स्तनपान करणे बाळासाठी किती आरोग्यदायी आहे हे सर्वाना माहिती आहेच. मात्र स्तनपान करणे हे मातांसाठीही तितकेच लाभदायक असल्याचे नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. स्तनपान करण्यामुळे पुढील आयुष्यात मातांना हृदयविकारचा झटका अथवा स्ट्रोक येण्याचा धोका अतिशय कमी होत असल्याचा दावा संशोधनामध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. स्तनपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची या वेळी तुलना करण्यात आली. ज्या महिला आपल्या बाळाला स्तनपान करतात त्यांना स्तनपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण ८  टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले.

ज्या महिला आपल्या बाळाला दोन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक स्तनपान करतात त्यांना स्तनपान न करणाऱ्या महिल्यांच्या तुलनेत हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी होत असून, स्ट्रोक येण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

गरोदरपणामध्ये महिलेच्या चयापचयामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल घडून येतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यासाठी माता फॅट साठवून ठेवते. बाळ जन्माला आल्यानंतर स्तनपान करण्यासाठी त्याचा फायदा होतो. स्तनपान करणे बाळाच्या आरोग्यासाठी जितके लाभदायक आहे, तितकेच ते मातेसाठी आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासासाठी दोन लाख ८९ हजार ५७३ महिलांचा अभ्यास करण्यात आला. ‘अमेरिकन हर्ट असोसिएशन’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.