फेनसेडील व कोरेक्ससह बंदी घातलेली किमान ४३९ औषधे बाजारात विक्री व वितरणास उपलब्ध आहेत,  पण त्यातील काही न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विक्रीस उपलब्ध आहेत,  असे रसायन व खतेमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले. लोकसभेत एका प्रश्नावर माहिती देताना ते म्हणाले की, ४३९ पैकी ३४४ औषधांची विशिष्ट मात्रा प्रतिबंधित आहे. अनेक औषधांच्या प्रकरणांत कंपन्या न्यायालयात गेल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली आहे. कारण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सरकारला परवानगी देण्यावाचून पर्याय नव्हता. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेने स्वतंत्रपणे काम करून या औषधांचे नमुने तपासून बंदी घातली होती. ही संघटना परदेशातील शिफारशींचा विचार न करता स्वतंत्र अहवाल देत असते. ती भारताची औषध नियंत्रक संस्था आहे. इतरांनी औषधांविषयी केलेले नियम किंवा दिलेली माहिती आम्ही आंधळेपणाने मान्य करीत नाही. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अन्वये औषधांचे नियंत्रण करण्यात येते. औषधांच्या उत्पादनास विक्री व वितरण यांचे परवाने राज्य सरकारांचे नेमलेले अधिकारी देत असतात. प्रतिबंधित औषधांचे उत्पादन व विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असून, त्यावर राज्यांचे परवाना अधिकारी शिक्षा करू शकतात.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)