शरीरातील अतिरिक्त मेदामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होत असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, हा मेद किती आणि कुठे आहे यावरही बरेच काही अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मागील संशोधनानुसार अतिरिक्त मेदामुळे स्थूलपणा वाढणे, जळजळ आणि त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थूलपणा हा कर्करोग वाहिन्यांवर सकारात्मक परिणामकारक करत असतो. त्यामुळे शरीरातील पेशींची अनियंत्रित (टय़ूमर) वाढीसाठी ते लाभदायकच ठरते.

उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील संशोधकांनी यासंबंधी संशोधन केले आहे. स्ट्रोमल पेशी शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीसाठी कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे त्या कर्करोगासही साहाय्यभूत ठरतात. स्थूल व्यक्तींमध्ये या पेशी मोठय़ा प्रमाणात आढळतात. स्तनांचा कर्करोग असणाऱ्यांमध्ये या पेशींचे प्रमाण अधिक असते, असे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. काही जणांमध्ये मेद अतिक्रियाशील असतो. त्यामुळेही कर्करोगाच्या विकासाला बळ मिळते.

जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे १६ प्रकारच्या कर्करोगांचा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे, असे उताह विद्यापीठातील संशोधिका कोर्नेलिया अल्रीच यांनी सांगितले. हे संशोधन ‘कॅन्सर प्रिव्हेंशन रिसर्च’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.