ग्रीन टी प्यायल्याने धमन्यांचे कार्य सुरळीत राहते, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. जपानमधील क्योटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ग्रीन टीमुळे धमन्यांशी संबंधित सर्व आजार दूर होतात. धमन्यांच्या आजारांमध्ये लक्षणे लवकर दिसत नाहीत, त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. क्वचितच धमन्यांशी संबंधित आजार लवकर कळतो. अशा वेळी कृत्रिम धमनी बसवून तो आजार दूर केला जाऊ शकतो. परंतु हे खूप खर्चीक व त्रासदायक असते. त्यामुळे त्यावर सुरुवातीला प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. ग्रीन टी प्यायल्याने फक्त धमन्यांचे आजार नव्हे तर कर्करोग व हृदयरोगासंबंधित आजारही दूर होतात.

हे संशोधन जपानमध्ये केले गेले असून संशोधकांनी असेही म्हटले आहे की, जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य ग्रीन टीमध्ये दडलेले आहे. जपानमधील ८० टक्केलोक दररोज ग्रीन टीचे सेवन करतात, त्यामुळे ते निरोगी आणि उत्साही असतात.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)