तरुणांमध्ये सध्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असून, कोवळ्या वयात रक्तदाब वाढल्यामुळे पुढील आयुष्यामध्ये स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. तसेच मूत्रपिंड निकामी होण्यासह मेंदूला इजा पोहोचत असल्याचा इशारा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. उच्च रक्तदाबामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या निर्माण होतात का, यावर यामध्ये संशोधन करण्यात आले.

तरुणांमध्ये अतिशय कमी वयात उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असून, त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे. १८ ते ४९ या दरम्यानच्या व्यक्तींचा रक्तदाब हा सध्या १४० किंवा त्यापेक्षा अधिक आहे. मात्र साधारण रक्तदाब हा ८० च्या आसपास असणे आवश्यक आहे. रक्तदाब वाढल्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

संशोधकांनी यासाठी जवळपास दोन हजार रुग्णांचा अभ्यास केला. यासाठी त्यांचा सीएमआर घेण्यात आला. त्यानंतर संशोधनाचा निष्कर्ष काढण्यात आला.

१८ ते ३९ या वयाच्या तरुणांना हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोक येण्याचे प्रमाण सुरुवातीला अतिशय कमी होते. मात्र मागील दोन दशकांत हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक झाले आहे. सध्या यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

वृद्ध व्यक्तीमध्ये स्ट्रोक अथवा हृदयविकाराचा झटका येणे हे सामान्य आहे, मात्र तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने याची गंभीरता वाढत आहे. जे तरुण नियमित व्यायाम करतात त्याचे हृदय भक्कम राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. हे संशोधन ‘हायपरटेन्शन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.