संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या यांत्रित रक्ताच्या चाचणीमुळे मलेरियाचे अचूक आणि वेगात निदान करणे शक्य होणार आहे. उष्णकटिबंधीय प्रांतात मलेरियाचे निदान वेगात होण्यात अनेक अडचणी येत. मात्र, या पद्धतीमुळे ही अडचण दूर होणार आहे. सूक्ष्मदर्शक आणि लॅबमधील काही चाचण्यांच्या आधारे आतापर्यंत मलेरियाचे निदान केले जात होते. त्यात केले जाणारे निदान चुकीचे आणि वेळखाऊ होते.

रक्ताच्या चाचणीची ही नवी पद्धत जर्मनीतील म्युनिच तांत्रिक विद्यापीठात यशस्वी करण्यात आली. तीस वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तांचे नमुने घेऊन हा प्रयोग करण्यात आला. मलेरिया झालेला असताना आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या रक्ताचे प्रमाण या विषयावरील संशोधनातून हा प्रयोग करण्यात आला. साधारण व्यक्ती आणि मलेरिया झालेल्या व्यक्ती अशा व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांवर विविध प्रकारे संशोधन करण्यात आले. रक्ताच्या नमुन्यांची काही स्तरांवर चाचणी करण्यासाठी संशोधकांनी एक यंत्र विकसित केले. हे यंत्र याआधीही वापरले जात होते. त्याद्वारे मलेरियाचे निदान शक्य होते. या पद्धतीमुळे ९७ टक्के अचूक मलेरियाचे निदान होणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.