बोल्डरिंग म्हणजे प्रस्तरारोहणामुळे सहनशक्ती व शारीरिक ताकद वाढून डिप्रेशनला (अवसाद) अटकाव होतो असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. बोल्डिरगमुळे अवसादाची इतर लक्षणेही नष्ट होतात. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी जर्मनीतील शंभर जणांचा अभ्यास याबाबत केला असता त्यांच्यात प्रस्तरारोहणामुळे चांगले परिणाम दिसून आले. यातील लोकांचे दोन गट करण्यात आले होते. त्यातील कडे चढणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशन कमी झाले. लहान उंचीच्या टेकडय़ा चढण्यानेही हा परिणाम दिसून येतो. बेकस डिप्रेशन इनव्हेन्टरीच्या माध्यमातून ही तपासणी केली असता प्रस्तरारोहण करणाऱ्या लोकांमध्ये बेकस डिप्रेशन सूचकांक ६.२७ अंकांनी सुधारला. त्याच काळात इतर लोकांमध्ये तो १.४ ने सुधारला. प्रस्तरारोहण ही सकारात्मक व्यायाम पद्धती आहे व त्यामुळे मनाचे आरोग्य सुधारते, असे संशोधक इव्हा मारिया स्टेझलर यांनी म्हटले आहे. यात प्रस्तरारोहण समूहाने केले जात असल्याने त्याचाही फायदा होतो. अमेरिकेत डिप्रेशनचा आजार जास्त असून जगातही त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकतो, किंबहुना समूहाने फिरण्याच्या व्यायामानेही फायदा होऊ शकतो.