नवरात्रीत रास गरबा व दांडिया खेळायला जाणारे बरेच जण असतील. नुसतं खेळायला जाण्यापेक्षा इतरांचं लक्ष आपल्याकडे कसं खेचता येईल अशाही प्रयत्नात काही असतात. आपल्या मेकअपपासून ते कपड्यांची स्टाईल कशी हटके असावी याचा प्रयत्न सुरू असतो. नवरात्रीच्या काळात ठिकठिकाणी रास गरबा आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केलेलं असतं. त्यासाठी कपडे, ज्वेलरी, हेअरस्टाईल अशी एकूण एक तुमची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू असेल. ही तयारी करताना त्वचेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तेव्हा या काळात तुम्ही काही घरगुती उपाय करून त्वचेचं सौंदर्य खुलवू शकता. ते उपाय कोणते? आणि नवरात्रीत खेळायला जाताना कशा प्रकारचा मेकअप असायला हवा यासाठी ब्युटीशिअन प्राची खांडेकरकडून काही खास टीप्स.

– सौंदर्य खुलवण्यासाठी कधीही घरगुती उपाय करणं नेहमीच चांगलं. नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेतली तर त्वचेला हानी पोहोचत नाही. तेव्हा रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापेक्षा तुम्ही डाळींच्या पीठाचा वापर करू शकता. दिवसातून किमान एकदा चेहऱ्यावर डाळींचं पीठ लावल्यानं चेहऱ्यांचं सौंदर्य अधिक खुलतं.
– ज्यांची त्वचा खूपच तेलकट असेल तर त्यांनी चणा, मसूर किंवा मूगडाळीच्या पीठात थोडासा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने जास्त फायदा होतो. लिंबाच्या रसामुळे चेहऱ्यावरचा काळवंडलेपणा जातो. लिंबू नैसर्गिकरित्या टॅन दूर करते. त्यामुळे याचा रोज वापर केला तर लवकरच फरक जाणवू लागतो.
– जर तुमची त्वचा रुक्ष असेल तर त्यात लिंबाच्या रसाऐवजी दुधावरची साय वापरावी. काहीवेळ या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा आणि पाण्याने धुवून टाकावं. सायीमुळे चेहऱ्याला चकाकी येते.

– चेहऱ्यासाठी मसूरच्या डाळीचं पीठ अधिक फायदेशीर असतं. मसूरची डाळ नसेल तर तुम्ही बेसनही वापरू शकता.
– केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्याचा रस पंधरा मिनिटे केसांच्या मुळात लावावा. त्यानंतर केस धुवून टाकावे. यामुळे केसगळतीची समस्या दूर होते.
-त्याचप्रमाणे तेलात मेथीचे दाणे टाकून त्याने स्कॅल्पमध्ये आठवड्यातून एकदा मसाज केला तर केसगळतीची समस्याही दूर होते.

– नवरात्रीत मेकअपची निवड करताना देखील एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी. सारे प्रोडक्ट हे वॉटरफ्रूफ आणि स्मचफ्रूफ असले पाहिजे. खेळताना घामामुळे हळूहळू चेहऱ्यावर मेकअप फुटू लागतो. घाम आल्यामुळे आपण तो रुमालाने फुसतो पण या नादात मेकअपही निघून जातो. वॉटरफ्रुफ मेकअप असल्याने तो घाम आला तरी पटकन निघून जात नाही.
­ – ज्यांना सारखा घाम येतो त्यांनी सोबत ड्राय टिश्यू ठेवावे. घाम आला की तो हलकेच टिश्यूने टिपावा. यामुळे मेकअप खराब होत नाही.
– सध्या गडद लाल रंगाचा ट्रेंड लिपस्टिकमध्ये आहे. तेव्हा तुम्ही हा ट्रेंडही फॉलो करू शकता.