नियमित चॉकलेट खाण्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा धोका नव्याने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. नियमित चॉकलेट खाण्याचा जगभरातील जवळपास ३३ दशलक्ष लोकांना फटका बसला आहे.

मागील अभ्यासामध्ये चॉकलेट खाण्यामुळे विशेषत: डार्क चॉकलेटमुळे हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचे आढळून आले होते.

अमेरिकेतील हॉर्वर्ड टी. एच. स्कूलमधील संशोधकांनी हृदयाचे ठोके कमी पडण्याची नेमकी काय कारणे आहेत, याबाबत अधिक संशोधन केले.

ही स्थिती का कारणीभूत होते त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्यावर काय उपाय करण्यात येईल, याचीही माहिती सध्या देता येणार नसल्याचे, संशोधकांनी सांगितले. हे संशोधन हर्ट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी ५५ हजार ५०२ लोकांना सहभागी करून घेतले. यामध्ये २६ हजार ४०० पुरुष आणि २९ हजार १०० महिलांचा समावेश होता. त्यांचे वय ५० ते ६४ या दरम्यान होते.

सहभागी लोक आठवडय़ातून किती वेळा चॉकलेट खातात याचे संशोधन करण्यात आले. चॉकलेट खाणाऱ्यांच्या हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण कालांतराने अनियमित झाल्याचे दिसून आले. तसेच हृदयाशी संबंधित आजारांमध्ये यामुळे १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे, संशोधकांना आढळून आले.