दंतवैद्यक संघटनेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; ब्रश वापरण्याचे प्रमाण निम्मेच

देशातील जवळपास ९५ टक्के नागरिकांना हिरडय़ाचे विकार आहेत तसेच देशातील निम्मे लोक टूथब्रशही वापरत नसल्याचे इंडियन डेंटल मेडिकल असोसिएशनने एका सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे.

दातांशी संबंधित विकार नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांखालील जवळपास ७० टक्के मुलांचे दात किडलेले आहेत हे प्रमाण धोकादायक असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गौतम शर्मा यांनी संघटनेच्या सर्वेक्षणावरून स्पष्ट केले आहे. बाटलीद्वारे दूध किंवा तत्सम पदार्थ बाळाला देताना त्याद्वारे जंतूंचा प्रादुर्भाव होऊन आजारांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम लहान मुलांच्या वरच्या चार दातांवर होऊ शकतो असा इशारा शर्मा यांनी दिला आहे. त्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.  त्याचे एक प्रमुख कारण लहान मुलांना सतत अशा बाटलीने पाजल्याने याचा प्रादुर्भाव होऊ शकतो असा इशारा शर्मा यांनी दिला आहे.

त्यामुळे बाळाला बाटलीद्वारे पाजल्यानंतर प्रत्येकवेळी दात तसेच हिरडय़ा हळुवारपणे स्वच्छ कापडाने साफ कराव्यात तसेच गरज भासल्यास दंतवैद्याकडे जावे, असा सल्ला शर्मा यांनी दिला आहे. कारण दातांचा संसर्ग धोकादायक ठरू शकतो त्यातून अनेक गंभीर आजार होऊ शकतात यामध्ये हृदयाशी संबंधित व्याधींचा समावेश असल्याचा इशाराही शर्मा यांनी दिला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)