ब्रिटिश संशोधकांचे संशोधन
गर्भवती मातांनी मासे सेवन केल्यास बालकांच्या मेंदूची वाढ चांगली होते, हे खरे असली तरी गर्भारपणात आठवडय़ातून तीनदा मासे सेवन केल्यास नवजात बालकांमध्ये लठ्ठपणा येण्याची शक्यता असते, असा धोक्याचा इशारा संशोधनाअंती देण्यात आला आहे. आठवडय़ातून तीनदा या मातांनी मासेसेवन केल्यास अशी शक्यता असते.
मासेसेवन केल्याने बाळाची पहिली दोन वर्षांतील वाढ फार वेगाने होते. माशांमध्ये प्रदूषक द्रव्येही असतात. त्यामुळे मासेसेवन केल्याने जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये लठ्ठपणा येऊ शकतो, असे ग्रीसमधील क्रेटे विद्यापीठाच्या लेडा चाटझी यांनी म्हटले आहे. जामा पेडियाट्रिक्स या नियतकालिकात २६,१८४ गर्भार माता आणि त्यांच्या नवजात बालकांबाबतचे संशोधन प्रसिद्ध झालेअसून ते युरोप व अमेरिकेशी संबंधित आहे. ४ ते ६ वयोगटातील ३,४७६ बालके (१५.२ टक्के) लठ्ठ असल्याचे दिसून आले. मातांनी जास्त मासे सेवन केल्याने चार वर्षांच्या १४ टक्के बालकात तर ६ वर्षांच्या २२ टक्के बालकात लठ्ठपणा दिसून आला.
मुलांपेक्षा मुलींमध्ये हा परिणाम जास्त दिसून आला त्यांच्या मातांनी गर्भारपणात आठवडय़ातून तीनदा माशांचे सेवन केले होते. त्यांच्या मुलांमध्ये बालपणीच लठ्ठपणाचा धोका ३१ टक्क्य़ांनी वाढला होता. माशांमध्ये प्रथिने व मेदाम्ले जास्त असतात त्यात ओमेगा ३ मेदाम्लांचे प्रमाणही चांगले असते. पण सागरी प्रदूषकांमुळे मासे धोकादायक ठरू शकतात, असे ब्रिस्टॉल विद्यापीठाचे अ‍ॅण्ड्रय़ू व्हाइटलॉ यांनी सांगितले. गर्भारपणात मातांनी मासे खाणे हितकर असते पण त्याचा अतिरेक वाईट ठरू शकतो. सामन मासा सेवन करताना त्याचे प्रमाण कमी असावे, असेही व्हाईटलॉ यांनी म्हटले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)