संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती केली असून त्याला मोबाइलशी जोडले असल्याने रक्तातील साखरेचे सातत्याने निरीक्षण करून त्यानुसार इन्शुलिनचा डोस आपोआप दिला जाणार असल्याने मधुमेहावर सहजपणे नियंत्रण ठेवले जाणारे शक्य होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या रुग्णांवर १२ आठवडे कृत्रिम स्वादुपिंडाद्वारे प्रायोगिक उपचार करण्यात आले. त्यानुसार या रुग्णांमध्ये लक्षणीय प्रगती दिसली. ३० रुग्णांनी कृत्रिम स्वादुपिंडाच्या आधारे उपचार घेतले. या कृत्रिम स्वादुपिंडामुळे त्यांच्या शरीरातील शर्करेचे प्रमाण मोजले जाऊन त्यानुसार इन्शुलिनचे डोस मिळत गेले. या कृत्रिम स्वादुपिंडात इन्शुलिनचे प्रमाण किती असावे याची तांत्रिक प्रणाली उपलब्ध असल्याने आपोआप उपचार मिळतात. हे संशोधन ‘डायबेटिस केअर’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार या कृत्रिम स्वादुपिंडाचे सकारात्मक परिणाम झाले आहेत. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण तातडीने दर्शविले गेले.

हार्वर्ड पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अ‍ॅप्लाइड सायन्स माहविद्यालयातील फ्रॅन्क डॉयले आणि इयाल डासाऊ यांनी ही चाचणी घेतली. पहिल्या टप्प्यातील मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्ताची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते आणि त्यानुसार इन्शुलिनही वेळेवर मिळणे आवश्यक असते. कृत्रिम स्वादुपिंडामुळे तातडीने आणि अचूक उपचार मिळणे शक्य असल्याने ही पद्धती प्रभावी ठरू शकते.