हे संकेतस्थळ माहिती मिळविणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेच, याचबरोबर आता ते माहिती पुरविणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरू लागले आहे. प्रेक्षकवर्ग वाढतोय तसा इथला फायदाही वाढतोय.

दिनांक २३ एप्रिल २००५ रोजी रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी यूटय़ूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी आपला मित्र याकोव लॅपिटस्कायने एका प्राणीसंग्रहालयात चित्रित केलेला व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड केला. हाच तो यूटय़ूबवर अपलोड करण्यात आलेला पहिलावहिला एकोणीस सेकंदांचा व्हिडीओ. यानंतर तब्बल दशकभरात यूटय़ूबमुळे व्हिडीओ क्षेत्रात कमालीची क्रांती घडली असून आज देशातील मनोरंजन क्षेत्राच्या तोडीस तोड एम समांतर यूटय़ूब व्हिडीओजचे क्षेत्र उभे राहिले आहे. अगदी अ, ब, क, डपासून ते घरातील टीव्ही कसा दुरुस्त करू इथपर्यंतच्या एक ना लाखो व्हिडीओजचा संग्रह असलेले हे संकेतस्थळ माहिती मिळविणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेच, याचबरोबर आता ते माहिती पुरविणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरू लागले आहे.

केवळ चेहरा लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, इतकेच नव्हे तर त्यातून अर्थार्जन करून चरितार्थ चालविणारे अनेक तरुण सध्या आपल्या भोवताली दिसत आहेत. मुंबईत यूटय़ूबने नुकताच एका फॅनफेस्टचे आयोजन केले होते. यामध्ये देशातील आणि परदेशातील भारतीयांनी यूटय़ूबच्या माध्यमातून स्वत:ची कशी ओळख बनवली हे समोर आले. पण यूटय़ूबच्या माध्यमातून होणाऱ्या अर्थार्जनाबाबत आजही अनेकजण अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. सध्या यूटय़ूबवर मनोरंजन, स्वयंपाक, संगीत, गेम्स आणि माहितीपर व्हिडीओज आणि वाहिन्यांना चांगलीच मागणी आहे. ही मागणी जशी इंग्रजीत आहे तशी ती आता भारतीय भाषांमध्येही वाढू लागली आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत इंग्रजीसोबतच हिंदी आणि दक्षिणेकडील तमिळ आणि तेलुगूसारख्या भाषांनी यूटय़ूबवर आपले वर्चस्व गाजवले. आता येत्या एक ते दोन वर्षांत बंगाली आणि मराठीसारख्या भाषांमधील व्हिडीओजना मागणी वाढू लागेल. यामुळे काही तरी हटके करणाऱ्या तरुणांना या क्षेत्रात खरोखरच चांगल्या संधी चालून येणार आहेत.

आपण जे काही करतो त्याचा व्हिडीओ करायचा, छायाचित्र टिपून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करायचे असे अनेक तरुण-तरुणी करताना दिसतात. मात्र हे केल्याने त्यांना चार-पन्नास लाइक्स आणि कौतुकाची थाप यापलीकडे काहीच मिळत नाही. पण जर हेच तुम्ही योग्य मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यातून तुम्हाला पैसे कमाविण्याची संधीही मिळू शकते. यासाठी आपल्याला कोठेही जायची गरज नाही. अगदी आपण व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर ज्याप्रमाणे व्हिडीओ किंवा कमेंट अपलोड करतो तसेच यूटय़ूबवर करायचे. यासाठी तुम्हाला यूटय़ूब खाते सुरू करावे लागते. यूटय़ूबवर एखादा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीला ‘यूटय़ूब क्रिएटर’ असे संबोधले जाते.

तुम्ही एखादा विषय निवडून त्याची वाहिनी यूटय़ूबवर सुरू करू शकता. उदाहणार्थ, एखाद्या तरुणीला चांगल्या प्रकारे मेकअप करता येत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप करताना काय करावे लागते हे सांगणारे अनेक व्हिडीओज तुम्ही त्या वाहिनीमध्ये अपलोड करू शकता. तुम्ही पहिला व्हिडीओ अपलोड केला आणि त्यावर लाखो लोकांनी उडय़ा मारल्या असे होणार नाही. यासाठी तुम्हाला संयमाने आणि सातत्याने स्मार्ट काम करावे लागते. म्हणजे एक व्हिडीओ अपलोड केला आणि पुन्हा दोन ते तीन महिने काहीच नाही असे झाले तर तुमची वाहिनी सतत झळकणार नाही. तुमची वाहिनी जर ‘यूटय़ूब शोध’मध्ये अग्रस्थानावर पाहिजे असेल तर त्या वाहिनीवर आपण सतत अद्ययावत असणे अपेक्षित आहे. याचबरोबर वाहिनीवरील विविध भागांना आपण जे काही नावे देऊ ती लोकप्रिय असावीत.जेणेकरून लोकांनी शोध घेण्यासाठी दिलेला कळशब्द आपल्या भागात कुठे तरी यायला हवा.

यूटय़ूबकडे तुम्ही ‘यूटय़ूब क्रिएटर’ म्हणून नोंदवले गेलात की, तुम्हाला यूटय़ूबकडून विविध टूल्स दिल्या जातात. यात एक अ‍ॅडसेन्स नावाचाही टूल असतो. ज्यावर तुम्ही नोंदणी केल्यावर तुमच्या वाहिनीला किंवा व्हिडीओला जाहिराती मिळू शकतात. जाहिराती मिळण्याचे प्रमाण हे तुमच्याकडे असलेल्या प्रेक्षक संख्येवर अवलंबून असते. यूटय़ूब वाहिनी निर्माण करताना त्यावरचा कण्टेण्ट ओरिजिनल असावा लागतो. जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न हे गुगल आणि आपल्यात ४५:५५ या प्रमाणात विभागले जाते. म्हणजे गुगल आपल्याला त्या उत्पन्नातील ५५ टक्के भाग देते. या जाहिराती ‘कॉस्ट पर क्लिक’ आणि ‘कॉस्ट पर व्ह्य़ू’ अशा दोन गटांत विभागलेल्या असतात. पहिल्या गटात आपल्या प्रेक्षकाने जाहिरातीवर क्लिक केले की त्याचे पैसे मोजले जातात, तर दुसऱ्या प्रकारात जाहिरात पाहिल्यावर पैसे मोजले जातात. सुरुवातीच्या काळात पहिल्या गटात व्हिडीओजचा समावेश असतो. अशा जाहिरातींच्या माध्यमातून जमा होणारे पैसे गुगल ठरावीक कालावधीने आपल्या खात्यात जमा करत असते. याचबरोबर अनेकजण आपल्या वाहिन्यांसाठी पैसे आकारतात. म्हणजे एखाद्या वाहिनीचे आपण मोफत नोंदणीदार अर्थात सबस्क्रायबर होऊ शकतो, तर एखाद्या वाहिनीचे सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात तज्ज्ञ आहात आणि तुमच्याशिवाय तिथे पार्यायच असू शकत नाही अशा वेळी तुम्ही पैसे भरून सभासद नोंदणीचा पर्याय स्वीकारू शकता. जेणेकरून लोक मोफत उपलब्ध आहे ते सोडून पैसे भरून तुमच्याकडे येतील. या सशुल्क सभासद नोंदणी असलेल्या वाहिन्यांच्या उत्पन्नासाठीही ४५:५५ हेच सूत्र अवलंबिवण्यात आले आहे.

जाहिरात किंवा सशुल्क नोंदणींमधून येणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त अनेक यूटय़ूबर्स हे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांच्या व्हिडीओजचे चित्रीकरण करताना वापरणाऱ्या गोष्टी आणि ठिकाणे हे प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मिळतात. यामुळे त्यांची याच्यातील गुंतवणूक कमी होते आणि ते अधिक उत्पन्न मिळवू शकतात. ज्याप्रमाणे वेळोवेळी फोब्र्ज विविध क्षेत्रांतील ठरावीक लोकांची यादी जाहीर करते त्याचप्रमाणे मागच्यावर्षी लखपती यूटय़ूबर्सची यादीही त्यांनी प्रसिद्ध केली होती. अर्थात काही पहिल्या क्रमांकांमध्ये भारतीय कोणी नव्हते, मात्र सध्याचा भारतीयांचा वेग पाहता आणि कंपनीसाठीही भारत ही मुख्य बाजारपेठ असल्याने कंपनीनेही भारतात अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे लवकरच फोब्र्जच्या लखपती यूटय़ूबर्सच्या यादीत भारतीय नावे झळकू लागतील.