संशोधकांनी नव्या संयुगाचा शोध लावला असून त्यामुळे कर्करोगाच्या पेशींवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे कर्करोगाचा विनाश करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या संयुगामुळे कर्करुग्णांवर वेगवान आणि परिणामकारक उपचार करणे शक्य होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. नव्या उपचार पद्धतीचा शोध संशोधकांनी अमेरिकेतील अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यक महाविद्यालयात लावला असून ती अतितीव्र मायलॉईड ल्युकायेमिया पेशींवर आघात करते. या संयुगाचे नाव बीटीएसए १ असे आहे. हे संयुग कर्करोगामुळे शरीरात अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींना रोखते.

बीटीएसए १ हे संयुग अप्रत्यक्षरीत्या कर्करोग पेशींवर हल्ला करते. काही औषधे या संयुगाला साहाय्यभूत ठरतात, असा दावाही संशोधकांनी केला आहे. हे संयुग कर्करोगाला शिक्षा देण्यासाठी सदैव कार्यरत असते. पेशींना सदैव शक्ती देण्याचे काम हे संयुग करते. बीएएक्स रेणूंवर कर्करोगाच्या पेशी हल्ला करतात. मात्र, त्याच वेळी बीटीएसए १ हे संयुग सक्रिय होते, असेही संशोधकांनी सांगितले.

नव्याने शोधलेले हे संयुग बीएएक्स रेणूंना मागे टाकून कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करते, असे अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यक महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक एव्हरिपीडिस गॅव्होथेओटिस यांनी सांगितले.