अस्वच्छ स्टेथोस्कोपने रुग्णांची तपासणी धोक्याचे ठरू शकते. अस्वच्छ स्टेथोस्कोपचा वापर केल्यामुळे सुपरबगची लागण होऊ शकते. ज्या विषाणूवर कोणत्याही प्रतिजैविकाचा प्रभाव पडत नाही अशा विषाणूला सुपरबग असे म्हटले जाते. त्यामुळे सुपरबगची लागण धोकादायक ठरू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. या संशोधनामध्ये भारतीय संशोधकाचा समावेश होता.

अमेरिकेच्या येल विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. स्टेथोस्कोपचा वापर हा रुग्णांना तपासण्यासाठी करण्यात येतो. मात्र अस्वच्छ स्टेथोस्कोपचा रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतो हे माहीत असूनही अनेक डॉक्टर स्टेथोस्कोप क्वचितच स्वच्छ करण्याचे कष्ट घेतात, असे संशोधकांना आढळून आले. स्टेथोस्कोपची स्वच्छता कशी राखावी यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सुरू केला. त्यामध्ये स्टेथोस्कोपच्या स्वच्छतेसाठी अल्कोहोल जेल किंवा जंतुनाशक ठेवण्यात आले होते. चार आठवडे चाललेल्या या प्रकल्पामध्ये वैद्यकीय विद्यार्थी, निवासी डॉक्टरांचा समावेश होता.

या वेळी संशोधकांनी सर्व डॉक्टरांचे निरीक्षण केले. यातील कोणत्याही डॉक्टरने स्टेथोस्कोप स्वच्छ करण्याची तसदी घेतली नाही. या वेळी संशोधकांनी प्रत्येक रुग्णासाठी स्टेथोस्कोप वापरताना त्याची स्वच्छता कशी राखावी याची माहिती डॉक्टरांना दिली. मात्र त्यानंतरही स्टेथोस्कोपची स्वच्छता करण्याबाबतची उदासीनता डॉक्टरांमध्ये दिसून आली.

स्टेथोस्कोप स्वच्छ न ठेवल्यामुळे स्टॅफिलोकोकस ऑरियस, सुडोमोनास एरुगिनोसा, क्लोस्ट्रीडिअम डिफसायल आणि व्हँकोमायसीन प्रतिरोधक एन्ट्रोकोकी या रोगकारकांची निर्मिती होऊ शकते. हे संशोधन ‘अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.