जगप्रसिद्ध अॅपल कंपनीला भारतातील नोटाबंदीचा मोठा फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे कंपनीचे उत्पन्न व विक्रीत घट झाली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयफोनची जबरदस्त विक्री झाल्याने या तिमाहीची चांगली सुरूवात झाली होती. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नोटाबंदीच्या पुर्वी मोठ्याप्रमाणात आयफोनच्या विक्रीत वाढ झाली होती. त्यामुळे पुढील दोन महिने चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कंपनीला होती. नोटाबंदीनंतर चलन टंचाईमुळे आयफोनच्या विक्रीत कमालीची घट झाली. त्यामुळे कंपनीला चालू आर्थिक वर्षात (ऑक्टोबर २०१६- सप्टेंबर २०१७) भारतातील उत्पन्नाचे लक्ष्य ३ बिलियन डॉलरवरून कमी करून २ बिलियन डॉलरपर्यंत आणावे लागले.

भारतात ऑनलाइन, रिटेल चेन आणि गल्लोगली असलेल्या दुकांनांमधून आयफोनची ८० टक्क्यांहून अधिक विक्री ही रोख होते. परंतु नोटाबंदीनंतर डिसेंबरमध्ये रोख व्यवहारांवर लगाम लागला होता, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले, अॅपलचे सीईओ टिम कुक हे मे २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी भारतात ३० लाख युनिट विक्रीचे उद्धिष्ट ठेवले होते. परंतु, नोटाबंदीमुळे हे ध्येय गाठणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
तज्ज्ञांच्या मते, अॅपलने डिसेंबरच्या तिमाहीत ८ ते ९ लाख आयफोन भारतात पाठवले होते. किरकोळ विक्रेत्यांनी नोटाबंदीनंतर स्मार्टफोनच्या विक्रीत ३० ते ३५ टक्के घट झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर अॅपलच्या व्यवसाय वाढीतही ५० टक्क्यांची घट झाली आहे. विक्री वाढवण्यासाठी मोठा दबाव असल्याचे एका व्रिकी प्रतिनिधीने सांगितले. तो म्हणाला, आयफोनची विक्री वाढावी म्हणून ग्राहकांना कॅशबॅक, बायबॅकसह विविध प्रकारच्या योजना राबवाव्या लागत आहेत. यामुळे विक्री मूल्य वाढले आहे व उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले आहे.
आयफोनची विक्री मोठ्याप्रमाणात रोख पद्धतीने होत असल्याची माहिती एका व्रिकेत्याने दिली. विक्री घटल्याने भारतात आयफोन बनवणे आणि स्वत:च्या स्टोअर्समधून विकण्याची योजना कंपनी लगेच अंमलात आणू शकते. त्याचबरोबर देशातील उत्पन्न वाढवावे यासाठी कंपनी आपल्या स्टोअरमधून जुने फोनही विकतील.