‘आधी हाताला चटके, मग मिळते भाकर’ हे जरी खरे असले तरी स्वयंपाकघरातील दररोजच्या वायुप्रदूषणामुळे हृदयरोग बळावण्याची शक्यता अमेरिकी संशोधकांनी व्यक्त केली आहे. अन्न शिजविणे किंवा इंधनांचा अतिरिक्त वापर यांमुळे वायुप्रदूषण होत असते. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या अनेकांचा संबंध इंधन जाळल्यानंतर होणाऱ्या धुराशी येतो. त्यामुळे स्वयंपाकघरात दीर्घकाळ काम करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे.

शुद्ध इंधनाच्या वापरामुळे हृदयरोगाचा धोका कमी असतो, असे सांगून या संशोधकांनी नैसर्गिक वायूचे उदाहरण दिले. मात्र जगातील अनेक लोक अजूनही नैसर्गिक वायू अर्थात शुद्ध  इंधनाचा वापर करत नाहीत. जगातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मे लोक दारिद्रय़ावस्थेत जीवन जगत असून अशुद्ध इंधनाचा म्हणजेच सरपण, केरोसीन वा अन्य इंधनाचा वापर करत आहेत, असे डब्ल्यूएचओने सांगितले. तंबाखूजन्य पदार्थाच्या धुरामुळे (धूम्रपान) किंवा बाहेरील वायुप्रदूषणामुळे (कारखाना, वाहने) हृदयरोग होतो, हे सर्वानाच माहीत आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातील धुरामुळेही हृदयरोगाची शक्यता आहे, असे सुमित मित्तर या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने सांगितले. मित्तर हे या संशोधक गटाचे नेतृत्व करत आहेत.

‘‘आमच्या संशोधनात ऐतिहासिक आणि वेळेनुसार उपलब्ध असलेल्या विविध दाखल्यांवर नजर टाकली असता केरोसीन, डिझेल, शेणाच्या गोवऱ्या अथवा सरपण यांसारख्या इंधनांच्या वापरामुळे होणाऱ्या धुराने हृदयरोग होत असल्याचे दिसून आले आहे,’’ असे मित्तर यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)