अ‍ॅक्शन व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मेंदूतील राखाडी पदार्थ (मेंदू ज्यापासून तयार झालेला असतो त्याचे द्रव) कमी होतो. त्यामुळे उदासीनता, स्किझोफ्रेनिया आणि स्मृतिभ्रंश आजार होण्याची शक्यता असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये देण्यात आला आहे.

कॅनडामधील मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. सातत्याने व्हिडीओ गेम खेळल्याने त्यांच्या हिप्पोकॅम्पसमधील राखाडी पदार्थ कमी होतो. मेंदूमधील हा महत्त्वाचा भाग असून, व्यक्त होणे आणि भूतकाळ आठवणे यासाठी त्याचा उपयोग होतो.

मागील अभ्यासांमध्ये हिप्पोकॅम्पस कमी झाल्यामुळे व्यक्तीला मेंदूचा थकवा येणे तसेच इतर आजार होण्याबाबतचे संशोधन करण्यात आले होते.

व्हिडीओ गेमचा फायदा मेंदूमधील मानसिक प्रणालीसाठी होतो. यामध्ये दृश्यमान लक्ष आणि अल्पकालीन स्मृती यासाठी फायदा होत असल्याचे दिसून येते.

मात्र असे जरी होत असले तरी हिप्पोकॅम्पसमधील कमतरतेचा वर्तणुकीवर परिणाम होत असल्याचे विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक ग्रेग वेस्ट यांनी सांगितले.

अभ्यासामध्ये १०० लोकांचा (५१ पुरुष, ४६ महिला) समावेश करण्यात आला होता. त्यांना विविध लोकप्रिय खेळ ९० तासांसाठी खेळण्यासाठी दिले.

या वेळी व्हिडीओ गेम खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूचे स्कॅन करण्यात आले. यामध्ये जे व्हिडीओ गेम खेळत नव्हते त्यांच्या तुलनेत गेम खेळणाऱ्यांच्या मेंदूतील राखाडी पदार्थ कमी झाल्याचे आढळून आले.