मोदी सरकारने अर्थिक व्यवहार आणि इतर गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे आधारकार्ड निकडीची गोष्ट बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विविध कामांसाठी व्यक्तीजवळ आधार कार्ड असणे आवश्यक असते. त्यामुळे हल्ली आपले आधारकार्ड सतत जवळ बाळगावे लागते. मात्र, आता एका सुविधेमुळे नागरिकांची ही अडचण दूर होऊ शकते. सरकारने नुकतेच ‘एम आधारअॅप’ अपडेट केले आहे. जुलै महिन्यात हे अॅप्लिकेशन लाँच करण्यात आले होते. त्यानंतर या अॅपमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. या अॅपच्या माध्यमातून व्यक्ती आपले आधारकार्ड मोबाईलवर सॉफ्ट कॉपीच्या स्वरुपात जवळ बाळगू शकते. वन टाईम पासवर्डच्या माध्यमातून हे आधारकार्ड मोबाईलवर अॅक्सेस करता येणार आहे.

मोबाईलवर आधारकार्ड अॅक्सेस झाल्यास ते हाताळणे सोपे होणार आहे. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरीही अगदी सहजपणे हे कार्ड तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. याशिवाय विशिष्ट कालावधीसाठी असणारा ओटीपी टाकून नागरिकांना हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी ३० सेकंदाचा कालावधी देण्यात आलाय. प्रोफाईल ओपन केल्यावर पासवर्ड सुरक्षित ठेवला जाईल. विशेष म्हणजे एम आधार अॅप जुलैमध्ये लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत १० लाख जणांनी ते आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केले आहे.

सप्टेंबरपासून रेल्वे प्रवासासाठीही आधारकार्ड हे अधिकृत ओळखपत्र म्हणून चालू शकेल, असा निर्णय घेण्यात आला होता. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘युनिक आयडेंटिफीकेशन नंबर’ अर्थात आधार कार्डमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीत व्हावेत, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. आता आधारकार्ड क्रमांक हा आयकर भरण्यासाठी तसेच पॅनकार्डसाठी नोंदणी करतानाही आवश्यक असतो. आधारकार्डवर आता नागरिकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीही असणार आहे. यामुळे व्यवहार आणखी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.