खाद्यपदार्थाना कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ आरोग्याला घातक असून त्यापासून व्याधीही उत्पन्न होऊ शकत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ किनसिऑलॉजी अँड हेल्द सायन्सच्या जेनिफर कुक यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने या संदर्भात संशोधन केले. जे नागरिक कृत्रिम गोडवा आणणाऱ्या पदार्थाचे सेवन करतात, त्यातही अस्पार्टेमचे सेवन करतात, त्यांच्या शरीरातील शर्करा नियंत्रण प्रणालीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते असे त्या म्हणाल्या. सामान्य शर्करेचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये हा बदल दिसून येत नाही असे त्या म्हणाल्या.
सध्या अनेक शीतपेये, खाद्यपदार्थामध्ये सामान्य साखरेऐवजी कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरले जातात. त्यामुळे मधुमेहाचा धोका नसल्याचे सांगितले जाते. अशा शुगरफ्री किंवा डाएट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनांची सध्या बाजारात रेलचेल आहे. अनेक ग्राहक त्याकडे एक आरोग्यदायी पर्याय म्हणून वळत आहेत. पण हे कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थही घातक असल्याचे या अभ्यासात दिसून आले. ज्या व्यक्तींनी अशा पदार्थाचे सेवन केले होते त्यांना मधुमेह व अन्य व्याधींचा अधिक धोका असल्याचे आढळून आले. नैसर्गिक साखर वापरणाऱ्यांना तितका धोका दिसून आला नाही. यामुळे मानवी शरीरावर आणखी कोणकोणते विपरीत परिणाम होऊ शकतात याचे आणखी संशोधन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आजवर आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या अनेक पदार्थाच्या सेवनाबाबत शंका निर्माण झाली आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)