जागतिक स्तरावर १० लोकांपैकी ९ लोक अशुद्ध हवेचे श्वसन करत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे जगभरात प्रत्येक वर्षी जवळपास आठ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जाग्तिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक संघटनेच्या नव्या अहवालानुसार, वाढत्या प्रदूषणाचा सर्वात जास्त विळखा शहरी भागाला बसला असून, ग्रामीण भागामध्येही याचे प्रमाण वाढते आहे. विकसित देशांपेक्षा गरीब देशांमध्ये प्रदूषित हवेचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी प्रदूषणाचा परिणाम सर्वच जगाला आणि सोसायटीला होत आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

ही आरोग्याची सार्वजनिक आणीबाणी आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अथवा येणाऱ्या वर्षांमध्ये ते वाढू नये यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर धावणाऱ्या वाहनांवर मर्यादा घालण्यासह कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ इंधनाचा पुरवठा होण्यासाठी सरकारकडून योग्य प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. आग्नेय आशिया आणि पश्चिम पॅसिफिक भागामध्ये प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. यामध्ये चीनचाही समावेश आहे.

दक्षिण आशियाही प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून, प्रदूषित हवेमुळे भारतामध्ये प्रत्येक वर्षी ६ लाखांपेक्षा अधिक आणि बांगलादेशमध्ये ३७ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)