दिवाळी ही अनेक नव्या गोष्टी सुरू करण्यासाठी उत्तम काळ मानली जाते. दिवाळीच्या सुट्टीत हमखास नवीन सिनेमे रिलीज होतात, टीव्ही मालिकांचे दिवाळी विशेष एपिसोड रंगतात, नाटकाचे जास्तीचे प्रयोग असतात, संगीत मैफली असतात, दिवाळी अंकही असतात. आपली दिवाळी पहाट तर असतेच. मनोरंजन, वाचन यांचा असा दिवाळी फराळ हजर असतो. या सगळ्यात भर पडली आहे यूटय़ूब या नव्या माध्यमाची. मनोरंजनाचा झणझणीत फराळ यूटय़ूबवर मिळतोय. दहा – पंधरा मिनिटांच्या आटोपशीर ‘फॉर्म’ला या फराळी ताटात महत्त्व आहे. या फराळी ताटातल्या काही नव्या मेन्यूविषयी आणि दोन लोकप्रिय यूट्यूबर्सशी झालेल्या संवादातून उलगडलेल्या या वेगळ्या माध्यमाविषयी..

मराठीतलं मनोरंजनाला वाहिलेलं सर्वात लोकप्रिय यूटय़ूब चॅनेल कुठलं असं विचारलं तर, भा.डि.पा. अर्थात भारतीय डिजिटल पार्टीचं नाव निर्विवादपणे घेतलं जाईल. सबस्क्रायबर्स किती, व्ह्य़ूज किती या गणितांपेक्षा इथल्या सेलेब्रिटींच्या वावरामुळे आणि विविधरंगी करमणुकीमुळे या यूटय़ूब चॅनेलची चर्चा जास्त आहे हे निश्चित. ‘कास्टिंग काउच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’च्या यशानंतर ‘कँडिड गप्पा’ सुरू झाल्यात. पाठोपाठ ‘आपल्या बापाचा रस्ता’ने उत्सुकता ताणली जातेय आणि ‘म्युझिक डायरीज विथ राहुल देशपांडे’ याबरोबर एक नवीन वेब सांगीतिका येऊ घातली आहे. या यूटय़ूबवरच्या मराठी करमणूक फराळाचा शेफ अर्थात ‘भा.डि.पा’चा क्रिएटिव्ह हेड – सारंग साठय़ेशी बातचीत..

मराठीतल्या पहिल्या सुपरहिट युटय़ूब चॅनेलच्या मागचे चेहरे कोण आहेत आणि त्यांच्या शोजची कामं कशी चालतात, शूटिंग कधी आणि कसं करतात, त्यासाठी काही वेगळ्या टेक्नॉलॉजीचे कॅमेरे वापरावे लागतात का, याच्या निर्मितीची गणितं काय आहेत, हे सगळं आणि युवा प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘भाडिपा’चा क्रिएटिव्ह हेड सारंग साठय़ेने ‘व्हिवा’शी बोलताना दिली. टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक याची क्रिएटिव्ह प्रोसेस साधारण आपल्या परिचयाची असते. मूळ कथा आणि ती सादर करणारा दिग्दर्शक असेल की मग संहिता, संवाद, अभिनेत्यांची जुळवाजुळव सुरू होते. त्याअगोदर निर्माता शोधला जातो. वेबसीरीजचं स्वरूप आज तरी एखाद्या अनियतकालिकासारखं आहे. वेब चॅनेलवरच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची क्रिएटिव्ह प्रोसेस कशी असते. याबाबत भारतीय डिजिटल पार्टी या लोकप्रिय मराठी वेबचॅनेलचा क्रिएटिव्ह हेड सारंग साठय़ेला विचारलं. ‘प्रोसेस तशी फार वेगळी नसते. आम्ही आधी कन्सेप्टवर काम करतो. मग संहिता येते आणि मग त्याचं प्रेझेंटेशन. आम्हालाही निर्मात्यासाठी पिचिंग करावंच लागतं. एक महत्त्वाचा फरक म्हणजे टीव्ही मालिकेपेक्षा वेबमालिकेचं बजेट थोडं कमी असतं. प्रोडय़ुसरला त्यातून पैसे मिळवण्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो. फायदा दिसायला कदाचित वर्षभराचा कालावधीही लागतो.’

यूटय़ूब हे माध्यम स्वतंत्र माध्यम मानलं जातं. त्यामध्ये अजून तरी सेन्सॉर बोर्ड, प्रमाणपत्र वगैरेची भानगड नाही. प्रेक्षक आणि जाहिरातदार यांचा दबावदेखील कमी आहे. कलाकाराला या माध्यमातून क्रिएटिव्ह लिबर्टी मिळते का? ‘हे खरं आहे. कलाकार या माध्यमाकडे क्रिएटिव्ह लिबर्टी मिळते म्हणून वळतात. अजूनही हे क्रिएटरचं व्यासपीठच आहे. ते प्रोडय़ुसरचं झालेलं नाही. तुमच्याकडे चांगला कण्टेण्ट नसेल तर बाकी कितीही चकाचक कारभार असला तरी इथे लोकप्रियता मिळत नाही. इथे प्रक्षेपणासाठी नियम आहेत. पण ही ब्रॉडकास्टिंग रेग्युलेशन्स इंटरनॅशनली सेम आहेत.’

यूटय़ूबचा माध्यम म्हणून विचार करताना क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये काही तांत्रिक बदल लक्षात घेऊनच कन्सेप्ट डेव्हलप करावी लागते, असं सारंग सांगतो. ‘आमचे प्रेक्षक मोस्टली मोबाईलवर शो बघणार आहेत. मोबाईलची छोटी स्क्रीन आणि त्यावर प्रभावी वाटेल असे शॉट्स त्यासाठी  आवश्यक असतात. फ्रेमिंगवर याचा परिणाम जास्त होतो. आम्ही वायडर फ्रेम अगदी आवश्यक असेल तेव्हाच वापरतो. या माध्यमात काम करताना सबटायटल्स असलीच पाहिजेत, असं माझं मत आहे. कार्यक्रमाचा कालावधी हा मोठा फॅक्टर आहे. लोकांचा डेटा युसेजचा याच्याशी संबंध असल्यामुळे कमीत कमी वेळात कार्यक्रम बसवण्यात कौशल्य पणाला लागतं. साउंड क्वालिटी हा महत्त्वाच मुद्दा आहे. कारण अनेक प्रेक्षक प्रवासात यूटय़ूब चॅनेल बघतात. याशिवाय या माध्यमाचे काही ट्रेण्ड्स असतात. त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असतं आणि मुख्य म्हणजे तुमच्या प्रेक्षकांना समजून घेणं मस्ट असतं, असं माझं मत आहे’, सारंग सांगतो.

दोन लाखांहून अधिक व्ह्य़ूज मिळालेल्या ‘कास्टिंग काउच’चा महेश मांजरेकर यांच्यासोबतचा एपिसोड प्रदर्शित झाला आणि बराच काळ काहीच न घडल्यो ‘हा शेवटचा एपिसोड होता का’ असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडला. त्यानंतर ‘आपल्या बापाचा रस्ता’ याचा एकच एपिसोड आला आणि अचानक वंदना गुप्ते आणि सई ताम्हणकरसोबत मिथिला पालकरच्या ‘कॅण्डिड गप्पा’ सुरु झाल्या. याबद्दल सारंगला विचारल्यावर तो म्हणाला, ‘सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्टिंग काउच अजून संपलेलं नाही. त्याचे अजून कित्येक एपिसोड्स करायचे आमचे बेत आहेत. सेलेब्रिटी, अमेय आणि निपुण यांच्या वेळेच्या उपलब्धीनुसार ते एपिसोड्स प्रदर्शित होतील. ‘आपल्या बापाचा रस्ता’ हा ‘आपल्या बापाची’ या वेब सिरीजचा पहिला एपिसोड होता. यानंतर आपल्या ‘बापाची सोसायटी’ असा दुसरा एपिसोड येऊ  घातलेला आहे. मृण्मयी गोडबोले आणि पर्ण पेठे यात दिसतील. ‘कॅन्डिड गप्पा’ एक वेगळी वेब सिरीज असणार आहे. त्याचबरोबर एखाद्-दोन कॉमेडी शोज आणि एक संगीतावर आधारित वेब सिरीज लवकरच आपल्यासमोर येईल. ‘शष्प’ नावाचा एक शो लवकरच आपण प्रदर्शित करू. भा.डि.पा. आपल्यासाठी काही ना काहीतरी करत राहणार आहे.’

यूटय़ूब चॅनेलच्या कारभाराबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘गुगलवर अकाउंट असलेली कोणीही व्यक्ती स्वत:चं युटय़ूब चॅनेल काढू शकते हे तर जाहीर आहे. मात्र एक चॅनेल सुरु करताना त्याच्या मागची सगळी प्रक्रिया समजून घ्यावी लागते. यूटय़ूब हे माध्यम अनियतकालिक मानलं जातं. मात्र आपली आपल्या शोशी, प्रेक्षकांशी आणि कलाकारांशी असलेली कमिटमेंट लक्षात घेऊन आपण स्वत:साठी काही बंधनं आणि नियम घालून घेतले पाहिजेत. आपल्या प्रेक्षकांना जपलं पाहिजे. पुढचे एपिसोड्स पाहायचे की नाही हे प्रेक्षक एक एपिसोड पाहून ठरवतात. त्यामुळे आपला प्रत्येक एपिसोड हा त्याच दर्जाचा असावा लागतो. इथे टीव्हीपेक्षा वेगळं गणित असतं कारण यातून मिळणारे पैसे हे प्रत्येक एपिसोडच्या व्’ाूजवर अवलंबून असतात. सरसकट आपल्याला हवे तसे एपिसोड बनवत गेलं आणि प्रेक्षकांना ते आवडलेच नाहीत, त्यांनी ते पाहिलेच नाहीत तर आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होतो, आपल्या कामावर लोकांच्या असलेल्या विश्वसावर याचा परिणाम होतो. युटय़ूब या माध्यमाकडे अजूनही मराठी प्रेक्षक तितकासा गांभीर्याने पाहत नाही. तशात आपल्या शोचा दर्जा टिकवून ठेवला नाही तर आपल्याला प्रेक्षकवर्गच मिळणार नाही. पहिल्या एपिसोडपासून दर्जा कायम राखणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं.’

‘मराठी प्रेक्षक हा अजूनही टीव्हीच्याच मोहात अडकलेला आहे. खरंतर युटय़ूब हे माध्यम आपल्या सोयीनुसार केव्हाही कुठेही आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्यामुळे ते आपल्या अधिक सोयीचं आहे ही गोष्ट अजून मराठी प्रेक्षकवर्गाच्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत प्रेक्षकांची संख्या वाढत नाही तोपर्यंत यूटय़ूबिंग हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून मराठीत तरी पाहता येणार नाही. त्यासाठी हिंदी युटय़ूब चॅनेल्सइतकी व्हिवरशिप असावी लागेल. सध्यातरी शोसाठी मिळणाऱ्या जाहिराती आणि स्पॉन्सर्स हेच उत्पन्नाचं प्रमुख साधन ठरतंय. हिंदी यूटय़ूब चॅनेल्सना साहजिकच मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने त्यातून उत्पन्न मिळू शकतं मात्र मराठीला रीजनल भाषा असल्याने प्रेक्षकांची संख्या थोडी मर्यादित राहते.’

असं असलं तरी, अनेक मोठय़ा कलाकारांनीदेखील युटय़ूबकडे एक प्रभावशाली माध्यम म्हणून पाहिलं तर हळूहळू त्याचा प्रेक्षकवर्ग वाढेल. कास्टिंग काउचसाठी सेलेब्रिटींची वेळ मिळवणं ही मोठी अडचण असते. हा स्क्रिप्टेड शो आहे. त्यामुळे कलाकारांना स्क्रिप्ट दाखवणं, त्यांची मान्यता घेणं, काही बदल हवे असल्यास ते करणं आणि त्यानंतर शूटिंग करणं अशी मोठी प्रोसेस होते. शूटिंगमध्येही प्रत्येक एपिसोड दोन वेळा शूट होतो.  एकदा स्क्रिप्टे आणि एकदा स्क्रिप्टशिवाय दिलखुलास. त्यानंतर त्या दोन एपिसोड्सचं त्या सेलेब्रिटीच्या परवानगीने एकत्रीकरण करून एडिटिंग होतं. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो आणि स्क्रिप्टबद्दल चर्चा करण्यासाठी, त्यावर विचार आणि बदल करण्यासाठी त्या त्या कलाकारांना तेवढा वेळ असणं गरजेचं असतं. त्यामुळे कास्टिंग काउच दिसतं तितकं सोपं नाहीये.’

‘कॅन्डिड गप्पा हा वेब शो कास्टिंग काउचसारखाच असणार आहे का असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. मात्र तो कास्टिंग काउचसारखा नसेल. राउंड टेबल इंटरव्ह्य़ू विथ सेलेब्रिटी हा आपल्याकडे आता एक लोकपरिचित प्रकार आहे. ‘कॅन्डिड गप्पा’चं स्वरूपही काहीसं तसंच असणार आहे. फिल्म प्रमोशन्स यात आम्ही आवर्जून अंतर्भूत केलेली आहेत. मात्र हा वेब शो केवळ फिल्म प्रमोशन्ससाठी नसेल. या खरोखरच्या कँडिड गप्पा असतील, यांचं स्क्रिप्ट बनवलंच जाणार नाही. ‘शष्प’ हा एक शो या दिवाळीच्या सुमारास प्रेक्षकांसमोर येईल, त्याची जाहिरात फेसबुक पेजवरदेखील केलेली आहे.’

‘मराठी प्रेक्षक जोपर्यंत मनोरंजनाचं माध्यम म्हणजे टीव्ही या संकल्पनेतून बाहेर पडून युटय़ूबकडे वेगळ्या दृष्टीने पाहत नाही तोपर्यंत मराठीमध्ये युटय़ूब चॅनेल्स तितकासा प्रतिसाद आणि पर्यायाने त्यातून उत्पन्न मिळणं अवघड आहे. सर्व हिंदी टीव्ही चॅनेल्सची स्वत:ची अ‍ॅप्स आहेत आणि स्वत:ची यूटय़ूब चॅनेल्स आहेत. त्यामुळे ज्या तरुणाईला घरात बसून टीव्ही बघायला वेळ नसतो अशा ‘ऑन द गो’ टीव्ही पाहणाऱ्या तरुणाईचीही भर त्यांच्या प्रेक्षकवर्गात  पडली. हेच जेव्हा मराठीत साध्य होईल तेव्हा आमच्यासारखी अनेक युटय़ूब चॅनेल्स यशस्वीपणे त्यांचे शोज चालवू शकतील, प्रसिद्ध होऊ  शकतील.’