मातेच्या दुधामुळे नवजात बालके जीवाणू संसर्गाचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे. त्यातूनच नवी प्रतिजैविके तयार करण्यात मदत होणार आहे.

अमेरिकेतील व्हँडरबिल्ट विद्यापीठात या बाबतचे संशोधन करण्यात आले आहे. मानवी दुधातील काही कबरेदकात केवळ जीवाणूविरोधी घटकच असतात असे नाही तर त्यामुळे जीवाणूंना मारणाऱ्या प्रथिनांची ताकदही वाढते. मानवी दुधातील कबरेदकांचे जीवाणूविरोधी गुण प्रथमच सखोलपणे तपासण्यात आले असल्याचे या विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक स्टीव्हन टाउनसेंड यांनी सांगितले. समूह बी स्ट्रेप्टोकॉकसमुळे नवाजात बालकांना मेंदूज्वर किंवा सेप्सिस होऊ शकतो. महिलांमध्ये समूह बीच्या स्ट्रेप्टोकॉकसमुळे आजार होत नाहीत, पण नवजात बालकात सेप्सिस किंवा न्यूमोनिया यांसारखे जीवघेणे आजार होतात, कारण त्यांची प्रतिकारशक्ती विकसित नसते. मानवी दुधातील कबरेदकांना ऑलिगोसॅकराईड्स म्हणतात. ते दात्या मातांच्या दुधातून वेगळे काढून त्यावर संशोधन करण्यात आले. ऑलिगोसॅकराईड्स हे जीवाणूंना मारतात, एवढेच नव्हे तर त्यांचे जैवआवरण फाडून टाकतात, त्यामुळे जीवाणू सुरक्षित राहत नाहीत. मातेच्या दुधातील या शर्करेने समूह बीच्या स्ट्रेप्टोकॉकस मारले गेल्याचे या संशोधनात दिसून आले. जर्नल एसीएस इनफेक्शियस डिसीजेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.