जे लोक धूम्रपान करीत नाहीत. माफक प्रमाणात मद्यसेवन करतात आणि वजन योग्य ठेवतात, ते लोक सामान्य लोकांपेक्षा ७ वर्षे अधिक आयुष्य जगतात, असे अभ्यासकांना आढळले आहे.‘हेल्थ अफेअर्स’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. जे लोक शरीराची योग्य ती काळजी घेतात, त्यांना अधिक आयुष्य लाभते, असे संशोधकांना आढळून आले.

संशोधकांनी यासाठी १४ हजार लोकांची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले. यामध्ये ज्या लोकांनी धूम्रपान केले नव्हते त्यांच्या आयुष्यामध्ये इतरांच्या तुलनेमध्ये चार ते पाच वर्षांनी वाढ झालेली आढळून आली. ही जी काही चार-पाच वर्षे वाढलेली होती त्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या नव्हती, असे संशोधकांना आढळले.

जगामध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र त्याही तुलनेमध्ये जर आपण आपले शरीर आरोग्यदायी ठेवले तर कशा प्रकारे आपल्या आयुष्यात वाढ होते याचा आम्ही अभ्यास केला. आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी खूप काही करावे लागत नाही. समतोल आहार, व्यायाम करण्यामुळे आपले शरीर भक्कम राहण्यास मदत होते. धूम्रपान सोडले तर आपल्या शरीरामध्ये कोणतीही व्याधी निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपण दीर्घकाळ आयुष्य जगू शकतो, असे जर्मनीतील मॅक्स प्लँक डेमोग्राफिक रिसर्च संस्थेच्या संचालक मिक्को मायस्कायला यांनी म्हटले आहे.

लठ्ठपणा, धूम्रपान आणि अतिप्रमाणात घेतलेले मद्य शरीरासाठी घातक असून, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे आपल्या आयुर्मानामध्ये घट होते. तसेच शरीरामध्ये अनेक आजार यामुळे निर्माण होतात.

जर आपल्या आयुष्यमानामध्ये वाढ आणि निरोगी आयुष्य हवे आहे असे जर आपणास वाटत असेल तर आपण आरोग्यासाठी घातक असणाऱ्या लठ्ठपणा, धूम्रपान आणि अतिप्रमाणात घेतले जाणारे मद्य यांना प्रतिबंध घालावा. जे लोक यावर मर्यादा घालतात ते जास्त आयुष्य जगतात, असे त्यांनी म्हटले आहे.