दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक कप कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने पुर:स्थ (प्रोस्टेट) कर्करोग होण्याचा धोका ५० टक्के कमी होत असल्याचे एका नव्या अभ्यासात दिसून आले आहे. इटालियन संशोधकांनी हा दावा केला आहे.

इटालियन पद्धतीने केलेल्या कॉफीवर हा अभ्यास प्रकाश टाकण्यास मदत करतो. कॅफिन आणि प्रोस्टेट कर्करोग याचा संबंध असल्याचे या अभ्यासात दिसून आले. इटालियन लोक अतिशय उच्च तापमानामध्ये फिल्टरचा वापर न करता काटेकोरपणे कॉफी तयार करतात.

सरासरी चार वर्षे केलेल्या या अभ्यासासाठी ७ हजार पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांच्या कॉफी पिण्याच्या सवयीचे विश्लेषण करून प्रोस्टेट कर्करोगाशी त्याची तुलना करण्यात आली. जे लोक प्रत्येक दिवशी तीनपेक्षा अधिक कप कॉफी घेत होते, त्यांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका ५३ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले. कॉफीचा नक्की काय परिणाम होतो, याबाबत संशोधकांनी प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यासाठी कॉफीचा अर्क प्रोस्टेट कर्करोग पेशींवर टाकून नक्की काय परिणाम करतो, हे तपासण्यात आले.

कर्करोगाच्या पेशींवर कॉफी घेण्याचा सकारात्मक परिणाम होत असून, कॅफिन आणि इतर घटकांमुळे कर्करोगावरील उपचारासाठी त्याचा फायदा होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. हे संशोधन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.