लहान मुलांना चॉकलेट कितीही आवडत असले तरी त्यांना चॉकलेटपासून दूर कसे ठेवता येईल याचाच प्रयत्न पालक करत असतात. ‘चॉकलेटने दात किडतील’ हे पालपूद तर नेहमीचेच. पण चॉकलेट हे लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्वासाठीच किती उपयुक्त आहे, हे नव्या संशोधनातून दिसून आले आहे. तुमच्या हृदयाचे ठोके जर अनियमित असतील तर त्यासाठी चॉकलेटच उपयुक्त आहे, असे हे संशोधन सांगते.

दर आठवडय़ाला चॉकलेटचे पुरेसे सेवन केले तर हृदयाचे ठोके अनियमित असल्याचा धोका कमी होतो. चॉकलेटने हृदयाच्या ठोक्यांची नियमितता वाढते, त्याचबरोबर चॉकलेटमुळे पुरेशी ऊर्जाही मिळते, असे संशोधन डेन्मार्कच्या संशोधकांनी केले आहे. ‘जर्नल हार्ट’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून हे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी ५५,००० लोकांचा अभ्यास केला आहे. या लोकांचे वयोगट, त्यांचा आहार, चॉकलेटचे सेवन याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

हृदयाचे ठोके जर अनियमित असतील, तर त्यामुळे अनेक धोके संभवतात. रक्ताच्या गुठळय़ा, पक्षघात, हृदयविकाराचा झटका आणि अन्य हृदयविकार अशा आजारांना सामारे जावे लागते. ‘अमेरिकी हार्ट असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत २७ लाख लोकांना हृदयाच्या अनियमित ठोक्यांमुळे होणारे आजार होतात. या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून डेन्मार्कच्या संशोधकांनी चॉकलेटचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

चॉकलेटचे नियमित सेवन केल्याने हृदयांच्या ठोक्यांचे प्रमाण स्थिर राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेटचे सेवन करणे गरजेचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.