तितकेच नावीन्य आहे. यात त्याने vocals चा पण वापर केला आहे. आवर्जून ऐकावा/पाहावा असाच हा कार्यक्रम आहे
viva.loksatta@gmail.com