मेंदूच्या विकासात फायदा

नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधीच जन्मलेल्या बालकांना पहिल्या महिन्यात स्तनपान दिल्यास त्यांच्या मेंदूची वाढ चांगली होते असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.

अमेरिकेतील सेंट लुईस चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये अशा अगोदर जन्माला आलेल्या बाळांना त्यांच्या आहारात पन्नास टक्के मातेचे दूध दिले असता त्यांच्या मेंदूची विशेष करून कॉर्टिकल सरफेस भागाची वाढ चांगली दिसून आली आहे. ज्या बाळांना मातेचे दूध दिले गेले नाही त्यांच्यात मेंदूची वाढ योग्य प्रकारे झाली नाही. मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळांच्या मेंदूचा विकास अनेकदा व्यवस्थित होतोच असे नाही, असे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्राध्यापक सिंथिया रॉजर्स यांनी सांगितले. मातेचे दूध दिल्याने मेंदूच्या सर्वच भागांची वाढ चांगली होते, असा दावा त्यांनी एमआरआय प्रतिमांच्या आधारे केला आहे. लवकर जन्माला आलेल्या ७७ मुलांना मातेचे दूध किती प्रमाणात दिले गेले याचा यात अभ्यास केला गेला. नंतर त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले. मुदतीआधी जन्माला आलेल्या बालकांमध्ये मेंदूची वाढ सुरू स्तनपानाने व्यवस्थित झाली. यात मातेचे किंवा अन्य मातांनी दान केलेल्या दुधानेही सारखाच फरक दिसून आला, असे रॉजर्स लॅबोरेटरीच्या एरिन रेनॉल्ड्स यांनी सांगितले. स्तनपान दिल्याने मुलांचा कॉर्टिकल भागाचा विकास चांगला झाला. कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग आकलनाशी किंवा बोधनाशी संबंधित असतो, त्यामुळे मुलांची वाढ इतर बाबतीत होण्यास मदत होते. मुलांचा जन्म मुदतीआधी होण्यात काही समस्यांचा संबंध येऊ शकतो, त्यामुळे आईवडिलांच्या मनात भीती असते. त्यावर उपाय म्हणून मातांनी या बालकांना भरपूर स्तनपान देणे आवश्यक आहे. त्याचा फायदा त्यांना नंतरच्या वाढीतही होतो. लहान बाळांसाठी आईचे दूध हे अमृतासमान आहे असे सांगून रॉजर्स यांनी म्हटले आहे, की बाळांच्या विकासात या दुधाची भूमिका फार मोठी असते.