गेल्या दशकभरात नव्याने कर्करोग होण्याचे प्रमाण अप्रगत असलेल्या देशांमध्ये ५० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच जागतिक स्तरावर कर्करोग होण्याच्या प्रमाणात ३३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. नव्याने कर्करोग होण्याचे प्रमाण विकसित असणाऱ्या अमेरिका आणि जपानमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले असून, हे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढले आहे.

कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने, भविष्यात त्याचा मोठा धोका असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक क्रिस्टीना यांनी म्हटले आहे.

कर्करोग होण्याचे प्रमाण पूर्ण जगभरात वाढले असले तरी अप्रगत देशांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. याला रोखण्यासाठी प्रगत आरोग्य प्रणाली वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील दशकभरात कर्करागाने मृत्यू होण्याच्या प्रमाणात अनेक देशांमध्ये घट झाली आहे. मात्र असे होत असताना आफ्रिकेतील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. केनिया, टांझानिया, नायझर, कांगो, माली आणि सेनेगल अशी कर्करोगाचे वाढते प्रमाण असणाऱ्या देशांची नावे आहेत. याठिकाणी कर्करोगाला रोखण्यासाठी निदान आणि उपाय करण्यासाठी आरोग्य सेवांची गरज आहे.

२०१५ मध्ये कर्करोगाचे १७.५ दशलक्ष नवीन रुग्ण देशभरात आढळले असून, ८.७ दशलक्ष जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी या विकसित देशांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने स्तन कर्करोग, श्वसननलिकेसंबंधित, फुप्फूस, गुदाशय आणि मोठय़ा आतडय़ामध्ये होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. स्तन कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असून, २०१५ मध्ये ५ लाख २३ हजार महिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)